आपल्या जीवनातून साखर काढून टाकली तर? असा विचार करून पाहा. सर्व जीवनच नीरस, अगोड वाटायला लागेल. शिवाय हेही महत्त्वाचं आहे की, सर्व सजीवांना कबरेदकांपासून ऊर्जा मिळते आणि त्यात साखरेची भूमिका महत्त्वाची आहे.   
आपण घरात जी साखर वापरतो, ती म्हणजे सुक्रोज. पाण्यात विरघळणाऱ्या कबरेदकांना शर्करा म्हणतात. सुक्रोज ही शर्करा आहे. आपल्याकडे मुख्यत: ऊसापासून साखर तयार केली जाते. तसं पाहायला गेलं तर सर्व वनस्पतींत साखर कमी-अधिक प्रमाणात असते, परंतु ऊस आणि बीट या वनस्पतींत साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं या वनस्पतींतून साखर मिळवणं जास्त फायदेशीर आहे.
ऊस तोडल्यावर लगेच त्यावर प्रक्रिया सुरू करावी लागते, नाही तर त्यातील सुक्रोजचे रेणू तुटायला लागतात. त्यामुळे ऊस साठवून ठेवता येत नाही. उसाच्या रसावर अनेक प्रक्रिया करून स्फटिक रूपात साखर मिळवितात. साखर जेव्हा उसात असते, तेव्हा सुक्रोजबरोबर त्यात मॅग्नेशिअम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे महत्त्वाचे घटक असतात. ऊस पिळून रस काढल्यानंतरही हे घटक त्यात शाबूत असतात. जेव्हा त्यांचं शुद्धीकरण करून स्फटिकीकरण केलं जातं, त्या वेळेस हे घटक नाश पावतात.    
आपल्या शरीरात सुक्रोजचं पचन आणि सात्मीकरण(अ‍ॅसिमिलेशन) सहजपणे होतं. पण सुक्रोजच्या पचनासाठी मॅग्नेशिअम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक आवश्यक असतात.  साखरेबरोबर हे घटक नसतील तर शरीरातील इतर भागांतून हे क्षार घेतले जातात आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे स्फटिकीकरण केलेल्या साखरेचे पदार्थ खाताना जरा जपूनच खावेत.  
आपल्या शरीरात ग्लुकोजच्या स्वरूपात साखर असते आणि आवश्यकतेनुसार शरीराला ऊर्जा पुरवली जाते. एक ग्रॅम सुक्रोजपासून ३.९४ कॅलरी ऊर्जा मिळते. घरगुती आणि औद्योगिक खाद्यपदाथार्र्त (सरबते, फळांचे रस, बेकरी उत्पादने, इत्यादी) चवीसाठी साखर वापरली जाते. स्वादाप्रमाणेच पदार्थ टिकविण्यासाठी म्हणजे परिरक्षक म्हणूनही साखरेचा वापर केला जातो. उदा. मुराम्बा, मोरावळा, इत्यादी. साखरेचा वापर फक्त खाद्यपदार्थातच नाही तर इतर उद्योगांतही केला जातो. साखरेवर रासायनिक प्रक्रिया करून हजारो पदार्थ तयार करतात. प्लास्टिक, औषधनिर्मिती, शीतपेये, सिमेंट, विद्युतविलेपन, गोंद, चर्मोद्योग, स्फोटक पदार्थ, शवसंलेपन, खते अशा अनेक उद्योगांत साखरेचा उपयोग होतो.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – राशोमान : सत्याचे प्रयोग
राशोमान हा चित्रपट अकिरा कुरोसावा या जपानी दिग्दर्शकानं १९५० साली प्रदर्शित केला आणि एक महाकाव्याच त्यानं चित्रपटबद्ध करून आपल्यासमोर मांडलं.
राशोमान पाहिल्यावर आपण खूप अस्वस्थ होतो, चिंताग्रस्त होतो, भयभीत होतो आणि मनाची ही ढवळाढवळ अखंड चालू राहते. ‘राशोमान’ची गोष्ट म्हणाल तर पाच-सहा ओळीत सांगता येईल. काळ १२०० जपान पावसात सर्वसाधारण माणूस (प्रेक्षक?) लाकूडतोडय़ा आणि धर्मोपदेशक एका भल्या मोठय़ा पण पडक्या महादरवाजाचा आसरा घेतात. गप्पा मारता मारता जंगलात घडलेल्या एका खुनाविषयी बोलू लागतात.
गोष्ट बलात्कार झालेल्या स्त्रीची, तिचा पती आणि डाकू यांच्याभोवती फिरते. राजाच्या दरबारात नेमकं काय घडलं याचा खटला चालू होतो. स्त्री, डाकू आणि खून झालेल्या व्यक्तीचा संचार झालेली स्त्री त्या घटनेचं वेगवेगळं वर्णन करतात. कर्मधर्मसंयोगाने त्या लाकूडतोडय़ाने ही घटना पाहिलेली असते. एकाच घटनेच्या चार चक्षुर्वैसत्यम् कथनातील नेमकं सत्य कोणतं? याचा शोध चित्रपटात घेतलेला आहे. कुरोसावाची कथनं कधीच एकसुरी नसतात, पण राशोमानमध्ये प्रत्येक पात्राच्या निवेदनातला सच्चा सूर अंगावर येतो. त्यातल्या चारही गोष्टी पटतात, असंच नक्की घडलं असावं, असं आपण म्हणतो.
कुरोसावाने या चार पात्रांची योजना अतिशय नेमकेपणानं केलेली आहे.
सर्वसामान्य माणूस म्हणजे जगातल्या घटनांकडे पाहत सत्य शोधणारा. आपण.
