बटेर पक्ष्यांच्या खाद्याचे नियोजन प्रामुख्याने दोन भागांत करतात. पहिल्या तीन आठवडय़ांच्या पिलांसाठी ‘स्टार्टर’ तर चार ते सहा आठवडय़ांच्या पक्ष्यांसाठी ‘ग्रोअर’ (वाढकेंद्री) पद्धतीच्या खाद्याचे नियोजन क्रमप्राप्त ठरते. स्टार्टर खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण २७ टक्के तर वाढीव खाद्यात प्रथिनांचे प्रमाण २४ टक्के असते. अंडी देणाऱ्या बटेर पक्ष्यांसाठी ० ते ४ आठवडय़ांच्या स्टार्टर खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण २४ टक्के, ४ ते ५ आठवडय़ांच्या वाढकेंद्री खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण २० टक्के तर सहा आठवडय़ांच्या पुढच्या पक्ष्यांसाठी खाद्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १९ टक्के ठेवणे आवश्यक असते.
बटेर पक्ष्यांपासून अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी त्यांचे खाद्य-व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. त्यांना खाद्य बारीक करून द्यावे. पाच आठवडय़ापर्यंतच्या पक्ष्यांना ५०० ग्रॅम प्रती पक्षी खाद्य द्यावे तसेच अंडी देणाऱ्या पक्ष्यांसाठी १२ अंडय़ांमागे ४०० ग्रॅम खाद्याची शिफारस आहे. त्यांच्या खाद्यामध्ये मका, ज्वारी, भाताचा भरडा, भुईमूग पेंड, सोया मिल, लहान मासळी, सूर्यफूल पेंड, भुईमूग टरफले इत्यादी घटक असतात.
बटेर पक्षी सातव्या आठवडय़ापासून अंडी देण्यास सुरुवात करतात. आठव्या आठवडय़ापर्यंत हे पक्षी ५० टक्के अंडय़ांचे उत्पादन पूर्ण करतात. चांगल्या प्रतीच्या अंडी व पिल्लांच्या उत्पादनासाठी योग्य व शुद्ध वंशाच्या नर पक्ष्याची निवड करणे क्रमप्राप्त ठरते. निवडलेले नर पक्षी आठ ते १० आठवडय़ाच्या वयात मादी पक्ष्यांसोबत ठेवावेत. प्रजननासाठी साधारणपणे पाच माद्यांमध्ये एक नर ठेवण्याची शिफारस आहे. बटेर पक्ष्याची अंडी उबवण्यासाठी १६ ते १८ दिवसांचा कालावधी लागतो. ५०० मादी बटेर पक्ष्यांपासून सुमारे १५०० पिल्ले सहज मिळतात.
बटेर पक्ष्याची नवजात पिल्ले ब्रूडर हाऊस (या ठिकाणी पिल्लांना कृत्रिम ऊब देण्याची सोय केली जाते) मध्ये ठेवावीत. नवजात पिल्ले अत्यंत नाजूक व संवेदनशील असतात. त्यांच्यासाठी पुरेसे तापमान, प्रकाश, खेळती हवा यासोबतच शुद्ध व ताजे पाणी आणि खाद्य यांचे नियोजन करणे महत्त्वाचे असते.
