scorecardresearch

भाषासूत्र : भाषेचे सौंदर्य टिकवण्याचे कर्तव्य

‘दारू पिल्यावर तो आपल्या पत्नीला मारझोड करायचा’ या वाक्यातील सदोष शब्दयोजना ‘दारू पिल्यावर’ ही आहे.

यास्मिन शेख

पुढील वाक्य वाचा.. ‘दारू पिल्यावर तो आपल्या पत्नीला मारझोड करायचा’ या वाक्यातील सदोष शब्दयोजना ‘दारू पिल्यावर’ ही आहे. ‘पी’ या धातूची क्रियापदाची अशी रूपे इतकी ऐकायला मिळतात की विचारू नका? ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर उत्तर मिळते- ‘अहो, पण ती रूपे आता भाषेत इतकी रूढ झाली आहे, की ती स्वीकारायला काय हरकत आहे? आम्हाला ती चुकीची वाटत नाहीत.’

एक मात्र जाणवते, ते म्हणजे बोलताना अशा प्रकारची सदोष रूपे लोक योजत असले, तरी लेखनात अशी रूपे सहसा आढळत नाहीत याला कारण मुद्रक या चुका सुधारत असणार, हे नक्की.

पी (पिणे) हा ईकारान्त एकाक्षरी धातू आहे. आणखीही काही ईकारात एकाक्षरी धातू मराठीत आहेत. जसे- भी (भिणे), बी (बिणे), याशिवाय, एकाक्षरी एकारान्त धातू- ने (नेणे), घे (घेणे), ले (लेणे) (लेणे याचा अर्थ परिधान करणे), एकाक्षरी ओकारान्त धातू- दो (दोघे) या सर्व धातूची वर्तमानकाळाची रूपे नियमित होतात जसे- पी- पितो, पिते, पितात इत्यादी. नेतो, नेते, नेतात इत्यादी. हो (होणे), ‘तू पुढे हो’ मात्र इतर रूपे होतो, होतीस इत्यादी भूतकाळी रूपे आहेत. आणखीही वेगळी रूपे होतात, ती पाहू या.

अनियमित रूपे- या धातूने प्रत्यय लागून होणारी रूपे- पी (पिणे)- प्या, प्यालो, प्यालीस, प्यावे, प्यावी, प्यावेस, प्यायला इत्यादी. भी- (भिणे) – भ्या, भ्यावा, भ्यालो, भ्यालास, भ्यालीस, भ्याल्या, भ्यायला इत्यादी. वी (विणे)- गाय व्याली, व्याल्या, व्याव्यात, व्यावीस, व्यायता इत्यादी. ने (नेणे) – न्या, नेले, नेली, न्यावा, न्यावेस, न्यायी, न्यावीत, न्यायला इत्यादी. घे (घेणे)- घ्या, घ्यावा, घ्यावी, घ्याल, घ्यावे, घ्याव्यात, घ्यायला इत्यादी. ले (लेणे)- ल्या, ल्याली, ल्यावेत, ल्यावी, ल्यात, ल्यावेस, ल्यायला इत्यादी. हो (होणे)- भूतकाळी रूपे- (भी) होतो, होती, होतास, होते, इत्यादी.

 अनियमित रूपे- व्हा, व्हाल, व्हावा, हाव्या, इत्यादी.

 भूतकाळी अनियमित रूपे- झालो, झालीस, झालात, झाला, झाली, झाल्या, झालात, झाले इत्यादी. या अनियमित रूपांकडे दुर्लक्ष न करता योग्य रूपे वाक्यरचना करताना योजावीत. भाषेचे सौंदर्य आणि योग्य शब्दांचा वापर करून भाषेचे स्वरूप टिकवणे वा विद्रूप न करणे हे आपल्या सर्व भाषकांचे कर्तव्यच आहे

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Simple sentences in marathi marathi grammar zws