ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या आणि स्पंजासारखा दिसणाऱ्या सच्छिद्र नैसर्गिक काचेला भूविज्ञानात ‘पमिस’ अशी संज्ञा आहे. या पाषाणाला ‘काच’ का म्हणतात हे समजून घेतले पाहिजे. तप्त शिलारस (मॅग्मा) थंड होऊन जेव्हा अग्निजन्य खडक भूपृष्ठाखाली, भूगर्भात खोलवर तयार होतो, तेव्हा तो अतिशय धिम्या गतीने थंड होतो. त्यामुळे त्यात असणाऱ्या खनिजांना स्फटिकरूप धारण करण्यास पुरेसा वेळ मिळतो. पण हाच शिलारस जेव्हा भूपृष्ठावर येतो, तेव्हा वातावरणातल्या ऑक्सिजनसमवेत त्याची अभिक्रिया होऊन त्याचे तापमान आणखी वाढते आणि शिलारसाचे रूपांतर लाव्हारसात होते.

शिवाय भूपृष्ठावर तापमान खूपच कमी असते. त्यामुळे तप्त लाव्हारस वेगाने थंड होतो. स्फटिक निर्माण झाले, तरी ते आकाराने सूक्ष्म असतात. अनेकदा ते नजरेला दिसतसुद्धा नाहीत. कधी कधी तर सूक्ष्म स्फटिक तयार होण्यासाठीसुद्धा वेळ पुरेसा नसतो. या परिस्थितीत जो पाषाण तयार होतो, त्याला ‘नैसर्गिक काच’ (नॅचरल ग्लास) म्हणतात. लाव्हारसाचे जे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोझिशन) असेल त्याप्रमाणे काही वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक काचा तयार होतात. लाव्हा थंड होऊन निर्माण झाल्याने अशा सर्व काचांची गणना ज्वालामुखीजन्य पाषाणांमध्ये केली जाते.

पमिस पाषाण निर्माण होताना लाव्हारस भूपृष्ठावर येताच त्यातून काही वायू मुक्त होऊन बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडतात. त्यामुळे सर्व द्रव फेसाप्रमाणे फुगतो आणि लगेच घनरूप धारण करतो. परिणामी सच्छिद्र, घनरूप पाषाण तयार होतो. फेस या अर्थाच्या ‘प्यूमेक्स’ या लॅटिन शब्दावरून या पाषाणाला पमिस हे नाव पडले आहे. हा खडक सच्छिद्र असल्याने हलका असतो. तो पाण्यावर तरंगतो.

लाव्हारसांचे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन) निरनिराळे असू शकते. सहसा ज्या लाव्हारसात सिलिकाचे प्रमाण अधिक असते, त्या लाव्हारसापासून पमिस पाषाण निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. पण क्वचित सिलिकाचे प्रमाण कमी असलेल्या लाव्हारसापासूनही तो निर्माण होऊ शकतो. पमिस रंगाने पांढुरका, पिवळसर किंवा करड्या रंगाचा असतो.

भारतीय द्वीपकल्पात महाराष्ट्रात आणि अन्यत्र, फार मोठ्या क्षेत्रात जो काळा कातळ आढळतो, त्याच्या समवेत आढळणारा पमिस काळा असतो. तो गुजरातमध्ये पंचमहाल जिल्ह्यातल्या पावागडजवळ सापडतो. पमिसच्या या काळ्या प्रकाराला ‘रेटिक्युलाइट’ असे म्हणतात. पावागडजवळ याचे लहान तुकडे जमिनीवर पसरलेले आढळतात. हा पाषाण एखादा खडबडीत पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी अपघर्षक (अॅब्रॅजिव्ह) म्हणून वापरला जातो. शिवाय उष्णता निरोधक अथवा ध्वनी निरोधक भिंती तयार करण्यासाठीही याचा वापर करतात.

प्रा. प्रकाश कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org