पिकांपासून धान्य काढल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पिकांचे अवशेष शेतामध्ये उपलब्ध असतात. पिकांचे अवशेष तसेच भुस्सा यांचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. गव्हाची काढणी करताना लाखो टन चारा शेतात पडतो. हा चारा यंत्राच्या साह्याने गोळा करून त्याचे ब्लॉक शेतातच तयार करून, पाहिजे तेथे वाहातूक करता येईल. पिकाचे अवशेष बारीक करून त्यावर प्रक्रिया केल्यास त्याचा जनावरांना खाद्य म्हणून वापर करता येईल. अर्थात या पिकांच्या अवशेषांमध्ये पौष्टिक गुणधर्म कमी असल्यामुळे त्यापासून परिपूर्ण खाद्य बनविण्यासाठी विविध घटकांचा वापर करावा. त्यामध्ये विविध धान्याची चुनी, तेलबियांच्या पेंडी, मका, खनिज मिश्रण आणि मीठ यांचा एकत्रित वापर केला तर जनावरांना पाहिजे असलेला आहार सहज देता येतो.
उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा कमी होत असल्यामुळे जनावरांना लागणारी प्रथिने आणि इतर अन्नघटक यांच्यासाठी विविध धान्यांचा वापर करायला हवा. विविध धान्य किंवा धान्यांवर प्रक्रिया केल्यानंतर वाया जाणारया घटकांचा वापर करून जनावरांना चांगला आहार देता येईल. उन्हाळ्यामध्ये प्रथिनयुक्त चाऱ्याचा वापर कमी होत असताना वाळलेल्या चाऱ्याच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के युरियाचा वापर केला, तर जनावरांच्या पोटामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवाणूंची वाढ होण्यास मदत होते. युरियामुळे पोटातच अमोनिया तयार होऊन पोटातील सूक्ष्मजीवाणू त्यांचे प्रथिनयुक्त शरीर बनवितात. या प्रथिनांचा वापर जनावरांचे शरीर वाढीसाठी, प्रजनन आणि उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतो. अर्थात, जास्त तापमान आणि पिण्यासाठी कमी पाणी अशा परिस्थितीमध्ये मात्र युरियाचा वापर कमी करावा.
चाऱ्याची फारच टंचाई असेल, तर अशावेळी उसाचे गळीत केल्यानंतर उपलब्ध असलेल्या उसाच्या भुस्स्यापासून जनावरांना काही प्रमाणात खाद्य तयार करता येईल. भुशातील लिग्निनचे जास्त प्रमाण हे जनावरांना पचनासाठी जड असते. उकळत्या पाण्यातून किंवा वाफेद्वारे भुशातील लिग्निनचे प्रमाण कमी करून भुस्स्याचे पौष्टिक गुणधर्म वाढविता येतील. उसाचा भुस्सा, मळी, धान्याचा भरडा, खनिज मिश्रण यांचा वापर करून चांगल्या प्रतीचे खाद्य निर्माण करता येईल. अशा प्रकारे प्रक्रिया केलेला चार किलो भुस्सा प्रत्येक जनावराला देता येईल.
-डॉ. भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..      अमेरिकेतली गुलामगिरी
स्ट्रेथ हॉस्पिटलचे मालक रिचर्ड स्ट्रेथ एकदा मला म्हणाले, या काळ्या लोकांचे इथले काम आता संपले आहे. त्यांना त्यांच्या आफ्रिकेतल्या देशाच्या किनाऱ्यावर सोडून दिले पाहिजे. प्रस्थापित गोऱ्या माणसाचे हे उर्मट उद्गार होते. १९७२ च्या कायद्याप्रमाणे ‘काळ्या मुलांना समाजाच्या मुख्य  प्रवाहात आणण्यासाठी’ सरकारी गाडय़ांनी चांगल्या शाळांमध्ये पाठवण्याचा उद्योग सुरू झाला होता. त्याला प्रचंड विरोध होऊन तो कायदा बारगळला. एक आफ्रिकन वंशाची परिचारिका म्हणाली, ‘आम्ही खूप मेहनत करून आमच्या मुलांना चांगल्या शाळेत घातले आहे. आम्हाला हे लचांड नको.’ रेल्वेच्या डब्यात आदल्या स्टेशनवर घुसलेले दारात उभे राहिलेले लोक जसे पुढच्या स्टेशनवरच्या प्रवाशांना अडवण्याचे काम करतात तसेच हे. १२१५ साली इंग्लंडमध्ये लोकशाही आणि समतेचे झाड लागले (टंॠल्लं उं१३ं) त्याच इंग्रज लोकाचा या काळ्या गुलामगिरीवर मक्ता होता. जहाजे इंग्लंडमध्ये किरकोळ गोष्टी घेऊन निघत आफ्रिकेला पोहोचत, तिथे धडधाकट निग्रो लोकांना फालतू गोष्टीच्या मोबदल्यात विकत घेत असत. त्यांना साखळ्यांनी बांधून अमेरिकेच्या किनाऱ्यावर उतरवून उसाची काकवी किंवा कापसाच्या गठ्ठय़ांच्या मोबदल्यात गोऱ्या शेतकऱ्यांना विकत असत. त्यांना वाचायला किंवा लिहिणे शिकण्यास, मालमत्ता विकत घेण्यास,  गोऱ्या माणसाविरुद्ध साक्ष देण्यास कायद्याने प्रतिबंध होता. प्रवासासाठी मालकाची परवानगी लागे आणि यांची मुले त्याच मालकाची गुलाम बनत.  
