कुतूहल : प्रदूषण आणि आम्ल वर्षां

पावसाच्या पाण्याशी या वायूचा संपर्क आला की त्यापासून सल्फ्युरस आम्ल तयार होते. ते मात्र फारच धोकादायक असते.

कुतूहल : प्रदूषण आणि आम्ल वर्षां

पावसाचे पाणी पाण्याच्या वाफेपासून बनले असल्याने शुद्ध असायला हवे; परंतु प्रत्यक्षात तसे आढळत नाही. याचे कारण हवेचे प्रदूषण हे होय. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड वायू असतात. यातील नायट्रोजन तसा निष्क्रिय असतो. परंतु पावसात जेव्हा विजा चमकतात त्या वेळी नायट्रोजन वायूचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांचे नायट्रोजन ऑक्साइडमध्ये रूपांतर होते. हा वायू पाण्यात मिसळला की त्याचे नायट्रस आम्लात रूपांतर होते. तसेच कार्बन डायऑक्साइड वायूचे देखील आहे. तो पाण्यात मिसळला की कॉबरेनिक आम्ल तयार होते. या वायूचे हवेतील प्रमाण फारच अल्प आहे आणि त्यापासून निर्माण होणारे आम्ल बरेच सौम्य असते. परंतु अलीकडे मात्र इंधनाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड वायूचे हवेतील प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी काळजीत पडले आहेत. त्यांच्या काळजीचे यापेक्षा अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे हवेतील  सल्फर डायॉक्साईड वायूचे वाढते प्रमाण. वीज निर्मितीसाठी आणि वाहने चालविण्यासाठी जे जैविक इंधन वापरले जाते त्यामध्ये गंधकाची (सल्फर) संयुगे असतात. या इंधनाचे ज्वलन होताना गंधकाचा प्राणवायूशी संयोग होऊन त्यांचे सल्फर डायॉक्साईड वायूत रूपांतर होते. पावसाच्या पाण्याशी या वायूचा संपर्क आला की त्यापासून सल्फ्युरस आम्ल तयार होते. ते मात्र फारच धोकादायक असते. अशा आम्लयुक्तत पावसाला आम्लीय पाऊस किंवा ‘आम्ल वर्षां’ असे म्हणतात.

आम्लयुक्त पाणी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा ते ओढे, नदी, नाले यांच्यातून वाहात जाऊन जलाशयांत जमा होते. यावेळी तेथील अल्कधर्मी क्षारांशी त्याचा संपर्क आला की पाण्यातील आम्लाचे उदासीनीकरण होते. त्यामुळे पावसाच्या पाण्याची आम्लता कमी असेल आणि मातीत अल्कधर्मी क्षार असतील तर आम्लीय पावसाचे फारसे दुष्परिणाम जाणवत नाहीत. परंतु पाण्याची आम्लता वाढली किंवा जमिनीत असलेल्या अल्कधर्मी क्षारांचे प्रमाण कमी झाले तर मात्र समस्या निर्माण होऊ शकतात आणि याचा सरळ परिणाम शेतातील पिकांवर होतो. आम्लीय पावसासंदर्भात याहीपेक्षा काळजी करायची ती आपल्या पुरातन वास्तूंची.  बरीचशी मंदिरे, किल्ले, स्मारके, ऐतिहासिक वास्तू या  दगडांनी बांधलेल्या आहेत. या दगडांवर आम्लीय पावसाचा परिणाम होऊन त्यांची झीज होते. हे जर असेच अनेक वर्षे चालू राहिले तर आपली प्राचीन संपदा नष्ट होऊ शकते.

यासाठी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे म्हणूनच पाण्याच्या संपर्कात येताच आम्ल निर्माण करणारे कोणतेही रासायनिक घटक हवेत सोडले जाणार नाहीत याची काळजी आपण सर्वानी घेणे आवश्यक आहे.

– डॉ. प्रशांत ठाकरे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pollution and acid rain facts zws

Next Story
कुतूहल : बिटाचा पिंजरा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी