|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

वस्तुजाल किंवा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हणजे काय, त्याची घडण कशी असते हे पाहिल्यानंतर वस्तुजालाचे उपयोग काय, हा प्रश्न साहजिकपणे येतो. वस्तुजालाचा उपयोग भरपूर आहे..  पण त्याचा सध्या होणारा वापर त्यापेक्षा थोडा कमी आहे!

वस्तुजालाचे म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चे (आद्याक्षरांनुसार ‘आयओटी’चे) नेमके फायदे कोणते, याची काही उदाहरणे पाहताना मागील लेखात आपण ‘कनेक्टेड’ उपकरणांबद्दल जाणून घेतले; परंतु तीच उपकरणे जेव्हा ‘इंटेलिजंट’देखील होतील, तेव्हा तर आणखीही अनेक विस्मयकारक शक्यता निर्माण होतील. आजच्या लेखात वस्तुजालाच्या प्रगतीतील विविध विकास टप्पे समजून घेऊ  आणि एकंदरीत वाटचाल नवप्रज्ञेकडे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेकडे कशी होते आहे ते पाहू.

समजा, तुमची गाडी चालू स्थितीत तिच्या इंजिनचा डेटा (वेग, ऑइल तापमान, ब्रेकची झीज अशा कैक गोष्टी नोंदी) गाडीत लावलेल्या सिमकार्डद्वारा एका वस्तुजाल केंद्राला (आयओटी प्लॅटफॉर्मला) पाठवते आहे, तर आपण म्हणू की, हे वाहन ‘आयओटी’ तंत्रज्ञानावर आधारित आहे; परंतु ती गाडी फक्त स्वत:बद्दलची माहिती पाठवते आहे.. ही झाली एक शक्यता. आता त्या गाडीचे काही प्रमाणात नियंत्रणदेखील त्याच वस्तुजाल-केंद्राच्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनाही करता येते आहे, तर ही झाली अजून पुढची पायरी. उदाहरणार्थ, गाडीचे ब्रेक फारच झिजले आहेत, हे लक्षात येताच नियंत्रण-कक्षाद्वारे त्या कर्मचाऱ्यांनी गाडीच्या चालकाशी ब्रेक बदलण्यासाठी संवाद साधला आहे. त्याही पुढची तिसरी पायरी म्हणजे अशा बऱ्याच गाडय़ा एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांचा एकमेकात संवाद सुरू झाला आहे आणि त्याही पुढे, नियंत्रण-कक्षामधल्या कर्मचाऱ्यांनी जो निर्णय घेतला (गाडीचे ब्रेक बदलणे गरजेचे असून त्यासंबंधी गाडीच्या चालकाला सूचना देणे), तोच निर्णय त्या गाडीने स्वत:हून घेतला ही झाली सर्वोत्तम चौथी पायरी. एकंदरीत वस्तुजाल तंत्रज्ञान खालील चार टप्प्यांतून प्रगती करत आले आहे, ते खालीलप्रमाणे:

(१) माहितीची देवाणघेवाण, म्हणजे उपकरण सतत स्वत:बद्दल नोंदी (रीडिंग) पुरविते आहे.

(२) दुरुस्त नियंत्रण, म्हणजे सेंट्रल आयओटी प्लॅटफॉर्मद्वारा विविध उपकरणे जोडणे व त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे.

(३) एकमेकांशी जोडलेली उपकरणे, म्हणजे अनेक उपकरणे वस्तुजाल केंद्राच्या नियंत्रण कक्षाद्वारे एकमेकांशी संवाद साधताहेत (सध्याची परिस्थिती)

(४) वरील सर्व शक्यता, अधिक त्या सर्व उपकरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता येऊन ते स्वनिर्णय घेऊ  शकताहेत. (पुढील पाच-दहा वर्षांत शक्य)

वस्तुजालाचा आजचा वापर

वस्तुजालाचा वापर आजही काही प्रमाणात होतो आहे. त्याची काही यशस्वी उदाहरणे आपण पाहू :

(१) वयोवृद्धांवर देखरेख:

सिंगापूर सरकारने प्रत्येक नोंदणीकृत वृद्धाच्या खोलीत मुख्य दरवाजाला आणि स्नानगृहाच्या दरवाजाला वस्तुजाल-संवेदक (आयओटी सेन्सर)  लावले आहेत आणि एक व्हिडीओ कॅमेरादेखील आहे. तसेच वृद्धाच्या मनगटावर वस्तुजाल-संवेदकयुक्त ताईत किंवा ‘कनेक्टेड हेल्थ बँड’देखील आहेतच. बाथरूमचा दरवाजा बराच वेळ  वापरात आला नाही तरी आयओटी प्लॅटफॉर्म स्वत:हून खोलीतील व्हिडीओ कॅमेरा सुरू करून त्या वृद्धाची हालचाल नोंदवण्याचा प्रयत्न करतात. तिथे काही गडबड आढळल्यास लगेच नियंत्रण-कक्षाला संदेश जाऊन तातडीने वैद्यकीय मदत पोचविली जाते. हे वृद्ध एकाच ठिकाणी राहात नाहीत.. ठिकठिकाणी विखुरलेल्या या शंभराहून खोल्यांवर चोवीस तास मनुष्याकरवी देखरेख ठेवणे अशक्यच आणि जराही दुर्लक्ष झाल्यास दुर्घटना ठरलेली. देखरेखीच्या अशा आव्हानावर ‘आयओटी’ तंत्रज्ञानने सुटसुटीत उपाय शोधला आहे.