अमेरिकेतले संविधान १७७६ सालचे. त्यात ईवराची सर्व लेकरे सारखीच,त्यांना स्वातंत्र्याने आपले जीवन आनंदी करण्याचा हक्क आहे असे वाक्य आहे. पण जेफरसनने याला उपसूचना म्हणून गुलामगिरी नष्ट करावी असे वाक्य घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती उपसूचना फेटाळण्यात आली.
त्यानंतर शंभर वर्षांनंतर १८६५ साली गुलामगिरी कायद्याने संपली आणि नंतर आणखी शंभर वर्षांनी म्हणजे १९६० च्या सुमाराला वृत्ती बदलण्यास सुरुवात झाली. आपल्या मातृभूमीला परंपरांना, रूढींना हे लोक मुकले ते एका फटक्यात. आधीच मागासलेले, त्यातच स्मृती-आठवणींवर बोळा फिरवण्यात आला आणि त्यांना गोऱ्या माणसांचा धर्म देण्यात आला. पण प्रार्थना सभा मात्र सवत्या आणि निराळ्या. त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी देवाला आळवूनच आपले नष्टचक्र संपेल असे अप्रत्यक्षपण शिकवण्यात आले. ही मनोवृत्ती घेऊनच जेव्हा हे गुलामगिरीतून सुटले तेव्हा दूरदृष्टी ठेवून उद्दमशील तऱ्हेने जगण्यास हे असमर्थ होते. ज्यांच्या श्रमावर गोऱ्या लोकांनी उदीम केला त्यांच्याच गळ्यात ते एक जड जोखड झाले शहरांना कळा आली. आणि माझे स्ट्रेथ मास्तर म्हणू लागले. ‘यांना आफ्रिकेला परत पाठवा.’ हाच तो ‘कर्मसिद्धांत’ (!)
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
Mumbai, Water storage, dams,
मुंबई : धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर
bear attacks in Japan is looking to ease laws around shooting bears
माणसांपेक्षा अस्वलेच जास्त! जपानमध्ये अस्वलांच्या हल्ल्याबाबत केले जाणारे उपाय चर्चेत का?
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
loksatta analysis lack of banks in rural areas hit development in some districts
विश्लेषण : ग्रामीण भागांतील बँकांच्या कमतरतेमुळे असमतोल का वाढतो?
akkadevi dam chirner marathi news
उरण: चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी, वर्षा पर्यटनसाठी निसर्गरम्य स्थळांवर पर्यटकांची पावले
Monkey's vs Family Monkey's attack on family shocking video
फिरायला आलेल्या कुटुंबावर माकडांचा हल्ला; सळो की पळो करून सोडलं, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
farmers are happy as increase in tomato prices
टोमॅटो दरात वाढ, उत्पादक शेतकऱ्यांचे चेहरे फुलले

वॉर अँड पीस : भगंदर : ३
आयुर्वेदीय उपचार- मूळव्याध व भगंदर या दोन्हीही विकारांकरिता आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, प्रवाळ, कामदुधा प्र. ३ दोन वेळा घ्याव्यात. सोबत आठवणीने सुंठचूर्ण पाव चमचा घेणे. झोपताना गंधर्वहरितकी चूर्ण घ्यावे. मलावरोध असल्यास रात्री कपिलादि वटी ६ गोळय़ा व दोन्ही जेवणानंतर अभयारिष्ट ४ चमचे गरम पाण्याबरोबर घ्यावे. भगंदराच्या पुळीच्या जागी शतधौतघृत दोन वेळा लावावे. भगंदराच्या पुळीत पू, सूज असल्यास टाकणखारचूर्ण एक भाग, चार भाग कणीक व थोडे पाणी असे शिजवून पोटीस करावे, शेकावे. शेकल्यानंतर भगंदराच्या भोकाच्या जागी एलादितेल लावावे. झोपताना व सकाळी शतधौतघृत आठवणीने लावावे.