– सागर भुतकर, रितेश निकम (परभणी)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. – मुद्दय़ाचे बोला
बुद्धाची अशी एक गोष्ट सांगतात की, त्याचा एक शिष्य त्याला म्हणाला, ‘तुम्ही आत्म्याबद्दल काही सांगत नाही. निर्वाण झाल्यावर सगळे आपल्यापुरते नष्ट होते का, याचे स्पष्टीकरण देत नाही. सृष्टीबद्दल काही विवेचन करीत नाही, हे सगळे कसे सुरू झाले यावर तर तुम्ही मौन पाळलेले दिसते. या सगळ्याचे स्पष्टीकरण देणे हे तुमचे काम आहे. नाहीतर मी तुम्हाला सोडून जाईन.’ तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले की, ‘हे सगळे मी तुम्हाला किंवा तुला सांगीन असे कधी म्हटलेच नाही तेव्हा तू मला धाक दाखवू नकोस.’ अशीही एक गोष्ट सांगतात की, बुद्ध म्हणाले की, ‘समजा मी हे सर्व सांगितले तर ते तुझ्या डोक्यात तर शिरायला हवे? तेव्हा तूर्तास तृष्णेचा विषारी बाण माणसाला मारण्यात आला आहे. या तृष्णेमुळे त्याला दु:खाने घेरले आहे. तेव्हा हा बाण कोणी मारला, तो ब्राह्मण होता की क्षत्रिय, बाण मारणारा उंच होता की बुट्टा, असले प्रश्न जर तू वैद्याला विचारणार असशील तर त्याने बाण काढायच्या आतच तू मरशील. मग उपयोग काय होणार?’
बुद्धाने बायकोला आणि मुलाला सोडले आणि राज्याचाही त्याग केला, पण सगळ्यांनी संन्यास घ्यावा, असे कधीही सांगितलेले नाही. शंकराचार्यानी तर लग्नच केले नाही. त्यांनी ज्ञान झाल्यावर आपोआप संन्याशी निर्माण होतो, असे सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. ते जर खरे असते तर त्या ज्ञानी माणसाने देशभर हिंडून अविश्रांत श्रम करीत चार मठ बांधण्याची उठाठेव केलीच नसती.
बुद्धानेही कन्फुशियस आणि त्याच्या पाठीराख्यांप्रमाणे आणि प्लॅटोसारखे सुवर्णमध्य गाठतच जगायला सांगितले आहे. भगवान बुद्धांनी त्याला सम्यक असा शब्द वापरला आहे. आकंठ जेवण किंवा उपोषण भोगी वर्तन किंवा वैराग्य, सुखाच्या मागे पळणे किंवा व्यर्थ क्लेश करून घेण्याची वृत्ती या सर्वानाच त्यांनी नकारघंटा वाजविली. त्यांनी दु:ख ही गोष्ट शाश्वत नाही आणि म्हणून अजिंक्यही नाही. त्याला घाबरून आळशी माणसे पळवाटा शोधतात किंवा आत्महत्या करून सगळे संपवू बघतात. ते दोन्ही मार्ग चुकीचे आहेत, असे ठासून सांगितले आहे. सद्वृत्ती आणि सदाचार माणसाला ज्ञानाप्रत नेते. शेवटी अविद्या हीच गोष्ट पापाचा उगम आहे आणि ही अविद्या घालविण्यासाठी स्वत:चे सतत निरीक्षण करणे भाग आहे, असा मार्ग सांगितला. आत्मा आहे की नाही, या वादविवादात पडण्याचे मग कारणच उरत नाही. ज्याला वैदिक दर्शने म्हणतात त्यातही ईश्वराशिवाय या मार्गाने प्रयत्न झाले आहेत. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
*ठरलेल्या क्रमाप्रमाणे हा लेखांक ‘पौर्वात्य देशांतले धर्म’ (२ ऑक्टो.) यानंतर असावयास हवा होता. क्रम संपादकीय नजरचुकीमुळे बदलला आहे.