लाकूडतोडय़ा प्रसंगाकडे प्रत्यक्ष पाहणारा, सामील न होणारा आणि वेळ पडली तरच वाचा फोडणारा भयग्रस्त माणूस.
धर्मोपदेशक म्हणजे जीवनातली चिरंतन मूल्यं कोणती? मानवीयता म्हणजे काय? काय आहे यापेक्षा कसं असावं, असा विचार करणारी संस्था.
प्रत्यक्ष खून झालेला माणूस तोच फक्त सत्य सांगतो का? की त्याचंही सत्य म्हणजे त्याच्या समजुती आणि मानसिकतेतून त्याला दिसलेलं वास्तव? की त्यालाच खरा इतिहास ठाऊक?
राशोमान हा खऱ्या अर्थाने सत्याचे प्रयोग आहे. प्रयोग करीत राहू, पण सत्य सापडतं का? की सत्य म्हणजे स्वत:ची सोयीस्कर फसवणूक? असे प्रश्न उपस्थित करून एका होकारात्मक शेवटापाशी येऊन चित्रपट थांबतो.
सत्य हे दुर्गम असतं, कारण ते आपण घटनेत शोधतो. एखाद्या प्रसंगात काय घडलं तिथे शोधतो. सत्य तिथेच असतं की, आणखी कुठे? माणसाच्या मनात, मनोवृत्तीत? क्रूरतेमध्ये की कारुण्यामध्ये? चित्रपट संपतो तेव्हा त्या भव्य परंतु मोडकळीस आलेल्या महादरवाजाची फ्रेम दिसते आणि तिच्यापासून दूर प्रेक्षकांच्या दिशेनं चित्रपटातील नव्या विचाराचं बाळ (आणि बाळकडू)चालताना दिसतं.
राशोमानमधले संवाद मनात कडू सत्याचे थरार निर्माण करतात.
– माणूस इतका क्रूर झालाय की इथून सैतानही घाबरून पळालाय..
– माणसं घाबरट असतात, माणसंच ती. ते कोणालाही सत्य सांगू शकत नाहीत. स्वत:लाही.
– कोणी खरंच, खरंखुरं चांगलं असतं का? की चांगुलपणा हे एक स्वप्नरंजन आहे.
– माणसाला वाईट घटना विसरायच्या असतात, म्हणून तो खोटय़ा खोटय़ा छान छान गोष्टी रचतो. जगणं सोपं होतं, त्यामुळे!!
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

प्रबोधन पर्व  – तपासणी करण्याच्या स्वातंत्र्यामुळेच मते धसाला लागतील
‘‘कलांच्या व्यवहारात स्वातंत्र्य हे कलामूल्य नव्हे आणि वैचारिक व्यवहारात स्वातंत्र्य हे सत्य आणि समर्थन ह्य़ांचे रूप नव्हे. केवळ एक विचार इतर सर्वाच्यापेक्षा निराळा आणि स्वतंत्र आहे, इतक्यामुळे तो खरा अगर समर्थनीय ठरत नाही. किंवा एखादी कलाकृती केवळ स्वतंत्र आहे म्हणून श्रेष्ठ ठरत नाही. असे जर असेल तर कलावंताचे स्वातंत्र्य आणि विचारवंतांचे स्वातंत्र्य ह्य़ांचा आग्रह धरण्याचे कारण काय?.. स्वातंत्र्य असल्याशिवाय कोणता विचार खोटा आहे ह्य़ाची पारख करता येत नाही. सत्याचे समर्थन करता येत नाही, म्हणून हे स्वातंत्र्य हवे असते. स्वातंत्र्यामुळे कलाकृती श्रेष्ठ होत नाही, पण स्वातंत्र्य नसेल तर कलावंताला आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहून आविष्कार करणे अशक्य झाल्यामुळे चांगल्या कलाकृतींची निर्मिती अशक्य होते. म्हणून स्वातंत्र्याचा आग्रह असतो.’’ नरहर कुरुंदकर ‘अभयारण्य’ (१९८५) या पुस्तकातील ‘स्वातंत्र्य आणि जबाबदारी’ या लेखात म्हणतात – ‘‘समाजामध्ये व्यक्तींना जो स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला असतो त्याचा गैरफायदा काहीजण घेणारच, कारण स्वार्थ ही सर्वसाधारण प्रवृत्ती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीजण दिशाभूल करून नवी असत्ये फैलावण्याचे काम करणारच, पण त्याबरोबरच स्वातंत्र्य असले म्हणजे प्रत्येक बाबीची सर्वागीण तपासणी चालू असते.  म्हणून स्वातंत्र्य असताना जी विधाने अबाधित राहतात त्यांच्यावर समाजाला विश्वास ठेवावाच लागतो. जेव्हा आपण विचार-स्वातंत्र्य काढून घेतो, तेव्हा खरेखोटेपणाची चर्चाच समाप्त झालेली असते. चुका दाखवता येत नाहीत, पटवूनही देता येत नाहीत. म्हणून ज्या समाजात विचार-स्वातंत्र्य काढून घेतले जाते त्या समाजात क्रमाने अंधश्रद्धा वाढत जाते व अशा समाजात सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कोणत्याही विधानाची विश्वसनीयता ढासळून जाते. शासनाच्या निरनिराळ्या भूमिकांविषयी समाजातील विश्वसनीयता ढासळणे सर्वाच्याच दृष्टीने धोक्याचे असते आणि म्हणून लोकशाहीचा खरा आधार अबाधित ठेवायचा असेल तर जनतेला शासनातील व शासनाबाहेर कुणाच्याही मताची तपासणी करण्याचे स्वातंत्र्य उपभोगायला मिळावे लागते.’’