फ्लिंट नावाच्या सिलिकॉन डायऑक्साईडच्या स्फटिकामधील दोन महत्त्वाचे गुणधर्म अश्मयुगातच लक्षात आले होते, ते म्हणजे या स्फटिकांना धार असते व एकमेकांवर किंवा लोखंडावर यांच्या घर्षणाने ठिणग्या पडतात. मानवी चिकित्सक बुद्धी कामाला लागली आणि त्याची उपयोगी अवजारे अवतरली. शुद्ध सिलिकॉन तयार करणे तसे कठीण व जिकिरीचे आहे. ते धातूप्रमाणे चकचकीत दिसते, पण हे रूप फसवे आहे. सिलिकॉन धातू नसून धातुसदृश मूलद्रव्य आहे, जे विद्युत अर्धवाहक (semi-conductor) आहे. आजच्या इलेक्ट्रॉनच्या युगात सिलिकॉनने आपले साम्राज्य त्याच्या विद्युत अर्धवाहक या गुणधर्मामुळेच स्थापन केले. हा गुणधर्म इतर अनेक पदार्थात आहे, पण सिलिकॉनचे स्थान अढळ राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचे मुख्य गमक म्हणजे त्याची विपुलता आणि त्याच्या स्फटिकीकरणाचे विकसित तंत्रज्ञान हेच आहे. आज मानवी बुद्धिमत्तेने आपल्या मदतीसाठी जे कृत्रिम बुद्धिमत्तेचे महाजाल निर्माण केले आहे त्याचा कणा आपला सखा सिलिकॉन आहे. बांधकामामध्ये स्टील, लोखंड, सिलिकॉन ऑक्साईड यांचा वापर बांधकाम बळकट करण्यासाठी होतो हे आपणास ज्ञात आहेच, पण लोखंड गंजते आणि इमारत कमजोर होते. गंजू नये म्हणून परत सिलिकॉन बरोब्बर योग्य ती मदत करते. फेरो-सिलिकॉन हे गंजण्याच्या प्रक्रियेला विरोध करतात. निर्धास्त झोप सिलिकॉनच्या भरवशावर शक्य आहे असे समजा.

सिलिकॉन जेव्हा निरनिराळे, विस्मयजनक, अत्योपयोगी पदार्थ आपल्या दिमतीला देतो तेव्हा तो त्याच्या लहान भावंडाला कार्बनलाही त्याच्याबरोबर घेतो. सिलिकॉन कार्बाईड (र्र उ) हे असेच दोघांचे एकत्र रूप आहे. अगदी हिऱ्याप्रमाणे कठीण, वजनाला हलके आणि धातूप्रमाणे उष्णतावाहकता दाखविणारे आहे. पण विशेष म्हणजे औष्णिक प्रसरण मर्यादित असणारे आहे. याची रचना हिऱ्याप्रमाणे आहे. यातील प्रत्येक सिलिकॉन किंवा कार्बन दुसऱ्या प्रकारच्या चार अणूबरोबर चतुष्फलकी प्रकारे जोडलेले असतात.

मंडळी दोघांमधील सहसंयुज बंध महत्त्वाचा आहे बरं! दोघांचे अस्से जमते की गंजणे, झिजणे नगण्यच असते आणि अगदी चराही पडत नाही याला. त्यामुळे याचा उपयोग उद्योगजगतात मोठय़ा प्रमाणात होतो.

– डॉ. अनिल कर्णिक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is silicon
First published on: 16-03-2018 at 03:27 IST