जॉन्स जेकब बर्झीलियस (२० ऑगस्ट १७७९- ७ ऑगस्ट १८४८), आधुनिक रसायनशास्त्राच्या पायाभरणीतले एक अग्रणी! या स्वीडिश शास्त्राज्ञाचा जन्म लिनकोयिपगजवळील व्हॅव्हरसुंड सॉरगार्ड इथला. १८०२ साली अप्साला विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीयशास्त्रात पदवी मिळवली. १८०७ साली ते स्टॉकहोम येथील कॅरोलिन्स्का संस्थेत वैद्यक व औषधनिर्मितिशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १८०८मध्ये ते रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून निवडून आले आणि १८१८ ते १८४८ सालापर्यंत, त्यांनी स्वीडिश अकॅडमीचा सचिव म्हणून कार्यभार सांभाळला. अकॅडमीसाठी हा अत्यंत यशस्वी असा काळ होता.

बर्झीलियसना खनिज विज्ञानात व अकार्बनी रसायनशास्त्रात विशेष रुची होती. त्यांनी १८०३मध्ये सिरीयम मूलद्रव्याचा शोध लावला. सेलेनियम या मूलद्रव्याचा शोध त्यांनी १८१७ साली तर थोरियम या मूलद्रव्याचा शोध त्यांनी १८२८ साली लावला.

बर्झीलियसनी रासायनिक प्रयोगांच्या वेळी मूलद्रव्ये अथवा संयुगांचा उल्लेख करण्यासाठी एक सुटसुटीत पद्धत निर्माण केली. एखाद्या मूलद्रव्याचे पूर्ण नाव लिहिण्याऐवजी त्याच्या लॅटिन भाषेतील नावाच्या आद्याक्षराचा वापर त्यांनी  केला. जसे, ऑक्सिजनसाठी O, पोटॅशिअमसाठी K. जर दोन किंवा अधिक मूलद्रव्यांची नावे एकाच आद्याक्षराने सुरू होत असतील तर आद्याक्षर आणि त्यापुढील अक्षर त्यांनी उपयोगात आणले, जसे Fe. त्यांच्यातील प्रमाण दर्शविण्यासाठी त्यांनी अंकांची मदत घेतली. ही पद्धत थोडय़ाफार फरकाने आतासुद्धा वापरात आहे. फरक इतकाच की त्यांच्या पद्धतीत प्रमाण दर्शविणारा अंक वरती लिहायचे, उदा. Fe2O3. आताच्या पद्धतीत तो आपण खाली लिहितो, Fe2O3.. या पद्धतीमध्ये अणुभारही कळतो आणि मूलद्रव्यांचे प्रमाणसुद्धा समजते. तसेच त्यांनी अनेक काटेकोर प्रयोग करून मूलद्रव्यांच्या अणुभाराचे निश्चितीकरण केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक संयुगांचे भारात्मक विश्लेषण करून त्यांनी एक सापेक्ष अणुभारांचा तक्ता तयार केला. त्यासाठी त्यांनी ऑक्सिजनचा संदर्भ घेऊन त्याकाळी ज्ञात असलेल्या ४९ मूलद्रव्यांपैकी ४५ मूलद्रव्यांच्या अणुभारांचे अचूक निदान केले. वेगवेगळ्या अणूंचे एकमेकांशी संयोग पावण्याचे प्रमाण व अणुभारांचे हे कोष्टक १८२८मध्ये प्रसिद्ध झाले.

– डॉ. तनुजा प्र. परुळेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org