मध्य आशियातल्या अत्यंत गरीब देशांमध्ये दुसरा क्रमांक असलेला किर्गिजस्तान हा एक विकसनशील देश आहे. किर्गिजस्तानची भूमी युरेनियम, सोने, दगडी कोळसा, अँटिमनी वगैरे खनिज धातूंनी समृद्ध असल्यामुळे या खनिजांच्या खाण उद्योगाचा या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे आणि तसेच त्यामुळे तेथील रोजगार वाढले आहेत. परंतु या देशात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे अगदी तुटपुंजे साठे असल्यामुळे त्यावर त्यांची स्वत:ची गरजही भागत नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टील, लोखंड, रसायने, यंत्रसामुग्री या वस्तू यांना आयात कराव्या लागतात आणि त्यांचे चीन, जर्मनी, रशिया, कझाकस्तान या देशांशी व्यापारी संबंध आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळचे तुर्की असलेल्या या किर्गिज लोकांच्या जीवनशैलीवर आणि संस्कृतीवर इराणी, मंगोलीयन आणि रशियन संस्कृतींचा मोठा प्रभाव आजही दिसून येतो. किर्गिजस्तानच्या प्रदेशातून गतकालीन प्रसिद्ध सिल्क रोड हा व्यापारी मार्ग जात होता, तसेच इराण, रशिया, चीन या महासत्तांशी संबंध आल्यामुळे या प्रदेशात विभिन्न संस्कृतींचे लोक स्थायिक झाले तसेच अनेक परकीय सत्तांच्या अमलाखालीही हा प्रदेश राहिला आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात सुरुवातीला या प्रदेशात प्रथम शक टोळ्यांनी वसती केली. सहाव्या सातव्या शतकात येथे स्थलांतरित झालेल्या किर्गिज टोळ्यांनी येथे राज्ये स्थापन केली. यापैकी उग्गूर हे राज्य अधिक प्रबळ होते. अरबांशी व्यापार करणाऱ्या तुर्की व्यापाऱ्यांमार्फत इ.स.च्या सातव्या शतकापासून किर्गिज लोकांमध्ये इस्लाम रुजला आणि पुढे वेगाने पसरला. १२व्या शतकाच्या अखेरीस मंगोल टोळ्यांनी किर्गिज टोळ्यांवर हल्ले करायला सुरुवात केली आणि त्यामुळे उत्तरेतील किर्गिज वस्त्या दक्षिण प्रदेशात जाऊ लागल्या. पुढे १२०७ साली किर्गिज लोकांची सर्व राज्ये घेऊन मंगोल सम्राट चंगेज खानाने हा प्रदेश त्याच्या अमलाखाली आणला. १४व्या शतकाच्या अखेरीस चंगेज खानाच्या साम्राज्याच्या अस्तानंतर येथे पुन्हा किर्गिज लोकांची सत्ता प्रस्थापित झाली. पुढे १७ व्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ओईरात या मंगोल टोळीची, नंतर चिनी मांचु साम्राज्याची आणि पुढे उझबेक खानतीचे आधिपत्य किर्गिझ प्रदेशावर राहिले. या सर्व सत्तांतरांमध्ये उत्तरेतील किर्गिज लोक अधिकाधिक दक्षिणेकडे येऊन तिथे स्थिरावले. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com   

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The second poorest country in central asia kyrgyzstan developing countries akp
First published on: 02-11-2021 at 00:19 IST