(२) स्मार्ट-होम (ऊर्जा बचत, उपकरणांचा योग्य वापर) :

मागील लेखात बघितल्याप्रमाणे एका घरातील उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करू या. समजा, आपल्या घरात एक फ्रिज, दोन एसी, चार पंखे, दहा एलईडी बल्ब, मुख्य दरवाजाबाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा, एक टीव्ही, म्युझिक सिस्टम आणि दोन संगणक अशी उपकरणे साधारणपणे वापरात आहेत. त्याचबरोबर गॅसगळतीचा संवेदक, आग/ धूर यांसाठीचा संवेदक (फायर/स्मोक सेन्सर) अशी उपकरणे आणि अर्थातच वायफाय राऊटरदेखील लावली आहेत आणि सर्व उपकरणे ‘आयओटी-एनेबल्ड’ आहेत- म्हणजे प्रत्येकामध्ये ‘आयओटी-सर्किट’ आहेत. अशा घरगुती वस्तुजाल वापरासाठी हल्ली बरीच मोबाइल उपयोजने किंवा ‘अ‍ॅप्स’ मोफत उपलब्ध आहेत (गूगल होम, अ‍ॅमेझॉन अलेक्सा इत्यादी). हे ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करून त्यावर तुमच्या आयओटी-एनेबल्ड उपकरणांची नोंदणी केली की काम झाले. मग ती सर्व उपकरणे तुम्ही मोबाइलद्वारेच बंद/चालू करू शकता आणि खालील सर्व फायदे मिळवू शकता :

(अ) बंद पडण्याची सूचना मिळणे आणि वेळीच खबरदारी (सक्रिय देखभाल)

(आ) गुणवत्ता चाचणी व त्यामधून बचत (वीज, दुरुस्ती खर्च इत्यादींची किफायत)

(इ) धोक्याची सूचना व जीवितहानीपासून सुरक्षा (ब्रेकफेल, शॉर्टसर्किट, गॅसगळती, घरफोडी वगैरे)

(ई) दूरस्थ संचालन व देखरेख (कुठूनही उपकरण चालू/बंद इत्यादी)

(ऊ) आपत्कालीन संपर्क (अ‍ॅलर्ट संदेश)

पण ही झाली सध्याची स्थिती, पुढल्या काळात तीन गोष्टी होतील :

– सर्व तंत्रज्ञान स्वयंचलित होईल,

– ती उपकरणे एकमेकांशी संवाद साधू लागतील

– त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा स्वनिर्णय घेण्याची क्षमतादेखील येईल.

म्हणजे नक्की काय होऊ  शकेल तुमच्या स्मार्ट-होममध्ये?

(क) कुठलेही उपकरण बंद पडावयास आले, तर वस्तुजाल-नियंत्रण कक्षाद्वारे ‘सव्‍‌र्हिस-सेंटर’शी संवाद साधून दुरुस्ती कर्मचाऱ्याला (फिल्ड टेक्निशियनला) बोलावणे धाडले जाईल.

(ख) सर्व उपकरणे स्वत:च सर्वोत्तम वापरच्या चाचण्या करून कमीत कमी वीज वापर आणि त्याच वेळी घरातील विविध व्यक्तींची विशिष्ट आवडनिवड लक्षात ठेवून त्याप्रमाणे ते उपकरण चालू/बंद करतील.

(ग) कुठलीही धोकादायक परिस्थिति उद्भवल्यास स्वत:च घरमालकाशी संवाद साधतील, स्वत:चा वीजपुरवठा बंद करतील इत्यादी.

(घ) उपकरणे एकमेकांशी जोडलेली असल्यामुळे उदाहरणार्थ फ्रिजमधील वस्तू संपल्यास फ्रिज ए-कॉमर्सद्वारा त्या गोष्टी स्वत:च ऑर्डर करून ठेवेल.

(३) स्मार्ट-कार :

हल्ली बऱ्याच गाडय़ा ‘स्मार्ट’ सुविधा घेऊन बाजारात येत आहेत. त्यातील ठळक वैशिष्टय़े म्हणजे गाडीच्या सर्व महत्त्वाच्या नोंदी वस्तुजाल-संवेदकांद्वारे एका केंद्रीभूत वस्तुजाल-नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचविल्या जात आहेत. तिथे त्या सर्व नोंदींच्या ‘डेटा’चे विश्लेषण होऊन काही विसंगती आढळल्यास लगेच नियंत्रण कक्षातले कर्मचारी गाडीच्या मालकाशी संवाद साधून गरज पडल्यास गाडी दुरुस्तीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करतात. इथे आणखी बरीच मजल गाठायचीय म्हणा!

पुढील लेखात पाहू या वस्तुजालाच्या वापराची आणखी काही उदाहरणे व सध्याची आव्हाने.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com