बऱ्याच इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय उपकरणे, औषधे इत्यादी गोष्टी साठवताना कोरडय़ा वातावरणाची आवश्यकता असते. त्यायोगे ती उपकरणे वा वस्तू सुयोग्य स्थितीत राहतात. अशा बाबतीत सिलिका जेल वापरली जाते. कोरडी सिलिका जेल वातावरणातील बाष्प शोषून घेते. सिलिका जेल ही सिलिकॉन डाय आक्साइडवर (SiO2) प्रक्रिया करून मिळवली जाते. सिलिका जेल वजनाच्या ३० ते ४०% बाष्प शोषण करू शकते. बाष्प शोषण करण्यापूर्वी त्याचा रंग गर्द निळा असतो व बाष्पाने संपृक्त झाल्यावर रंग गुलाबी होतो. बाष्पाने संपृक्त जेल १२० अंश सेल्सिअसपर्यंत एक-दोन तास तापवून परत कार्यशील करता येते. मोबाइल फोन, कॅमेरा, पिट्रर अशा उपकरणांच्या खोक्यात सिलिका जेलच्या छोटय़ा पुडय़ा ठेवलेल्या असतात.
शास्त्रज्ञांना हे संयुग १७ व्या शतकापासून माहीत होते. पहिल्या जागतिक महायुद्धात याचा वापर गॅस मास्क साठविण्याच्या पिंपात केला गेला. जेल बनविण्याच्या कृतीचे पेटंट बाल्टिमोर येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक ‘वॉल्टर पॅट्रिक’ यांनी १९१८ साली मिळविले. दुसऱ्या महायुद्धात पेनिसिलिन व युद्ध सामुग्रीचे बाष्पापासून रक्षण करण्यासाठी सिलिकाचा वापर झाला.
विद्युतरोहित्रात (Transformer) विशिष्ट तेलाचा वापर केला जातो. रोहित्राच्या आत असलेल्या तारांच्यामध्ये विद्युतरोधक म्हणून ह्य़ा तेलाचा उपयोग होतो. ह्य़ा तेलात बाष्प मिसळले की तेलाचे विद्युतरोधक गुणधर्म कमी होतात. हे टाळणे अनिवार्य असते. रोहित्राच्या टाकीच्या वरील भागात ‘कॉन्झर्वेटर’ असतो.
कॉन्झर्वेटरमध्ये काही भाग तेल असते व त्यावरील भागात हवा असते. रोहित्रावरील भार वाढला की त्याचे तापमान वाढते. तापमान वाढल्याने तेलाचे आकारमान वाढते. परिमाणत: कॉन्झर्वेटरमधील हवा बाहेर फेकली जाते. काही वेळाने भार कमी झाला की तेलाचे आकारमान कमी होते व कॉन्झर्वेटरमध्ये बाहेरील हवा आत येते. ही हवा बाष्परहित असावी लागते. यासाठी कॉन्झर्वेटरमध्ये हवा येण्याच्या मार्गामध्ये सिलिका जेल असलेले उपकरण बसविले जाते, ज्यास ‘ब्रिदर’ (Breather) म्हणतात. कॉन्झर्वेटरचा हा एक प्रकारे श्वासोच्छ्वासच असतो! ब्रिदर हवा आत घेताना बाष्प, सिलिका जेलमुळे शोषले जाते. यामुळे तेलाची गुणवत्ता अबाधित राहते.
– श्रीनिवास म. मुजुमदार
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org