डॉ. हर्बर्ट बेन्सन यांनी आपले सुरुवातीचे संशोधन महेश योगी यांचे शिष्य जे ‘भावातीत ध्यान’ करायचे, त्यांच्यावर १९६५ मध्ये केले होते. नंतर त्यांच्या लक्षात आले की, केवळ भावातीत ध्यानानेच (ट्रान्सन्डेन्टल मेडिटेशन) नाही, तर कोणताही एक शब्द किंवा ओळ लयबद्ध तऱ्हेने पुन: पुन्हा म्हटल्याने, दीर्घ श्वसनाने किंवा जाणीवपूर्वक स्नायू शिथिल करण्यानेदेखील युद्धस्थिती बदलते. रुग्णाच्या धार्मिक श्रद्धेनुसार त्याला भावणारा शब्द वापरला तर शांतता स्थिती अधिक चांगली असते. ख्रिश्चन ‘मेरी फुल ऑफ ग्रेस’ या वाक्याने, ज्यू ‘शमा इस्राएल’ या शब्दांनी, मुस्लिमांना ‘इन्शाल्ला’, तर हिंदूंना ‘ओम’च्या जपाने शांतता स्थिती लवकर साधते. नास्तिक आणि कोणताच धर्म न मानणारे ‘शांती’, ‘प्रेम’ असे शब्द अधिक पसंत करतात. डॉ. बेन्सन कोणत्याही ठरावीक शब्दाचा आग्रह न धरता रुग्णांना ही शांतता स्थिती शिकवू लागले आणि अतिरक्तदाब, डोकेदुखी, हृदयाचे अनियमित ठोके, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना, अतिचिंता आणि नैराश्य या आजारांमध्ये चांगला लाभ दिसू लागला. या सर्व संशोधनात १० वर्षे गेली. १९७५ मध्ये डॉ. बेन्सन यांनी ‘द रिलॅक्सेशन रिस्पॉन्स’ हे पुस्तक लिहिले. रुग्णांसाठी डॉ. बेन्सन यांनी शांतता स्थिती आणणाऱ्या ध्यानाचा एक धर्मातीत.. सेक्युलर.. फॉम्र्युलाच तयार केला. तो असा :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(१) शांत, सुखावह स्थितीत बसा. (२) डोळे बंद करा. (३) पायापासून चेहऱ्यापर्यंतचे सर्व स्नायू शिथिल करा. (४) नैसर्गिक श्वसन चालू ठेवा. तुम्हाला प्रिय असणारा, भावणारा कोणताही शब्द किंवा ‘वन’ हा शब्द श्वास सोडताना मनातल्या मनात म्हणा, त्यावर लक्ष केंद्रित करा. (५) मनात विचार येतील, त्यांना प्रतिक्रिया करू नका. एकाग्रता होत नाही म्हणून निराश होऊ नका. मन भरकटले आहे, हे लक्षात आल्यानंतर पुन्हा शब्दावर लक्ष केंद्रित करा. (६) १०-२० मिनिटे असा सराव करा. (७) त्यानंतर शब्दाचा जप थांबवा; पण डोळे न उघडता तसेच बसून राहा. (८) नंतर डोळे उघडून मिनिटभर बसून राहा.

असा सराव केल्याने शांतता स्थिती निर्माण होते. मात्र हे साक्षी ध्यान नाही. २१ व्या शतकात मेंदू संशोधन प्रगत झाल्यानंतर असे शिथिलीकरण ध्यान आणि साक्षी ध्यान यांतील फरक स्पष्ट झाला.

डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religion meditation zws
First published on: 18-05-2020 at 01:50 IST