भगंदराचा व्रण खूप खोलो ठणका जास्त असल्यास ऊद, धूप, वेखंड, ओवा, शेपा यांची धुरी घ्यावी. अष्टांगहृदय या आयुर्वेदीय ग्रंथात भगंदर पूर्णपणे, नि:शेष बरा होण्याकरिता ‘पंचनिंबादि चूर्ण’, कडुनिंबाची पाने, फुले, लिंबोण्या, अंतर्साल व मुळावरची साल असे एकत्रित पूर्ण वापरावयाचा सांगावा दिला आहे. भगंदराच्या कठीण अवस्थेमध्ये रक्त, पू, मल या सर्वाचा स्राव होणे ही वाईट अवस्था होय. त्याकरिता वर सांगितल्याप्रमाणे पोटिसाचे शोधन, एलादितेल व शतधौतघृताचे रोपण व धूपनाचा उपयोग न झाल्यास क्षारसूत्राचा प्रयोग भगंदराचा खोल व्रण भरून काढण्याकरिता तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केला जातो. या क्षारसूत्राकरिता निवडुंगाचा चिक वापरला जातो. साक्षात ब्रह्मदेवाने सांगितलेला ‘स्वायंभुवाख्य’ गुग्गुळ या औषधात त्रिफळा गुग्गुळच्या घटकद्रव्यांबरोबर दालचिनी व वेलची ही दोन सूक्ष्म स्रोतोगामी, दीपन, पाचन करणारी तीक्ष्ण, उष्ण, रूक्ष असल्यामुळे, व्रण कोरडा होऊन बरे व्हायला मदत होते.
भगंदर म्हणजे कफपित्ताच्या अतिरेकाचे, शरीरातील अति मांसल अवयवाच्या फाजील पोषणाचे दर्शन आहे. जेवण, फिरून येणे, पुटकुळी झाल्याबरोबर उपेक्षा न करणे या गोष्टी पाळाव्याच. बसण्याचे आसन सुखकर, मऊ, खेळती हवा असलेले वेताच्या खुर्चीसारखे असावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १० मे
१९९८> लेखक, पत्रकार, ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक, चरित्रकार, अनुवादक  आणि बालसाहित्यिक यदुनाथ थत्ते यांचे निधन. स्वातंत्र्यचळवळीत कारावासात असताना स्वेट मॉर्डेनच्या ‘पुशिंग द फ्रंट’ चा ‘पुढे व्हा’ हा अनुवाद त्यांनी केला, हे त्यांच्या सुमारे १०० पैकी पहिले पुस्तक. ‘विनोबा भावे’, ‘साने गुरुजी’ यांची चरित्रपुस्तके, महाराष्ट्रीय मुस्लिम समाजात प्रागतिक विचार रुजवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर आधारित तीन पुस्तके, मराठी मन ओळखून अनुवादिलेली प्रेरणादायी (मोटिव्हेशनल) पुस्तके, ही यापैकी अधिक लोकप्रिय ठरली. २००० > ‘इतर सर्व कवाडे बंद करून प्रत्येक अनुभव कवितेतून व्यक्त केला पाहिजे’ असा गुरुमंत्र ज्यांनी आपल्याला दिल्याची आठवण मंगेश पाडगावकर अनेकदा जाहीरपणे सांगतात, ते कविवर्य नागोराव घनश्याम देशपांडे यांचे निधन. ‘शीळ’ , ‘अभिसार’, ‘गुंफण’, ‘खूणगाठी’ हे त्यांचे काव्यसंग्रह, तर ‘कंचनीचा महाल’ हा चार दीर्घकवितांचा गुच्छ. ‘खूणगाठी’ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला; तर ‘रानारानात गेली बाई शीळ’चे भावगीत होऊन ना.घ. घराघरांत गेले. उत्तरायुष्यात त्यांनी ‘फूल आणि काटे’ हे आत्मचरित्र लिहिले होते.  
– संजय वझरेकर