सामान्य स्थितीमध्ये अर्थात कक्ष-तापमानाला सर्व स्थायूरूप मूलद्रव्यांमध्ये लिथियम सर्वात हलका धातू आहे. तो चांदीसारखा पांढरा परंतु मऊ असतो आणि चाकूने कापताही येतो. लिथियम साठवून ठेवणं फार कठीण. अति क्रियाशील असलेला हा धातू हवेत उघडा राहिला असता लगेच काळा पडतो व पृष्ठभागावर त्याचे ऑक्साइड तयार होते. म्हणूनच लिथियम पेट्रोलियम जेली लाऊन साठवला जातो. अल्कली धातू असलेला हा लिथियम अग्निजन्य खडकांपासून माहीत झाला, मात्र इतर अल्कली धातू वनस्पतींपासून शोधले गेले. म्हणूनच या मूलद्रव्याला दगड अशा अर्थाने ‘लिथोस’ या ग्रीक शब्दावरून लिथियम हे नाव दिले गेले.
निसर्गात लिथियम मुक्त स्थितीत आढळत नाही; तो सामान्यपणे सर्व अग्निजन्य खडकांमध्ये आणि खनिजांच्या झऱ्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळतो. स्पॉडय़ुमिन, पेटॅलाइट, लेपिडोलाइट, अॅम्ब्लियगोनाइट या खनिजांपासून लिथियम पुरेशा प्रमाणात मिळते. समुद्राच्या पाण्यात एक कोटी भागांत सुमारे एक भाग इतक्या अल्प प्रमाणात लिथियम आढळतो. नैसर्गिकरीत्या लिथियम (६) वलिथियम (७) ही लिथियमची दोन समस्थानिके आढळतात.
१७९० साली स्वीडनमधील युटो बेटावर जोस बोनिफॅशियो-द-अॅद्राल्दा-द-सिल्वा या रसायनशास्त्रज्ञाला पेटॅलाइट हे खनिज आढळून आले. आगीवर या खनिजाची भुकटी फवारली असता ज्योत भडक किरमिजी रंगाची होत असल्याचे त्यांना दिसले. १८१७ साली या खनिजाचे विश्लेषण करत असताना जोहान ऑगस्त आर्फव्हेडसन यांना लिथियम धातूचा शोध लागला. लिथियम हा सोडियमपेक्षा हलका असल्याचे त्यांच्या लक्षात आले, परंतु त्यांना लिथियम वेगळा करता आला नाही. १८२१ साली विल्यम ब्रँडे यांनी लिथियम ऑक्साइडचे विद्युत अपघटन करून अत्यंत कमी प्रमाणात लिथियम वेगळा केला. १८५५ साली रॉबर्ट बुन्सेन (बुन्सेन बर्नरचा जनक) आणि ऑगस्तस मॅथिसन यांनी वितळलेल्या लिथियम क्लोराइडचे विद्युत अपघटन करून ग्रॅममध्ये मोजता येईल, एवढा लिथियम वेगळा केला. १९२३ मध्ये लिथियम क्लोराइड व पोटॅशियम क्लोराइड या संयुगाच्या मिश्रणाचे विद्युत अपघटन करून लिथियमच्या व्यापारी उत्पादनाची पद्धत जर्मनीतील एका कंपनीने शोधून काढली.
चिली, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल या देशांत लिथियमचे उत्पादन होत असून त्यात चिली आघाडीवर आहे.
– विजय ज्ञा. लाळे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
बौद्ध धर्मोपासक राजा कनिष्क
मूळच्या उत्तर चीनमधील कुषाण या रानटी, असंस्कृत टोळीच्या लोकांनी उत्तर आणि वायव्य भारतात सत्ता स्थापन केली. या कुषाण राजांपकी कनिष्क हा संस्कृत भाषापंडित, विद्वान आणि बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता. राजा कनिष्कने पाटलीपुत्रावर आक्रमण केले, त्या वेळी त्याची भेट महान विद्वान आणि बौद्ध तत्त्वज्ञान पंडित अश्वघोष यांच्याशी पडली. अश्वघोष यांची विद्वत्ता, व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे विचार ऐकून भारावून गेलेल्या कनिष्काने स्वत: बौद्ध धर्माची दीक्षा त्यांच्याकडून घेतली आणि तो तत्पूर्वी होऊन गेलेल्या सम्राट अशोकांप्रमाणे बौद्ध धर्माचा गाढा उपासक आणि प्रचारक बनला.
कनिष्काने अजेसाइल या ग्रीक स्थापत्यतज्ज्ञाच्या मदतीने पेशावर जवळ बौद्ध अवशेषांवर उंच मनोरा बांधून घेतला. त्याला ‘कनिष्क चत्य’ म्हणतात. भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर साधारणत: शतकभराने बौद्ध पंडितांमध्ये मतभेद तीव्र झाले. वैशालीत भरलेल्या दुसऱ्या बौद्ध संमेलनात त्यापकी थेरवादी (स्थिरवादी) पंडितांनी मतभेद असणाऱ्या भिख्खूंना संघाबाहेर काढले. संघाबाहेर पडलेल्यांनी स्वत:ला ‘महासांघिक’ आणि ज्यांनी त्यांना बाहेर काढले त्यांना ‘हीनसांघिक’ असे नाव दिले. याच पंथांना पुढे ‘हीनयान’ आणि ‘महायान’ अशी नावे पडली. कनिष्काच्या काळात उभी बुद्धमूर्ती अधिक प्रचलित झाली. कनिष्काच्या काळापर्यंत मूळ बौद्ध तत्त्वांमध्ये अनेक लोकांनी चुकीचे फेरफार करून ठेवले होते. त्या चुका दुरुस्त करून बौद्ध तत्त्वज्ञानाच्या सुसूत्रीकरणासाठी कनिष्काने वसुमित्र यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीरमधील कुंडलवन विहार ऊर्फ जालंधर येथे चौथी धम्म संगती म्हणजे बौद्ध पंडितांची परिषद भरवली. या परिषदेसाठी ५०० विद्वान उपस्थित होते. कनिष्काने बौद्ध तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांचे भाषांतर पालीतून संस्कृतात करून घेतले. बौद्ध वाङ्मयात कनिष्काचा अंत त्याच्या एका मंत्र्याने त्याचा खून केल्यामुळे झाला असे म्हटले आहे. कनिष्कानंतर हुविष्क, कनिष्क दुसरा, वसुदेव हे राजे गादीवर आले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात कुषाण सत्ता पूर्णपणे नष्ट झाली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com