वॉर अँड पीस – कॅन्सरशी लढा रोगप्रतिकारशक्तीने! भाग १३
आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे कॅन्सरचा यशस्वीपणे सामना करण्याकरिता कॅन्सरच्या जिवाणूंशी लढावे लागते. याकरिता ‘माइलोईल डिराईव्हड सप्रेसर सेल्स’ या प्रतिरोधक पेशींची मदत होत असते. या प्रतिरोधक शक्तीमुळे कॅन्सरच्या स्टेमटेल पेशींना नष्ट करता येते. कॅन्सर विकारात काही काळ कॅन्सरच्या स्टेमपेशींचे प्रमाण तात्पुरते कमी होते, पण हा तात्पुरता दबलेला कॅन्सर दुप्पट वेगाने वाढतो. आयुर्वेदिय तत्त्वज्ञानाप्रमाणे ‘मूलेकुठार:’ या न्यायाने या पेशींवर प्रथम तातडीने उपचार व्हायला हवे असतात. शरीरात दोन प्रकारे रोगांचे आक्रमण होत असते. वातावरणातली बाह्य़ जंतू व शरीरात रसरक्तादी सात धातू, मलमूत्रादी तीन मलांच्या अनुक्रमे निर्मिती व वापरातील असमतोलाकडे लक्ष द्यायला हवे. वातावरणातील जीवजंतूंचा सामना करण्याकरिता प्राणवायू शरीरात पुरेसा मिळेल याची मोठी जबाबदारी तुळशीची ताजी पाने निभावतात. विशेषत: प्राणवह स्रोतसाचे, फुफ्फुसाचे मेंदू संबंधित कॅन्सरग्रस्त रुग्णांनी तुळशीच्या ताज्या दहा पानांची मिरपुडीबरोबर चटणी घ्यावी. बाह्य कारणामुळे बलक्षय होत असल्यास, दर्जेदार काळ्या मनुका किमान ३०-४० खाव्यात. शरीरातील रसरक्तादी धातूंच्या निर्मितीत कमी अधिकपणा असल्यास यकृताच्या कार्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावयास लागते. त्याकरिता कोरफड पानांच्या ताज्या गराचा मोठा उपयोग होतो. शीतप्रकृती व प्राणवहस्रोतसांच्या विविध अवस्थांत ओल्या हळदीचा रस/चटणी स्वरूपात वापर करावा. आयुर्वेदिय संकल्पनेप्रमाणे केस व अस्थिधातू यांच्या स्वास्थ्याकडे बारकाईने लक्ष दिले तर अनेक रोगांमध्ये; रोगप्रतिकारशक्ती निर्माण करता, वाढवता येते. त्याकरिता गुळवेल, गोखरू व आवळकाठी अशी तीन घटक द्रव्ये असलेले रसायन चूर्ण माझेकडे येणाऱ्या समस्त कॅन्सरग्रस्त रुग्णांना मी आवर्जून देतो. सुधारणा होते. गुळवेल जाड व ताजी, ताजा आवळा, डंख न लागलेला गोखरू, असा कटाक्ष असावा. स्नायूंच्या स्वास्थ्याकरिता शतावरी मुळ्या; पचनाकरिता सुंठ, मिरे, पिंपळी यांचे योगदान मोलाचे आहे!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ४ ऑक्टोबर
१९१४ > विविधांगी व्यासंग असलेले समीक्षक मधुकर वासुदेव धोंड यांचा जन्म. ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’, ‘जाळ्यातील चंद्र’ ही पुस्तके त्यांच्या व्युत्पन्नतेची साक्ष देतात. त्यांच्या ‘चंद्र चवथिचा’मध्ये ‘एकच प्याला’ या नाटकाची नव्या दृष्टिकोनातून समीक्षा आहे, तर ‘तरीही येतो..’मध्ये बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितांचे नवे अन्वयार्थ आहेत. लावणीचा विकास आणि या वाङ्मयप्रकाराचे मराठी काव्यातील स्थान यांबद्दलच्या महत्त्वाच्या प्रस्तावना लेखासह ‘मऱ्हाटी लावणी’ हे त्यांनी केलेले एक महत्त्वाचे संपादनकार्य होय. त्यांचे निधन २००७ साली झाले.
१९६६ > ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ या मासिकांचे संस्थापक- संपादक, लेखक, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचे निधन. ‘चोरटे हल्ले’, ‘गाळीव रत्ने’ आदी पुस्तकांखेरीज ‘अक्षरयोगी अनंत अंतरकर’ हे त्यांच्या निवडक अप्रकाशित लेखांचा समावेश असलेले पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले.
१९८२ > कवी सोपानदेव नथुजी चौधरी यांचे निधन. काव्यकेतकी, अनुपमा, सोपानदेवी या संग्रहांतून त्यांची कविता पुस्तकरूप झाली. कवयित्री बहिणाबाई चौधरी या त्यांच्या मातोश्री होत.
– संजय वझरेकर