‘अग्निमय हवा’

इंग्लिश संशोधक जोसेफ प्रिस्टली हा वेगवेगळ्या प्रकारच्या ‘हवे’च्या प्रकारांचा म्हणजे वायूंचा अभ्यास करत होता.

इंग्लिश संशोधक जोसेफ प्रिस्टली हा वेगवेगळ्या प्रकारच्या ‘हवे’च्या प्रकारांचा म्हणजे वायूंचा अभ्यास करत होता. १७७१ सालाच्या सुमारास केलेल्या एका प्रयोगात त्याने हवाबंद चंबूत एक छोटे झाड आणि जळती मेणबत्ती ठेवली. काही काळातच अपेक्षेनुसार ही मेणबत्ती विझली. महिन्याभराच्या काळानंतर त्याने भिंगाच्या मदतीने सूर्यकिरण एकत्रित करून चंबूतील मेणबत्ती पेटते का पाहिले. आता मात्र ही मेणबत्ती सहजपणे जळू शकली. प्रिस्टलीने यावर मत व्यक्त केले – ‘‘जिवंत झाडं हवेत काही बदल घडवून आणतात!’’.

इ.स. १७७४चा ऑगस्ट महिना! जोसेफ प्रिस्टलीने आपल्या पुढच्या प्रयोगात, एका हवाबंद चंबूत मक्र्युरिक ऑक्साइड (पाऱ्याचा ऑक्साइड) ठेवला. त्यानंतर त्याने भिंगाच्या साह्य़ाने सूर्यकिरण एकत्रित करून या मक्र्युरिक ऑक्साइडला उष्णता दिली. या तापलेल्या मक्र्युरिक ऑक्साइडमधून एक वायू बाहेर पडू लागला. तसेच चंबूतली पेटवलेली मेणबत्ती अतिशय तेजस्वीपणे जळू लागली. जोसेफ प्रिस्टली हा तेव्हा प्रचलित असलेल्या फ्लॉजिस्टॉन सिद्धांताचा समर्थक होता. या सिद्धांतानुसार जेव्हा एखादी वस्तू जळते, तेव्हा त्यातून फ्लॉजिस्टॉन नावाचा पदार्थ बाहेर पडतो. प्रिस्टलीच्या निष्कर्षांनुसार मक्र्युरिक ऑक्साइडला उष्णता मिळाल्यानंतर त्यातून फ्लॉजिस्टॉनचा अभाव असलेली हवा निर्माण झाली. या हवेत फ्लॉजिस्टॉन नसल्यामुळे मेणबत्तीतील फ्लॉजिस्टॉन अधिक सहजपणे बाहेर आला व मेणबत्ती अधिक जोमाने जळू लागली. फ्लॉजिस्टॉन सिद्धांताचा विरोधक असणाऱ्या लॅव्हॉयजेने मात्र प्रिस्टलीने नवा वायू तयार केल्याचे ओळखले. विविध पदार्थाशी संयुग पावून आम्लाची निर्मिती करू पाहणाऱ्या या ‘हवे’ला लॅव्हायजेने ‘ऑक्सिजन’ म्हणजे आम्ल तयार करणारा हे नाव दिले.

जोसेफ प्रिस्टलीने आपला हा शोध १७७४ साली जाहीर केला, परंतु जर्मनीच्या कार्ल शीलने याच्या दोन वष्रे अगोदर मँगनिज डायऑक्साइडवर सल्फ्युरिक आम्लाची क्रिया करून, तसेच मक्र्युरिक ऑक्साइडसारखे पदार्थ तापवून ऑक्सिजनची निर्मिती केली होती. ज्वलन घडवून आणणाऱ्या या वायूला कार्ल शीलने ‘फायर एअर’ (अग्निमय हवा) असे संबोधले. कार्ल शीलने हे संशोधन जरी जोसेफ प्रिस्टलीच्या अगोदर केले असले तरी, हे संशोधन जाहीर झाले ते १७७७ साली. जोसेफ प्रिस्टलीच्या अगोदर शोध लावल्यामुळे, या शोधावर भाष्य करताना अनेक इतिहासकार जोसेफ प्रिस्टलीबरोबर कार्ल शीलचेही नाव घेतात.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Theologian joseph priestley

ताज्या बातम्या