वनस्पतिजन्य तेल हे केवळ खाण्यासाठीच नव्हे तर औद्योगिक कच्चा माल म्हणूनही वापरले जाते. प्रचलित गळितधान्यांमध्ये वनस्पतीच्या एकूण शुष्कभाराच्या केवळ १० ते २० टक्केच तेल असते तर अल्गीच्या (जलशैवाले) काही जातींमध्ये त्यांच्या शुष्कभाराच्या ६० ते ७० टक्के तेल असते.
  प्रयोगशाळेत असे दिसून आले आहे की अल्गी खूप झपाटय़ाने वाढतात व त्यामुळे त्यांच्या संवर्धनातून अगदी रोजच्या रोज विक्रीयोग्य माल बाजारात पाठविणे शक्य होईल. परंतु जलशैवालांपासून मोठय़ा प्रमाणावर तेलनिर्मिती करण्यात येणारी एक मोठी अडचण अशी आहे की त्यांचे संवर्धन पारदर्शक पण बंदिस्त अशा टाक्यांमध्येच करावे लागेल. कारण उघडय़ा जलाशयात आपल्या तलजनक जातींची शुद्धता आपण राखू शकणार नाही. बंदिस्त कक्ष उन्हात तापतात, त्यामुळे ते थंड करण्याचीही काहीतरी सोय करावी लागेल. तसेच या टाक्यांना बाहेरून सतत कार्बनडायॉक्साइड आणि खते पुरवावी लागतील. या सर्व बाबी विचारात घेतल्यास अशा प्रणालीचा भांडवली खर्च प्रतिहेक्टर सुमारे पाच कोटींच्या घरात जाईल असे वाटते. या भांडवली खर्चावरील व्याज, घसारा आणि चालू खर्च भरून काढून वर नफा कमवायचा असेल तर या प्रणालीतून दररोज प्रति हेक्टर एक टन इतके तेल मिळावयास हवे. एक हेक्टरवर पडणारा सूर्यप्रकाश आणि प्रकाशसंश्लेषणाची कार्यक्षमता विचारात घेता हे अशक्य वाटते.
या परिस्थितीवर मात करण्याचा एक उपाय आहे. स्पायरुलिना नामक एका नीलहरितशैवालाचे संवर्धन उघडय़ा जलाशयात १० आम्लविम्लनिर्देशांकाच्या पाण्यात केले जाते. इतक्या उच्च आम्लविम्लनिर्देशांकाच्या माध्यमात फक्त स्पायरुलिनाच जिवंत राहू शकते. आजच्या घडीस हा गुणधर्म कोणत्याच हरितशैवालात नाही, पण भराभर वाढणाऱ्या सूक्ष्मजंतूंमधील जनुकीय उत्परिवर्तनाच्या मोठ्या संभाव्यतेचा फायदा घेऊन अत्यंत उच्च आम्लविम्लनिर्देशांकात किंवा विशिष्ट क्षारांच्या द्रावणात तगून राहू शकतील आणि तरीही तेल निर्माण करतील अशी जलशैवाले विकसित केल्यास आपण त्यांचे संवर्धन उघडय़ा जलाशयात करू शकू. या उपायाद्वारे संवर्धनाचा भांडवली खर्च कमी करता येईल.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस :     डोळय़ांचे विकार : भाग १
मानवी शरीरात डोळय़ाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोळा हा रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सा धातूंचे सार आहे. ‘डोळे हे जुलमी गडे’ या कवितेतील भावार्थ घ्यावा व आपल्या डोळय़ांची सर्वार्थाने काळजी घ्यावी असा आयुर्वेदशास्त्राचा सांगावा आहे. बहुतेक सर्व नेत्रविकार पथ्यापथ्याचे नियम न पाळण्याने होतात हे सर्वानाच माहीत आहे. आयुर्वेदशास्त्राप्रमाणे डोळय़ाला कफापासून जास्त धोका, त्याला जोड पित्त व वायू या दोषांची मिळाली की विविध नेत्रविकार होतात. नेत्रविकारांची व्याप्ती खूपच मोठी आहे. डोळय़ाची पापणी, बुबुळे, बाहुली, तिमिर, मोतीबिंदू, काचबिंदू असे अनेकानेक रोग कोणालाही होऊ शकतात. चष्म्याचा नंबर कमीअधिक होणे ही अलीकडे सामान्य गोष्ट झली आहे.
