बऱ्याच दिवसांनी बंटीबरोबर जादूचा कार्यक्रम बघायचा बेत ठरला. डोळ्याला सुरक्षेसाठी गॉगल, हातात ग्लोव्हज अशा थाटात जादूगाराने प्रवेश केला. गुलाबाचे फूल, फुगे, केळं, एक लाकडी पट्टी आणि खिळा असे साहित्य टेबलवर आणून ठेवलं. एक झाकण असलेलं मोठं भांडं टेबलवर आणून ठेवलं. गुलाबाच्या पाकळ्या छान मऊ असतात. हे सगळ्यांनाच माहीत आहे. जादूगाराने भांडय़ावरचं झाकण अलगद बाजूला केलं, त्यातून पांढरे ढग बाहेर पडावेत तशा वाफा बाहेर पडू लागल्या. अलगद हे फूल जादूगाराने त्या भांडय़ात टाकलं आणि त्याच्या स्टाईलने त्या भांडय़ावर जादूचे मंत्र टाकले. जरा वेळाने जादूगाराने चिमटय़ाने फूल बाहेर काढलं, त्याच्या पाकळ्या आता कडक झालेल्या होता. हाताने त्याने त्या चुरगळल्या तर त्यांचा भुगा झाला.

आता जादूगाराला लाकडी पट्टीत खिळा ठोकायचा होता. पण त्याच्याकडे हातोडी नव्हती. त्याने केळ्याने हा खिळा ठोकता येईल कां? असा प्रश्न विचारताच नाही असंच उत्तर सगळ्यांनी दिलं. अर्थात खिळा लाकडी पट्टीत जाण्याऐवजी केळ्यातच जाईल, नाही कां? पण जादूगाराने मात्र तसं करून दाखवायचं ठरवलं. केळं खरं आहे हे बघायला प्रेक्षकातून दोन मुलांनाही त्याने बोलावलं आणि केळं त्या भांडय़ात टाकलं. पुन्हा एकदा जादूचे मंत्र बोलून, जरा वेळाने चिमटय़ाने केळं बाहेर काढलं. या केळ्याचा वापर त्याने हातोडीसारखा करून खरंच खिळा लाकडी पट्टीत घुसवला. खिळा ठोकताना ते केळं मात्र तुटलं नाही,  कुस्करलं गेलं नाही.

आता वेळ होती फुगलेल्या फुग्याची. जादूगाराने हा फुगा त्या भांडय़ात ठेवला, जरा वेळाने तो बाहेर काढताच त्याच्यातली हवा कमी झालेली दिसली. फुगा बाहेर काढल्यावर तो पूर्ववत् होऊ लागला. बंटीबरोबरच सगळ्यांना प्रश्न होता त्या भांडय़ात घडणाऱ्या जादूचा.

ही सगळी कमाल होती ती त्या भांडय़ात असणाया द्रव नायट्रोजनची. अचानक कमी तापमानात गेल्यावर झालेले हे परिणाम होते. द्रवणांक उणे २१० अंश सेल्सिअस आणि उत्कलनांक उणे १९६ अंश सेल्सिअस असलेला हा द्रव नायट्रोजन काळजीपूर्वक हाताळावा लागतो. द्रव नायट्रोजनचा उपयोग जीवशास्त्राचे नमुने जतन करून ठेवण्यासाठी केला जातो. खाद्यपदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये शीतक म्हणून द्रव नायट्रोजन वापरला जातो.

– अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org