१९३६ साली कझाकस्तानात कम्युनिस्ट सरकार सत्तेवर येऊन पुढे ते सोव्हिएत युनियनमध्ये समाविष्ट झाले. दुसऱ्या महायुद्ध काळात सोव्हिएत युनियनमधील पश्चिमेकडील देशांमधील अनेक मोठी उद्योग केंद्रे जर्मन आघाडीने त्यांच्या कब्जात घेतली. त्या वेळी त्या देशामधील लोक जर्मनांना सामील होतील, त्यांना रशियाविरोधी मदत करतील असा संशय येऊन सोव्हिएत युनियन प्रमुखांनी तेथील लोकांना जबरदस्तीने पूर्वेकडील कझाकस्तानमध्ये स्थलांतर करावयास लावले. त्यानतर क्रिमीयन पोलीश, तातार, जर्मन वगैरे मिळून एकूण दीड लाखांहून अधिक लोक सक्तीने कझाकस्तानात रीहावयास आले. त्याचप्रमाणे १९६० ते १९७० च्या दशकात, निकिता क्रुश्चेव्ह हे सोव्हिएत प्रमुख असताना त्यांनी कझाकस्तानमधील मोठमोठी गवताळ कुरणे आणि ओसाड जमीनसुद्धा लागवडीखाली आणायची योजना आखली. अशा जमिनींवर गहू आणि इतर धान्याची शेती करण्यासाठी सोव्हिएत सरकारने रशियन आणि बिगर कझाख लोकांना अनुदानाचे आमिष दाखवून स्थलांतर करावयास लावले. असे २० लाख रशियन बिगरकझाख लोक या काळात कझाकस्तानात स्थलांतरित झाले. या परकीय स्थलांतरितांच्या वाढत्या प्रमाणामुळे या प्रदेशातल्या मूळच्या कझाख जमातीच्या लोकांचे प्रमाण केवळ ३० टक्क्यांवर आले, तर रशियन लोकांचे ४५ टक्के झाले. विशेषत: क्रुश्चेव्हना हे हवे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९४७ मध्ये सोव्हिएत रशियाने त्यांच्या अण्वस्त्र चाचण्यांसाठी इशान्य कझाकस्तानात अण्वस्त्र प्रकल्प सुरू केला. या ठिकाणी १९४९ मध्ये पहिल्या सोव्हिएत अणुबॉम्बची चाचणी झाली, पुढे १९८९ पर्यंतच्या काळात या ठिकाणी अशा शेकडो अण्वस्त्र चाचण्या पार पडल्या. या चाचण्यांचा विघातक परिणाम पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्यावर होऊन त्या विरोधात १९८१ मध्ये मोठी चळवळ सुरू झाली. सोव्हिएत रशियाने १९५० मध्ये त्यांच्या अंतराळ संशोधन कार्यक्रम सुरू करताना कझाकस्तानच्या ओसाड, वाळवंटीय क्षेत्रात पृथ्वीवरचे पहिले आणि सर्वांत मोठे असे बायकोनेर येथे कॉस्मोड्रोम म्हणजे अंतराळ प्रक्षेपण केंद्र बांधले. ही जागा कझाक सरकारने रशियाला २०५० पर्यंत भाडे कराराने दिली आहे. येथूनच १९५७ साली पृथ्वीच्या पहिल्या उपग्रह स्पुटनिक-१ चे प्रक्षेपण अंतराळात झाले. त्यानंतर १९६१ मध्ये वोस्तोक-१ हा पहिला मानवयुक्त उपग्रह युरी गागारीन या कॉस्मॉनॉटसह येथूनच अंतराळात प्रक्षेपण केला गेला. युरी गागारीन हा जगातला पहिला अंतरिक्ष प्रवासी बनला.

-सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia cosmodrome in kazakhstan in the soviet union west industry centers german akp
First published on: 22-10-2021 at 00:02 IST