चेकोस्लोव्हाकिया या भूतपूर्व राज्यसंघाची फाळणी १ जानेवारी १९९३ रोजी होऊन जे देश निर्माण झाले त्यापैकी एक स्लोव्हाकिया हा देश आहे. मध्य युरोपात भूवेष्टित असलेल्या या देशाच्या पूर्वेला युक्रेन, दक्षिणेला हंगेरी, उत्तरेला पोलंड, नैर्ऋत्येला ऑस्ट्रिया आणि वायव्येला चेक रिपब्लिक अशा चुत:सीमा आहेत. ५४ लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या या सार्वभौम देशाचे ब्राटीस्लाव्हा हे राजधानीचे शहर आहे. येथील ७६ टक्के जनता ख्रिश्चन धर्मीय आहे. पाचव्या सहाव्या शतकात या प्रदेशात स्लाव वंशीय जमाती स्थायिक झाल्या. हे स्लाव लोक स्लोव्हाकियाच्या प्रदेशातले मूळचे रहिवासी होत. दहाव्या शतकात स्लोव्हाकिया आणि शेजारचे बोहेमिया, मोराविया हे प्रांत ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्याचे भाग बनले. पहिल्या महायुद्धानंतर ते साम्राज्य लयाला गेले आणि नवजात स्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकियात सामील झाला. पुढे १९३८ ते १९४४ या काळात हा प्रदेश नाझी जर्मनीच्या अमलाखाली राहिला. १९४५ मध्ये तो सोव्हिएत युनियनमध्ये समाविष्ट केला जाऊन तिथे कम्युनिस्ट सरकार आले. ते गेल्यावर १९९३ साली चेकोस्लोव्हाकियाची फाळणी होऊन स्लोव्हाकिया हा स्वतंत्र देश निर्माण झाला. ब्ला दिमीर मेसियार हे त्याचे पहिले पंतप्रधान. फाळणी झाली असली तरी शेजारच्या चेक प्रजासत्ताकाशी स्लोव्हाकियाचे भावबंध आणि राजकीय संबंध जुळलेलेच आहेत, हंगेरी आणि पोलंड या शेजारी देशांचे सहकार्यही स्लोव्हाकियाला आहे. सध्या स्लोव्हाकिया हा युरोपातला एक विकसित देश असून त्याचा मानवी विकास निर्देशांक अति उच्च वर्गामध्ये येतो. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्लोव्हाकियाला जगातील १८७ देशांच्या क्रमवारीत ३८ व्या क्रमांकाचा श्रीमंत देश म्हणून स्थान दिले आहे. पूर्व आणि पश्चिम स्लोव्हाकियातील प्रादेशिकआर्थिक असमतोल असूनही देशातील एकंदर नागरिकांपैकी ९० टक्के लोकांची स्वत:ची घरे आहेत. सरकारतर्फे मोफत वैद्यकीय सेवा आणि शिक्षण दिले जाते. येथील मजबूत अर्थव्यवस्थेत औद्योगिक उत्पादनाचा मोठा वाटा आहे. स्वयंचलित वाहने आणि विद्युत उपकरणांचे उत्पादन हे येथील प्रमुख उत्पादन आहे. स्लोव्हाकियात ऑडी, फोक्सवॅगन, जग्वार, लॅण्ड रोव्हर, ह्य़ुंडाई मोबीस, किया मोटर्स अशा नामांकित वाहन उत्पादकांची शाखा उत्पादन केंद्रे आहेत. युरोपातील अनेक टी.व्ही. उत्पादकांची उत्पादनगृहे ब्राटीस्लाव्हामध्ये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slovakia country profile zws
First published on: 08-09-2021 at 01:31 IST