हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली

नवतंत्रज्ञानामुळे जग बदलणार आणि ओघाने त्या जगातल्या माणसाचे जीवनही बदलणार आहे. ते सारे नजीकच्या काळातच घडून येईल. त्यासाठी सज्ज राहायचे, तर काय काय करावे लागेल?

या लेखमालिकेच्या शेवटच्या अध्यायाची सुरुवात आजच्या लेखापासून. त्यात- ‘भविष्यातील ‘माणूस + यंत्र’ जगात तरून जाण्यासाठीची पूर्वतयारी’ जाणून घेऊ. म्हणजे या सर्व स्थित्यंतराला सामोरे जाण्यासाठी पुढील काळात कुठले व्यवसाय, रोजगार, शिक्षण घ्यावे (कोणी, काय व कुठे?), डिझाइन थिन्किंग, डिजिटल अप-स्किलिंग, स्टेम-२-स्टीम, डिजिटल रिइमॅजिनेशन नामक पद्धती, त्यांतील आव्हाने आदींविषयी पाहू या.

सध्याच्या रोबोटिक ऑटोमेशन, यांत्रिकीकरण याबद्दल काही ठळक गोष्टी प्रामुख्याने समोर येताहेत. त्या पुढीलप्रमाणे-

इ. स. २००० च्या आधीचा काळ : मागील काही दशकांपर्यंत जागतिक स्तरावर औद्योगिक यांत्रिकीकरण प्रचंड झपाटय़ाने वाढत होते. मनुष्याची शारीरिक कामे यंत्रामार्फत करण्यावर भर दिला जात होता. उदा. कारखान्यातील यांत्रिकीकरण, अवजड उत्पादन यंत्रे, इत्यादी.

इ. स. २००० पासून आजपर्यंत : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयामुळे व व्याप्तीमुळे यांत्रिकीकरण फक्त औद्योगिक यंत्रे, शारीरिक कामे इथपर्यंतच मर्यादित न राहता माणसाची बुद्धीची कामे, काही प्रमाणात का होईना, यंत्रामार्फत होऊ लागली. उदा. चॅटबोट, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन इत्यादी.

कृत्रिम बुद्धिमत्ता : साडेसहा वर्षांच्या मानवी बुद्धीसमान असलेली सध्याची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली जोमात वाढू लागली आहे आणि केवळ मानवी भावना, सर्जनशीलता आणि अत्यंत क्लिष्ट व्यवहारांचा यात अंतर्भाव एवढेच काय ते बाकी राहिले आहे.

डिजिटल दुनिया : आज कुठल्याही जीवनावश्यक गरजेला एक डिजिटल पर्याय शक्य झाला आहे किंवा होत आहे. वस्तुजाल (आयओटी), विदा विश्लेषण, ड्रोन, एआर/व्हीआर, क्लाऊडमुळे आपल्या डिजिटल पर्यायांमध्ये रोज नवीन भर पडतेय.. आणि एका पेटलेल्या वणव्याप्रमाणे याला थोपविणे कुठल्याही सरकारला व समाजाला अशक्यच! तेव्हा ‘डिजिटल लाइफ’ला स्वीकारणे जणू आता अपरिहार्यच होणार आहे.

मग भविष्यात मनुष्याला काय कामे उरतील?

पहिला गट : कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली यंत्रे, प्रणाली वापरून रोजचे जीवन जगणे (वापर); त्यांना सूचना देणे, देखरेख इत्यादी (अंकुश); त्यांचा वापर करून पूर्वी शक्य नसलेली कार्ये कुशलतेने करणे (साहाय्य.)

दुसरा गट : यंत्रांना जमणारी कार्ये आपल्याला स्वत:च करायला लागतील. (१) प्रचंड बुद्धिमत्तेची क्लिष्ट कामे. (२) सर्जनशीलता, नवनिर्माण, मानवी भावनिक संवाद, कला, क्रीडा.

वर दिलेल्या तक्त्यात, २०२० ते २०५० सालापर्यंतचे नवतंत्रज्ञानामुळे भविष्यातील रोजगारांवर होणारे परिणाम दर्शविले आहेत. त्यावरून अंदाज येऊ शकेल की, कुठले व्यवसाय यांत्रिकीकरणाला बळी पडतील अन् कुठले तगतील? पण हे सर्व व्हायला आणखी दोनएक दशके जातील. तेव्हा घाबरून न जाता काही गोष्टी करायच्या आहेत :

(अ) नवतंत्रज्ञानाबद्दल जमेल तितके ज्ञान मिळवणे.

(ब) नवीन तंत्रज्ञान स्वत: वापरायला शिकणे, शिकवणे – घरगुती आणि व्यावसायिक कामांसाठी.

