ग्वाल्हेरजवळ चंदेरी हे गाव मलमली काठ पदर आणि बुट्टय़ांची कलाकुसर असलेल्या साडय़ांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच ही साडी चंदेरी या नावाने ओळखली जाते. चंदेरीचं वैशिष्टय़ त्या साडीच्या किनारीत व बुट्टय़ात असतं. काठावर दोन समांतर पट्टे असतात आणि बहुधा ते सोनेरी रंगाचे असतात. या दोन पट्टय़ांत २२ ते ३० सें.मी. अंतर असते. बुट्टे दोन प्रकारचे असतात. चंदेरीच्या किनारीमध्ये हिरवी पाने विणलेली असतात, त्याला नागमोडी डिझाइन असते. जरीच्या बारीक रेषांची डिझाइन हे चंदेरीचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. किनारीचा एक पट्टा रुंद तर दुसरा अरुंद आणि त्यावर नक्षीकाम अशा पद्धतीनेही चंदेरी विणली जाते. जरीपट्टय़ावर विविध प्रकाराने बुट्टे विणतात. त्यात चक्र, पाने, इत्यादी वेगवेगळी डिझाइन्स विणलेली असतात.
चंदेरीच्या पदरावर बुट्टय़ांचं प्रमाण कधी कमी, तर कधी जास्त असते. चंदेरीत पांढरा, फिका गुलाबी, फिका हिरवा या रंगांना पूर्वी प्राधान्य होते. आता या रंगांबरोबर चांगली मागणी असल्यामुळे लाल, जांभळा असे गडद रंगही वापरले जातात. अतिशय कलात्मक आणि सौंदर्य टिकवून ठेवणारी तलम साडी असे चंदेरी साडीचे वर्णन केले जाते. उन्हाळ्यात चंदेरी साडी नेसणे हा एक सुखद अनुभव आहे. चंदेरी सूती आणि रेशमी अशा दोन्ही प्रकारच्या धाग्यांनी विणली जाते. सूती चंदेरीला सगळ्या सुती साडय़ांची राणी म्हणून ओळखले जाते. शुद्ध रेशमी चंदेरी साडी पूर्वी फक्त तुती रेशमाचा वापर करून विणायचे. आता इतर प्रकारचे रेशीम वापरून ही साडी विणतात. हाताने विणलेल्या चंदेरी साडीची किंमत जास्त असूनसुद्धा त्याला सतत मागणी असते. चंदेरी साडी जपून वापरावी लागते आणि तसे केल्यास ती भरपूर टिकते. ही साडी टिकण्यासाठी ती हँगरवर टांगून ठेवावी असा सल्ला देतात. चंदेरी साडीची नक्कल करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण तलमपणाबाबत कोणी बरोबरी करू शकले नाही.
चंदेरीसारखीच इंदौरी साडी असते. इंदौरीचा काठ, पदर चंदेरीसारखाच असला तरी अंगभर बुट्टे मात्र नसतात. इंदौरी साडय़ांवर पट्टे, चौकडी असे काही डिझाइन असते. इंदौरी आणि चंदेरी या मध्य प्रदेशात उत्पादित होणाऱ्या साडय़ा आहेत.

– दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थान जोधपूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य राजस्थानातील, राजधानी जयपूरच्या पश्चिमेकडे असलेले जोधपूर शहर हे राजस्थानातील सर्वात मोठय़ा राज्यक्षेत्राचे संस्थान होते. जोधपूर आणि आसपासच्या प्रदेशाला मारवाड म्हणत. मारवाड म्हणजे मृत्यूची भूमी! सतत पडणाऱ्या दुष्काळांमुळे मृत्यूच्या छायेत असलेली! राठोड राजपूत घराण्याचा वंशज चंदा हा दिल्लीच्या सुलतानाकडे सेनाधिकारी होता. १३८२ साली मारवाडातील तत्कालीन सर्वाधिक मोठे शहर मांडोरवर कब्जा करून त्याने आपले छोटे राज्य स्थापन केले. चंदाचा नातू राव जोधाने इ.स. १४५९ मध्ये जोधपूर हे गाव वसवून तिथे राजधानी केली. राव जोधाला २४ मुलगे आणि सात मुली. त्याच्या पुढच्या वंशजांनीच बिकानेर, रतलाम, किशनगढ, सितामाऊ, झाबुआ, इदार वगरे राज्ये स्थापन केली. राजस्थानात इतर कुठल्याही घराण्यापेक्षा राठोड वंशाचा विस्तार अधिक झाला. त्यांची लग्नेही त्यांच्याशी संबंधित राजघराण्यात किंवा मोगल बादशहांच्या तिमुर घराण्यातच झाली.
राठोड-मोगल युतीमुळे, विवाहसंबंधांमुळे मोगलांना मारवाडमधील राज्यांची युद्धांमध्ये मोठी मदत मिळाली; परंतु पुढे मोगल सल्तनतला उतरती कळा लागली आणि प्रबळ मराठय़ांच्या मोठमोठय़ा खंडण्यांच्या बोजामुळे जोरदार फटका बसलेल्या जोधपूर शासकांनी १८१८ साली कंपनी सरकारबरोबर संरक्षणाचा करार करून त्यांची तनाती फौज राखली. या युतीपासून जोधपूर राज्यकत्रे आणि ब्रिटिश हे परममित्र झाले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जोधपुरी लोकांनी ब्रिटिशांच्या बाजूने सन्यात मोठी मर्दुमकी गाजवली. बऱ्याच वेळी स्वत: महाराजे आघाडीवर लढले. ९३००० चौ.कि.मी. असे विशाल राज्यक्षेत्र असलेल्या जोधपूर संस्थानाला १७ तोफसलामींचा मान मिळाला.

सुनीत पोतनीस,sunitpotnis@rediffmail.com