पूर्वीच्या वायव्य सरहद प्रांतातील पठाण जमातीतील अब्दुल गफार खान ऊर्फ बादशाह खान हे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. १९१९ मध्ये रॉलेक्ट अ‍ॅक्टच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने केलेल्या आंदोलनात बादशाह खानांची महात्मा गांधींशी ओळख झाल्यावर प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ब्रिटिशविरोधी हालचाली वाढल्यामुळे ब्रिटिशांनी १९१९ मध्ये पेशावरात मार्शल लॉ लागू केला आणि बादशाह खानांना तीन वर्षे तुरुंगवास ठोठावला. १९३० साली त्यांनी काँग्रेसच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे ब्रिटिशांनी खान साहेबांना अटक करून गुजरातमधील तुरुंगात धाडले. तुरुंगात खानसाहेबांचा अनेक राजबंदींशी संबंध येऊन परिचय वाढला. या तुरुंगवासात खानसाहेबांनी शिखांचे धर्मग्रंथ, भगवद्गीता आणि कुराण या तिन्ही धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांची तुरुंगातील सहयोगी कैद्यांबरोबर धर्मनिरपेक्ष समाजसेवा आणि सर्वधर्म सहिष्णुतेविषयी वैचारिक देवाणघेवाण होत असे त्यामुळे इतरांवरही त्यांचा पगडा बसला.

१९३०च्या दशकात बादशाह खान हे महात्मा गांधींच्या निकटवर्ती सहकाऱ्यांपैकी आणि सल्लागारांपैकी एक झाले. १९४७ साली भारताचे विभाजन होईपर्यंत बादशाह खानांच्या खुदाई खिदमतगार या संघटनेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सक्रिय साथ दिली. बादशाह खानांचे राजकारण धर्मनिरपेक्ष होते तसेच स्वतंत्र भारत हा विभाजन न होता अखंड राहावा अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे त्यांना मुस्लीम लीगचा नेहमीच विरोध होता, फाळणीनंतर पाकिस्तानातील अल्पसंख्यांक पश्तून समाजाच्या हक्कांसाठी त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध पाकिस्तानमध्ये राहावे लागले. स्वायत्त पख्तुनिस्तानच्या मागणीसाठी त्यांनी तिकडे आंदोलन उभे केले. १९८७ साली भारत सरकारचा सर्वोच्च नागरी बहुमान ‘भारतरत्न’ याचे पहिले अभारतीय मानकरी अब्दुल गफार खान ऊर्फ बादशाह खान होते. १९८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवातही त्यांना विशेष आमंत्रण होते. पेशावर येथे २० जानेवारी १९८८ रोजी वयाच्या ९८व्या वर्षी अब्दुल गफार खानांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अंत्यविधी आणि दफन अफगाणिस्तानात जलालाबाद येथे झाले.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com