(क) शक्य झाल्यास आपल्या व्यवसायामध्ये क्लिष्ट कामे, सर्जनशीलता, भावनिक संवाद आणि कला, क्रीडा प्रकार मिसळून नावीन्य आणावे; कुशलता, कार्यक्षमता वाढवावी.

(ड) सर्वात महत्त्वाचे कार्य – पुढच्या पिढीची तयारी आणि जडणघडण कशी कराल? याबाबत..

(१) डिजिटल अप-स्किलिंग :

– मुलांचे डिजिटल ज्ञान वाढवणे, यंत्रे वापरायला शिकवणे. पुस्तके, इंटरनेटवरील व्हिडीओ, व्याख्याने इत्यादी माध्यमांतून.

– अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाचे अवांतर वाचन करण्याची आवड लावणे, त्या त्या विषयाबद्दलचे नवतंत्रज्ञान जाणून घेणे. गृहपाठ करताना त्या त्या विषयाबाबतचे इंटरनेटवरील व्हिडीओ, लेख वाचणे.

– इंग्रजी वाचनाची सवय लावणे; कारण नवतंत्रज्ञानविषयक ज्ञान विशेषत: इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे आणि पुढेही त्यात बदल होणे अपेक्षित नाही. रोबोटिक भाषांतर करणारी प्रणाली विकसित होईलही, पण त्या शक्यतेवर मुळीच अवलंबून राहू नये.

(२) आधुनिक निर्मितीशास्त्र, सर्जनशीलता :

– पुस्तकी ज्ञान विरुद्ध उपयोजन, पाठय़क्रमातील विषयांची सूत्रे पाठ करणे विरुद्ध त्यांचा जीवनातील वापर जाणून घेणे.

– स्टेम-२-स्टीम शिक्षण पद्धती वापरात आणणे. स्टेम (एसटीईएम) म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यांचे शिक्षण. स्टीम (एसटीईएएम) म्हणजे असल्या रुक्ष अभ्यासक्रमात जाणीवपूर्वक कला, संगीत, निर्माण आदी विषयांचा अंतर्भाव करणे.

– त्याच्या अगदी उलट सध्या आपण शाळा-महाविद्यालयांत फक्त तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण इत्यादींवरच भर देतो आहोत. म्हणजे सगळे घडताहेत ‘डाव्या मेंदूचे योद्धे’ ..आणि पुढे जाऊन ही डाव्या मेंदूची कामे यांत्रिकीकरणामुळे उरणारच नाहीयेत!

(३) कला, क्रीडा, संगीत :

– अभ्यासक्रम कुठलाही असो; एखादी कला, वाद्य, संगीत आवर्जून शिकवावे, उजव्या मेंदूचा वापर वाढवणे.

– यात रुची असलेल्या मुलांना अशा पर्यायी व्यवसायांकडे वळवणे.

– त्याचबरोबर उत्तम वक्तृत्व कला, स्पष्ट संभाषणदेखील हवेच आणि जोडीला इंग्रजी भाषेवर पकड.

(४) मानवी तत्त्वे, मूल्ये व संभाषण कला :

– जर मुलांना आपण गणित, इतिहास इत्यादी शिकवतो, तर एक चांगला माणूस म्हणून समाजात कसे वागावे, याचे धडे देणारा अभ्यासक्रम शाळेतच का नसावा?

– इनोव्हेशन.. सध्याच्या व्यावसायिक दुनियेत यशस्वी होण्यासाठी तुमच्या सेवेत, उत्पादनात काही तरी वेगळेपणा हवा, ग्राहक सेवा अत्यंत माणुसकीने ओतप्रोत भरलेली असावी, त्यात कमीत कमी खर्चात हे सारे शक्य करून दाखवावे अशी अपेक्षा.

– वरील गोष्टी साध्य करण्यासाठी उच्चकोटीची सर्जनशीलता हवी. तसेच संवेदनशीलतादेखील हवीच, नाही तर विविध प्रकारच्या ग्राहकांचा विचार करणे कसे जमायचे?

१०-२० टक्के मुले उच्च शिक्षण घेऊन बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वत:चा मार्ग भविष्यातही नक्कीच शोधतील; परंतु मला नेहमी प्रश्न पडतो की, उर्वरित ८०-९० टक्के सामान्य बुद्धिमत्ता/ शिक्षण/ पाठबळ असलेल्यांविषयी- ते पुढे जाऊन काय करणार, कसे तगणार?

आजचा प्रश्न : २०५० मध्ये तुम्हाला कुठला व्यवसाय करायला आवडेल? तुमचे छंद काय असू शकतील?

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com