‘रिक्तता’ या शब्दाला नकारात्मक छटा आहे. खरंतर ‘रिकामा’ हा शब्द अत्यंत सकारात्मक आहे, तुमच्या तथाकथित ‘भरलेल्या’हूनही सकारात्मक. कारण रिक्तता म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य; बाकी सगळं काही काढून टाकलं गेलंय त्यातून. रिकामेपणा खूप प्रशस्त आहे; सगळ्या सीमाच पुसून टाकलेल्या आहेत. तो बंधमुक्त आहे- आणि केवळ बंधमुक्त अवकाशातच स्वातंत्र्य शक्य आहे.. 

मौल्यवान म्हणावं असं काहीही शक्य होतं ते स्वातंत्र्याच्याच वातावरणात! प्रेम जोपासलं जातं स्वातंत्र्याच्याच मातीत; स्वातंत्र्याशिवाय प्रेम वाढूच शकत नाही, स्वातंत्र्याशिवाय प्रेमाच्या नावाखाली जे काही वाढतं, ती खरंतर वासना असते. स्वातंत्र्याशिवाय ईश्वरही नसतोच. स्वातंत्र्य नसतं तेव्हा तुम्ही ज्याला ईश्वर म्हणता ना, ती केवळ तुमची कल्पना असते, भीती असते, हाव असते. स्वातंत्र्याशिवाय स्वर्ग नसतोच : स्वातंत्र्य हाच स्वर्ग आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की स्वातंत्र्यावाचून स्वर्ग शक्य आहे, तर त्या स्वर्गाला काहीच किंमत नाही, तो खरा स्वर्ग नाहीच. ती तुमची कल्पना आहे, तुमचं स्वप्न आहे.

स्वातंत्र्य हे उद्दिष्ट आहे. जागरूकता ही त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याची पद्धत. आणि जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त असता, तेव्हा स्वामी असता; गुलामगिरी नाहीशीच होते. सामान्यपणे आपण मुक्त वाटत असलो, तरी प्रत्यक्षात आपण तसे नसतो. असं वाटतं की आपण निवडतोय गोष्टी पण प्रत्यक्षात आपण त्या निवडतच नसतो. आपण ओढले जात असतो, ढकलले जात असतो कोणत्या तरी अज्ञान शक्तींनी.

जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, मग तुम्ही स्त्री असा की पुरुष, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही प्रेमात पडण्याचा निर्णय घेतला, तुम्ही निवडलात हा पर्याय? तुम्हाला हे चांगलंच माहीत असतं की, तुम्ही प्रेम करण्याचा पर्याय निवडू शकत नाही, तुम्ही कोणावर तरी प्रेम करण्यासाठी स्वत:ला भाग पाडू शकत नाही. तुम्ही स्वामी नसता, तुम्ही एका जीवशास्त्रीय शक्तीचे गुलाम असता केवळ. जसं- ‘प्रेमात पडणं’. तुम्ही प्रेमात पडता : स्वातंत्र्याच्या अवस्थेतून तुम्ही प्रेमात पडता, स्वत्त्वाच्या अवस्थेतून प्रेमात पडता. प्रेमात पडण्याचा पर्याय जर निवडता आला असता, तर तुम्ही प्रेमात पडला नसतात. प्रेमात एका उंचीवर पोहोचला असतात, पडला नसतात. प्रेम जाणीवपूर्वक झालं असतं आणि मग ते पूर्णपणे वेगळ्या दर्जाचं प्रेम असतं. एक आगळं सौंदर्य, एक आगळा सुगंध असतो त्या प्रेमाला.

सामान्य प्रेमाला दुर्गंध येतात- मत्सर, राग, द्वेष, मालकीहक्काची जाणीव यांचे दुर्गंध. ते प्रेम नाहीच खरं तर. निसर्ग तुम्हाला अशा कशाकडे तरी ढकलतो, ज्याची निवड तुम्ही केलेली नाही; तुम्ही बळी असता केवळ. ही आपली गुलामगिरी आहे. प्रेमातसुद्धा आपण गुलाम असतो, मग अन्य बाबतीत काय सांगायचं? प्रेम हा आपल्या आयुष्यातला सर्वात महान अनुभव असतो, त्यातही गुलामगिरी आहे, त्यातही आपण केवळ सहन करतो.

