सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

तुर्कमेनिस्तान हा मध्य आशियातला कझाखस्ताननंतरचा क्षेत्रफळाने मोठा असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश तेथील मोठय़ा वाळवंटीय क्षेत्रामुळे अतिशय विरळ वस्तीचा आहे. वाळवंटीय प्रदेश मोठा असला तरी येथे अनेक मोठे ओअ‍ॅसिस असल्यामुळे त्यांच्या परिसरातल्या वस्त्यांना पाण्याची सुविधा मिळाली आहे. मव्‍‌र्ह हे ओअ‍ॅसिस- जवळचे प्राचीन शहर चीनकडून येणाऱ्या प्रसिद्ध व्यापारी रेशीम मार्गावरील महत्त्वाचा थांबा म्हणून प्रसिद्ध होते. काही काळ ते तत्कालीन जगातले सर्वात मोठे आणि समृद्ध शहर होते. इ. स. पूर्व काळात अलेक्झांडर दी ग्रेट याने मध्य आशियातला बराच प्रदेश घेतला, त्यामध्ये सध्याचा तुर्कमेनिस्तानही होता. सातव्या शतकात अखेरीस हा प्रदेश अरबांच्या वर्चस्वाखाली गेला आणि त्यांनी तेथील बहुसंख्य लोकांना सक्तीने इस्लाम स्वीकारायला लावला. पुढे १० व्या ते १३ व्या शतकात सध्याच्या तुर्कमान लोकांचे पूर्वज ओगुझ या भटक्या जमातीचे लोक या प्रदेशात स्थायिक झाले आणि मंगोलियन आक्रमक चेंगीजखान याने हा प्रदेश घेतल्यावर मंगोल टोळ्यांनीही येथे स्थलांतर केले. १५ वे ते १७ वे अशा तीन शतकांत तुर्कमेनिस्तानशेजारच्या प्रदेशातील सत्तांनी अनेक वेळा तुर्कमान आणि मंगोल जमातींच्या वस्त्यांवर हल्ले करून त्यांना बेजार करून सोडले होते. परंतु त्यातून तुर्कमेनिस्तानच्या दक्षिणकेडील प्रदेश तत्कालीन पर्शियन राजवटीच्या अमलाखाली, तर उत्तरेकडील प्रदेश उझबेकिस्तानच्या बुखारा राजवटीच्या अमलाखाली गेला. १८ व्या शतकात तुर्कमान जमातीच्या टोळ्यांचा संबंध रशियन लोक आणि त्यांच्या झार साम्राज्याशी येऊ लागला. १८६९ मध्ये झारने तुर्कमेनिस्तानी प्रदेशात कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावर दोन बंदरे बांधली आणि उत्तरेतल्या बुखारा उजबेक राजवटीच्या क्षेत्रावर आक्रमण करून तो प्रदेश त्यांच्याकडून मुक्त केला. पुढे दक्षिणेकडचा मुलूख घेण्यासाठी रशियन सैन्याने केलेल्या आक्रमणाला तुर्कमान आणि इराणच्या तुटपुंज्या सैन्याने मोठा प्रतिकार केला. अखेरीस १८८१ साली झालेल्या तुंबळ युद्धात रशियाने तुर्कमान आणि इराणचा प्रतिकार निपटून संपूर्ण तुर्कमेनिस्तान रशियन झारच्या साम्राज्यात समाविष्ट केला. १९१६ साली पहिल्या महायुद्धात रशियाने भाग घेतला परंतु त्या वेळी तुर्कमेनिस्तानच्या सर्व तरुणांना लष्करात सक्तीने भरती व्हावे लागले, त्याविरोधात लोकांनी बंड, निदर्शने केली.