हवामानाच्या प्रचंड प्रमाणातील निरीक्षणांची विदा, यंत्र शिक्षणाच्या गणनविधीने मिळवलेली अमूल्य अंतर्दृष्टी (इन्साइट्स), हवेच्या विविध प्रकारांचे स्वरूप आणि गुणवत्तापूर्ण व जास्तीत जास्त परिणामकारक प्रारूपे इत्यादींचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे हवामानाचा अंदाज तयार केला जातो. एवढे करूनही हवामानातील सूक्ष्म बदलांमुळे ही माहिती अधिक क्लिष्ट होते. याचे उदाहरण म्हणजे १९७२ साली गणितज्ञ व हवामान शास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्स यांनी मांडलेला ‘बटरफ्लाय इफेक्ट’ नावाचा सिद्धांत. या सिद्धांतानुसार एका ठिकाणच्या फुलपाखराच्या पंखांचे फडफडणे आणि दूरवरच्या ठिकाणी निर्माण झालेले वादळ यात परस्पर संबंध असू शकतो. प्रशांत महासागरातील एल निनो व ला निना, तसेच हिंदी महासागर द्विध्रुव (इंडियन ओशन डायपोल – आयओडी) स्थिती या महासागराच्या पाण्याच्या तापमानाशी निगडित असणाऱ्या घटना हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या प्रदेशांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ यासारखे तीव्र हवामान निर्माण करू शकतात. याचा अर्थ असा आहे की जगाचे हवामान ही सर्वत्र जोडलेली एक गुंतागुंतीची प्रणाली आहे. त्यामुळे एका ठिकाणच्या हवामानातील सूक्ष्मातील सूक्ष्म घटना नजीकच्या तसेच दूरवरच्या ठिकाणांच्या हवामानाची स्थिती बदलवू शकते.

हवामानाच्या अंदाजाची अचूकता ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील प्रमुख गोष्टी म्हणजे हवामानाच्या घटकांच्या उपलब्ध असणाऱ्या विदांचे महाकाय प्रमाण आणि गुणवत्ता, प्रारूपांचा दर्जा तसेच हवामानाच्या कोणत्या स्थितीचा अंदाज तयार करायचा आहे त्याची माहिती. काही आठवडे किंवा महिन्यांसाठीचा म्हणजे दीर्घ कालावधीसाठीच्या अंदाजापेक्षा कमी कालावधीचा म्हणजे तीन ते चार दिवस पुढचा हवामानाचा अंदाज हा बराचसा अचूक येऊ शकतो. याचे कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही भूतकाळातील हवेचे स्वरूप शोधण्यावर भर देते. हा अंदाज सांख्यिकी पद्धतीने तयार केला जातो. पारंपरिक पद्धतीमध्ये भौतिक समीकरणे वापरली जातात. ही समीकरणे द्रव गतिकी (फ्लुइड डायानामिक्स) आणि उष्मा गतिकी (थर्मोडायनामिक्स) या भौतिकशास्त्राच्या नियमांवर आधारित असतात.  ती हवेच्या विविध घटकांच्या निरीक्षणांची विदा वापरून केली जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेने वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजासाठी भौतिक समीकरणांऐवजी हवेच्या घटकांच्या विदेचा थेट वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास त्यातील सांख्यिकी प्रारूपे ही भूतकाळातील हवामानाच्या नमुन्यांचा व त्याच्या घटकांच्या निरीक्षणांचा आणि विदेचा धांडोळा घेतात आणि भूतकाळातील हवामानाशी मिळताजुळता अंदाज घेऊन विकसित अंदाज तयार करतात. –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनघा शिराळकर, मराठी विज्ञान परिषद