scorecardresearch

कुतूहल : ध्वनिप्रदूषणाचा पहिला अभ्यासक

आपल्या शोधनिबंधात ‘लोहारांना सतत मोठा आवाज ऐकल्याने बहिरेपणा येतो’, असे त्यांनी म्हटले होते.

वायू, जल आणि मृदा याचबरोबर प्रदूषणाचा आणखी एक प्रकार म्हणजे ध्वनी प्रदूषण. वाढत्या शहरीकरणाबरोबरच मानवाच्या बेताल वर्तनाचा हा एक विघातक परिणाम म्हणायला हवा. आंतरराष्ट्रीय मानकानुसार ध्वनीची तीव्रता ४५ डेसीबलपर्यंत मर्यादित असणे आवश्यक आहे. पण आपल्या शहरांमधील आवाजाची तीव्रता कधीच ५० डेसीबलपेक्षा कमी नसते.

एक गोष्ट मात्र खरी आहे, की ध्वनिप्रदूषण कमी करणे सोपे आहे. तसे प्रयत्न आपल्याकडे केले जातात आणि पाश्चिमात्त्य देशांमध्ये असे प्रयत्न फार पूर्वीच केल्याचे दाखले इतिहासात आढळतात. अगदी ख्रिस्तपूर्व पाचव्या-सहाव्या शतकात ग्रीसमध्ये आवाजाचा त्रास नको म्हणून भांडी तयार करण्याचे कारखाने, लोहारांची दुकाने गावाच्या वेशीबाहेर थाटली जात.

ध्वनिप्रदूषणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे सांगणारा पहिला अधिकृत संदर्भ १८३१ साली ‘लॅन्सेट’ या शास्त्रीय शोधनियतकालिकात प्रकाशित झालेल्या डॉ. जॉन फॉस्ब्रोक यांच्या शोधनिबंधात आढळतो. आपल्या शोधनिबंधात ‘लोहारांना सतत मोठा आवाज ऐकल्याने बहिरेपणा येतो’, असे त्यांनी म्हटले होते. मात्र ध्वनिप्रदूषणामुळे आपल्या कानांवर होणाऱ्या परिणामांचा मोजमापनासह अभ्यास पहिल्यांदा केला तो डॉ. थॉमस बार यांनी.

डॉ. थॉमस बार यांचा जन्म १८४६ मध्ये स्कॉटलंड इथल्या ग्लासगो शहरात झाला. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच शल्यप्रक्रियेचेसुद्धा शिक्षण घेतले. त्यांनी १८७० मध्ये ग्लासगो विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे त्यांचे वैद्यकीय शिक्षण हे जोसेफ लिस्टर या प्रख्यात संशोधक आणि शल्यचिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली झाले.

१८७७ मध्ये कानांच्या आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात डॉ. बार यांनी शल्यचिकित्सक म्हणून कामाला सुरुवात केली आणि तेथे ते ३८ वर्षे कार्यरत होते. पण याच काळात त्यांनी  स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये अनेक वैद्यकीय महाविद्यालयांतून व्याख्याने दिली आणि अनेक प्रतिष्ठित पदांवर कामही केले. त्याचबरोबर कानाच्या आजारांविषयी अनेक संशोधन निबंधही लिहिले.

१८८६ मध्ये डॉ. बार यांनी ध्वनिप्रदूषणाचा आपल्या ऐकू येण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, याविषयी संशोधन करून शोधनिबंध प्रसिद्ध केला. या संशोधनात त्यांनी बॉयलर निर्मात्यांच्या श्रवणशक्तीचा अभ्यास केला. सामान्य श्रवणक्षमता असणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत त्यांची श्रवणक्षमता १० पटींनी कमी झाल्याचे डॉ. बार यांना आढळले. सतत मोठा आवाज कानावर पडल्याने श्रवणशक्ती कमी होत जाते, हे प्रत्यक्ष मोजमापनाने सिद्ध करणारे हे पहिले संशोधन मानले जाते. 

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The first scholar of noise pollution zws

ताज्या बातम्या