१९२२ मध्ये रशियाने बनविलेले अर्मेनिया, जॉर्जिया आणि अझरबैजान यांचे संघराज्य १९३६ पर्यंत टिकले आणि त्यानंतर या तिन्ही देशांचे वेगवेगळे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक म्हणजे सोव्हिएत युनियनमधील कम्युनिस्ट देश बनले. ही कम्युनिस्ट राजवट आल्यावर अर्मेनियन राजकीय आणि आर्थिक परिस्थितीला बऱ्यापैकी स्थैर्य आले. याआधीच्या शतकभरात सततचा संघर्ष, युद्धे यामुळे त्रस्त झालेल्या अर्मेनियन समाजाला औषधोपचार, अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा स्वस्त दराने मॉस्कोकडून होत राहिला. परंतु चर्च आणि इतर धार्मिक संस्थांना मात्र निधर्मी सोव्हिएत युनियनच्या काळात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागला.

पुढे लेनिनच्या मृत्यूनंतर जोसेफ स्टालिन सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचा जनरल सेक्रेटरी या सर्वोच्च पदी आला. दुसऱ्या महायुद्धकाळात अर्मेनियाच्या भूमीवर एकही लढाई झाली नाही; परंतु रशियाच्या लाल सेनेतून पाच लाख अर्मेनियन तरुण लढले आणि त्यापैकी पावणेदोन लाख मारले गेले! पुढे १९५३ साली स्टालिनचा मृत्यू झाला आणि सोव्हिएत युनियनच्या सर्वोच्च पदी निकिता क्रुश्चेव्ह यांची नियुक्ती झाली. स्टालिनच्या कार्यकाळात त्याने केलेली दडपशाही, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी क्रुश्चेव्ह यांनी बरीचशी शिथिल केली. चर्च आणि इतर धर्मसंस्थांवरची नियंत्रणे काहीशी रद्द केली. १९८० च्या दशकात तत्कालीन सोव्हिएत युनियन प्रमुख मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत रशिया आणि इतर देशांच्या सरकारी निर्णय आणि प्रशासकीय पद्धतीत सुधारणांसाठी अनेक योजना आखल्या. ‘ग्लास्नोस्त’ आणि ‘पेरेस्त्रोइका’ ही गोर्बाचेव्ह यांची राजकीय घोषणा होती. ग्लास्नोस्त म्हणजे कामकाजातला खुलेपणा आणि पारदर्शिता, तर पेरेस्त्रोइका म्हणजे पुनर्गठन किंवा पुनर्बाधणी. गोर्बाचेव्ह-कृत बदल लोकप्रिय ठरले, परंतु अर्मेनियाच्या स्वत:च्या काही समस्या होत्या. त्यातील एक होती वाढत्या प्रदूषणाची. सोव्हिएत युनियनच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अर्मेनियात प्रदूषण प्रचंड वाढले होते. तसेच शेजारच्या सोव्हिएत अझरबैजानच्या नागोर्नो या प्रांतात बहुसंख्येने असलेले अर्मेनियन लोक त्यांचा प्रदेश सोव्हिएत अर्मेनियात समाविष्ट करण्याची मागणी करीत होते.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com