डोळय़ाला जराही काही त्रास झाला, की ‘रस्त्यावरचा पाटीवाला’ही तडक ‘आय स्पेशालिस्टकडे’ जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रातही प्रथम सर्व शरीराचा विचार आहे व मगच आय स्पेशालिस्ट ही स्वतंत्र शाखा विकसित झालेली आहे हे पक्के लक्षात घेऊन डोळय़ासंबंधी काही तक्रार असल्यास फटाफट डोळय़ांच्या डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टर- एम.डी. मेडिसीनला भेटावे. एक काळ आय स्पेशालिस्ट एकच प्रकारचे होते. आता आधुनिक वैद्यकात डोळय़ांच्या विकारांचेही खूप पोटभेद होऊन पापण्या, रेटिना, बुबुळे असे आणखी विविध पोटभेदाचे स्पेशालिस्ट मोठमोठय़ा शहरांत आहेत. सामान्यपणे ही थोर थोर मंडळी डोळय़ांत टाकावयास विविध ड्रॉप्स व पोटात अ‍ॅन्टिबायोटिक्स देत असतात. त्यांचा थोडाफार उपयोग होतो. चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स हे सर्व तंत्रज्ञानाचे काम झाले. नेत्रविकार का झाला याचा बारीक विचार प्रत्येक नेत्रग्रस्त रुग्णाने करावयास हवा. ‘सर्वदा च निषेवेत स्वस्थोऽपि नयनप्रिय:।’ निरोगी असतानाही ज्यास डोळे चांगले राहण्याची आवड आहे त्याने किमान पुढील पदार्थाचे सेवन करावे. सातू, गहू, जुना तांदूळ, मूग, डाळिंब, खडीसाखर, सैंधव, मनुका, उकडून भाज्या, डोके व पायांची काळजी घ्यावी.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..: कायापालट
मेडिकलच्या शेवटच्या तीन वर्षांत माझ्या आयुष्याला एक फार मोठी कलाटणी मिळाली. त्याला जबाबदार असणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. जोगळेकर आणि डॉ. केंकरे. डॉ. जोगळेकर माझ्या वडिलांचे मित्र, त्यांनी मला बोलावून घेतले आणि एक फर्मान काढले. सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यास चालू असतानाच अंतर्गत स्पर्धात्मक परीक्षा असतात. त्यातल्या सर्जरीच्या परीक्षेला ‘तू बसणार आहेस आणि त्यासाठी मी तुझा अभ्यास घेणार आहे,’ असे ते फर्मान  होते. मला अर्थात या भानगडीत कणभरही रस नव्हता. अभ्यासात बक्षिसे मिळवणे ही गोष्ट माझ्या मनात कधी येत नसे आणि असे कोठलेच बक्षीस मला मिळाले नव्हते आणि मिळेल असे वाटत नसे. ते पडले वडिलांचे मित्र तेव्हा नाइलाजच झाला. परीक्षेचा दिवस उजाडला. फक्त प्रात्यक्षिकाची परीक्षा असे. समोर तीन रुग्ण तपासण्यासाठी ठेवले होते. माझे सात-आठ इतर माझ्यापेक्षा अनेकपटीने हुशार आणि अभ्यासू मित्र या परीक्षेसाठी आले होते. पण आमच्यात एक फार महत्त्वाचा फरक होता. त्यांना बक्षीस मिळवायचे होते आणि मला मिळणार नाही याची मला खात्री होती तेव्हा माझ्यावर काहीच दबाव नव्हता. जे दिसत होते त्याचे निरीक्षण मी परीक्षकांना सांगितले आणि त्या निरीक्षणाप्रमाणे काय निदान मला वाटते ते त्यांच्यासमोर मांडले. परीक्षक माझ्याकडे बघू लागले आणि प्रतिप्रश्न विचारू लागले तेव्हा ते कसे शक्य आहे, असा ‘सवाल का जबाब सवाल से’ असे संभाषण मी चालू केले तेव्हा त्यांनी परीक्षा संपवली आणि तासाभराने मला बक्षीस मिळाल्याचे जाहीर केले.
