एडवर्ड डी बोनो यांनी ‘सिक्स थिंकिंग हॅट्स’ या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात लेखकानं विचारप्रक्रियांबद्दल लिहिलं आहे. आयुष्यात किती तरी निर्णय घ्यावे लागतात. हे सर्वच निर्णय खरोखरच महत्त्वाचे असतात. ‘चलता है’, ‘पुढे बघू या’ अशी वृत्ती ठेवली, तर कदाचित हातातला खूप महत्त्वाचा वेळ वाया जाण्याची शक्यता असते. योग्य निर्णय घेण्यासाठी विश्लेषण क्षमता विकसित व्हायला हवी. ही क्षमता विकसित झाली की, जास्तीत जास्त अचूक निर्णयापर्यंत जाता येतं. त्यासाठी बोनो यांनी सहा मुद्दे दिले आहेत. या मुद्दय़ांना प्रतीकात्मक रंग दिले आहेत. हे रंग बाजूला ठेवले, तरी मेंदूच्या डाव्या व उजव्या गोलार्धातल्या केंद्रांना स्पर्श करणारे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
(१) व्यवस्थापन : अनेक गोष्टी आसपास आहेत. त्या सगळ्या आपल्यासाठी नाहीत. त्यातली योग्य गोष्ट निवडून घ्यायची आहे. त्या योग्य गोष्टीकडे जाण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हा तो प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यातून वस्तुस्थितीची जाणीव होईल. या मुद्दय़ाचा रंग निळा आहे.
(२) माहिती : काय करायचं आहे, हे ठरल्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- आपल्याकडे पूर्ण माहिती हवी. नसेल तर ती गोळा करायला हवी. याला बोनो यांनी पांढरा रंग म्हटलं आहे.
(३) भावना : जे करायचं आहे, त्याबद्दल आपल्या मनात नक्की आतून काय भावना आहे, याचा शोध घेणं फार आवश्यक असतं. भावनांना त्यांनी लाल रंग संबोधलं आहे.
(४) वास्तववादी : एखादी कल्पना कितीही आवडली तरी ती वास्तववादी आहे का, हे तपासून बघायला हवं. काळा रंग यासाठी वापरला आहे.
(५) आशावादी प्रतिक्रिया : आपल्या मनातल्या विचारांकडे सकारात्मक दृष्टीनं बघता येणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी या मुद्दय़ाला पिवळा रंग दिला आहे.
(६) सर्जनशीलता : आपल्याला ज्या कल्पनेवर विचार करायचा आहे आणि नुसताच विचार नाही तर ती कल्पना प्रत्यक्षात उतरवायची असेल, तर कोणत्याही ठरीव चौकटीबाहेरचा, अगदी वेगळा विचार केला पाहिजे. हा हिरवा रंग.
विचारातून कोणत्याही कृतीकडे यायचं असेल, तर या सहा मुद्दय़ांपकी जास्तीत जास्त मुद्दय़ांवर वैचारिक खल करायला हवा.
– श्रुती पानसे
contact@shrutipanse.com