नवदेशांचा उदयास्त : सोव्हिएत ताजिकीस्तान

सोव्हिएत युनियन स्थापन झाल्यावर सोव्हिएत ताजिकीस्तान १९२९ मध्ये सोव्हिएत युनियनचा घटक देश म्हणून सामील झाला.

सोव्हिएत सैन्य आणि बासमाची यांच्यात वाटाघाटींसाठी १९२१ मध्ये झालेल्या बैठकीचे छायाचित्र

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मध्य आशियातला आणि पूर्व युरोपातील मोठा प्रदेश रशियन झारने आक्रमण करून आपल्या साम्राज्यात जोडला. ताजिकीस्तानच्या बहुतांश प्रदेशावर बुखारा अमिरात आणि कोकांदच्या खानेतची सत्ता होती. १८८५ साली ताजिक प्रदेश झारच्या अमलाखाली आला. ताजिक प्रदेशात कापसाचे पीक मोठय़ा प्रमाणात येते. रशियाला त्यांची कापसाची गरज भागविण्यासाठी ताजिकीस्तान ताब्यात ठेवण्यात स्वारस्य होते. हा प्रदेश अमलाखाली आल्यावर त्यांनी ताजिक प्रदेशात धान्याची शेती बंद करून सर्वत्र कापसाची लागवड सुरू केली. मध्य आशियातील अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट सरकारे स्थापन झाली आणि त्यांच्यावर रशियातील बोल्शेविक पक्षाचे वर्चस्व होते. ताजिकीस्तानमध्येही हे बोल्शेविक कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले, परंतु बोल्शेविक सरकार स्थापन झाल्यावर या सरकारच्या साम्राज्यवादी धोरणांमुळे ताजिकीस्तानमधील पारंपरिक सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेत मोठे बदल झाले. ताजिकी जनतेत रशियाबद्दल, त्यांच्या निर्णयांबद्दल असंतोष पसरला. त्यामध्ये आणखी भर म्हणून रशियन साम्राज्याने १९१६ मध्ये पहिल्या महायुद्धकाळात ताजिकी तरुणांना रशियन सैन्यात भरती होण्याची सक्ती केली. विशेषत: तेथील तुर्की मुस्लीम जनतेला ही सक्तीची सैन्य भरती नको होती. रशियन साम्राज्याच्या सक्तीच्या सैन्यभरतीच्या आदेशाविरोधात ताजिकी जनतेने बासमाची या नावाने आंदोलन सुरू केले. या चळवळीने त्यांची स्वत:ची १६ हजार ताजिकी तरुणांची फौज तयार केली. बासमाची सैन्य आणि रशियन सैन्य यांच्यात वरचेवर चकमकी झडत, परंतु रशियन बोल्शेविक सैन्याने हे आंदोलन दडपशाहीने मिटविले. पुढे रशियन साम्राज्य कोसळल्यानंतर ताजिक लोकांचे १९२४ मध्ये ताजिक सोव्हिएत प्रजासत्ताक सरकार स्थापन झाले. सोव्हिएत युनियन स्थापन झाल्यावर सोव्हिएत ताजिकीस्तान १९२९ मध्ये सोव्हिएत युनियनचा घटक देश म्हणून सामील झाला.

१९२७ ते १९३४ या काळात सोव्हिएत युनियनने ताजिकीस्तानमध्ये सामूहिक शेतीचे धोरण अवलंबून इतर उद्योगांपेक्षा कापसाची मोठी लागवड करावयाची सक्ती केली. प्रजासत्ताक ताजिकीस्तानचे स्वतंत्र सरकार असले तरी त्यांच्यावर वर्चस्व होते सोव्हिएत युनियन प्रमुखांचे. जोसेफ स्टालीन सोव्हिएत युनियन प्रमुखपदी आल्यावर त्याने ताजिक समाजाचे रुसीकरण सुरू केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Soviet tajikistan transforming tajikistan zws

Next Story
इतिहासात आज दिनांक.. ११ सप्टेंबर
ताज्या बातम्या