मी माझ्या मित्रांना म्हणालो, हा न्याय झाला नाही. त्यांच्यातला एक मला म्हणाला, खिशात होती चवली आणि तू रुपयाचा आव आणू शकलास. त्यांचे म्हणणे बरोबर असेलही कदाचित, परंतु मी अभ्यासात चमकू शकतो, ही जाणीव मला त्या वेळी झाली आणि  लगेचच आणखी एक अघटित घडले. अभ्यासाच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टीत मी सालाबादप्रमाणे पुढे होतोच. या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी होते औषधशास्त्राचे प्राध्यापक डॉ. केंकरे. त्या काळात रोटरी क्लबतर्फे सर्वागीण प्रगतीसाठी एकाची निवड होत असे. त्यांनी माझी दोन वर्षांतली कारकीर्दच समितीसमोर मांडली आणि या बक्षिसाचा उल्लेख केला. आणि तेही बक्षीस पदरात पडले. आता खिशातल्या चवलीला वाढवायची तर दाबून अभ्यास केला पाहिजे, हेही मनात आले आणि आयुष्यात प्रथमच मी अभ्यासाला लागलो. आणि सर्जरी या विषयात कॉलेजमध्ये पहिला आलो. माझी चवली फुगली होती नक्कीच, परंतु विद्यापीठात पहिला येण्यासाठीच्या रुपयापर्यंत मात्र पोहोचली नव्हती हेही खरेच होते. आणि ती कधीच पोहोचणार नव्हती हे ही मला नक्की माहीत होते.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २८ मार्च
१८८३ > वनस्पतीशास्त्रज्ञ आणि या विषयावरील लेखक प्रा. श्रीपाद लक्ष्मण आजरेकर यांचा जन्म. डॉ. श्री व्यं. केतकर यांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’मध्ये प्रा. आजरेकर यांनी वनस्पतीविज्ञानावर लेखन केले.  बुरशीच्या प्रकारांवर त्यांचा विशेष अभ्यास असल्याने बटाटा आणि कापूस या पिकांसाठी त्यांचे संशोधन उपयुक्त ठरले होते.
१९०३ > ‘सागराच्या तळाशी’, ‘निशेची निरांजणे’, ‘काही महत्त्वाचे शास्त्रीय शोध’, ‘पेनिसिलीन’ अशी ज्ञान-रंजनपर पुस्तके किशोरवयीन वाचकांसाठी लिहिणारे आणि हिंदू पुराणांचाही परिचय करून देणारे ज्ञानलक्ष्यी लेखक बाळकृष्ण मोरेश्वर कानिटकर यांचा जन्म. ते पीएच.डी, डी.लिट, बी.टी. होते. ‘ज्ञानप्रदीप’ या त्यांच्या ग्रंथाला नागपूर शिक्षण परिषदेचे सुवर्णपदक मिळाले होते. १९७१ मध्ये ते निवर्तले.
१९४१ > साहित्यिक, नवकथाकार पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या ‘आदेश’ या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य नेत्यांवर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याचे कार्य ‘आदेश’ने प्रामुख्याने केले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरच्या दंगलीत नुकसान झाल्यानंतर ‘आदेश’ बंद पडले.
– संजय वझरेकर