लोक प्रेमात जेवढं सहन करतात, तेवढं अन्य कशातही करत नाहीत. प्रेमात सगळ्यात जास्त काय सहन करावं लागत असेल, तर ते तुम्हाला फसवतं- तुम्ही निवडकर्ते आहात, असा भ्रम ते निर्माण करतं आणि लवकरच तुम्हाला कळतं की तुम्ही निवडकर्ते नाहीच आहात; निसर्ग खेळ खेळलाय तुमच्यासोबत. अज्ञात शक्तींनी तुमचा ताबा घेतला आहे, तुम्ही कोणाच्या तरी मालकीचे झाला आहात. तुम्ही काहीच स्वत:चं स्वत: करत नाही आहात; तुम्ही केवळ एक वाहन आहात. प्रेमात पडल्यानंतर व्यक्तीला पहिलं दु:ख सतावायला लागतं ते हेच आणि मग हे एक दु:ख साखळी तयार करतं दु:खांची. आपण कोणाच्या तरी मालकीचे आहोत ही भावना कोणालाच आवडत नाही. कारण, कोणाच्या तरी मालकीचं होणं म्हणजे तुमचं अस्तित्व एखाद्या वस्तूसारखं होऊन जाणं. सगळ्या मानवजातीच्या भोगाचं साधं कारण म्हणजे प्रत्येक नातं तुम्हाला कुरतडत जातं, तुमचा तुरुंग अधिकाधिक छोटा करत जातं. तुमचं जगणं अज्ञात शक्तींच्या हातात जातं. तुम्ही जागे होत नाही, स्वत:चं आयुष्य स्वत:च्या हातात घेत नाही, तुमच्या प्रेरणांपासून तुम्ही स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वत:च्या आयुष्यावर स्वामित्व मिळवू शकणार नाही. आणि स्वामित्व मिळालं नाही, तर सुख नाही, आशीर्वाद नाही; आयुष्य नरक होऊन जातं.

आयुष्यातली सगळी महान मूल्यं जोपासली जातात ती स्वातंत्र्याच्या वातावरणात; म्हणूनच स्वातंत्र्य हे सर्वात मूलभूत मूल्य आहे आणि सर्वोच्च शिखर आहे. हे स्वातंत्र्य सामाजिक नाही, हे राजकीय नाही, हे आर्थिकही नाही. हे आध्यात्मिक स्वातंत्र्य आहे, एक अशी जागृतावस्था आहे, ज्यात कोणत्याही इच्छेचा व्यत्यय नाही, सर्व इच्छांपासून मुक्त, लालसेच्या आणि वासनेच्या बेडय़ांपासून मुक्त. ही अवस्था पूर्णपणे रिक्त आहे, कारण त्यात काही असेल तर त्याचा स्वातंत्र्याला अडथळा होईल; म्हणून ही अवस्था पूर्णपणे रिकामी आहे.

‘रिक्तता’ या शब्दाचाही लोक खूप चुकीचा अर्थ घेत आले आहेत. कारण, या शब्दाला नकारात्मक छटा आहे. रिकामा असा शब्द आपल्या कानावर पडला की आपल्या मनात काहीतरी नकारात्मक असा विचार येतो. रिकामा हा शब्द अत्यंत सकारात्मक आहे, तुमच्या तथाकथित ‘भरलेल्या’हूनही सकारात्मक. कारण रिक्तता म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य; बाकी सगळं काही काढून टाकलं गेलंय त्यातून. रिकामेपणा खूप प्रशस्त आहे; सगळ्या सीमाच पुसून टाकलेल्या आहेत. तो बंधमुक्त आहे- आणि केवळ बंधमुक्त अवकाशातच स्वातंत्र्य शक्य आहे. त्याचा रिकामेपणा हा काही सामान्य रिकामेपणा नाही; ही कशाची तरी अनुपस्थिती नाही, तर अदृश्याची उपस्थिती आहे.

उदाहरण द्यायचं तर, तुम्ही एखादी खोली रिकामी करता : म्हणजे त्यातलं सामान, चित्रं सगळं काढून टाकता, आता खोली रिकामी होते एकीकडे, पण दुसरीकडे काहीतरी अदृश्य या खोलीला भरून टाकतं. हा अदृश्यपणा म्हणजे ‘मोकळेपणा’, ‘प्रशस्तपणा’; ती खोली आता मोठी वाटते. तुम्ही जसजसं सामान काढत जाल, तसतशी ती आणखी आणखी मोठी वाटत जाते. एकदा का सगळं बाहेर काढलं, अगदी भिंतीही काढून टाकल्या की मग ती खोली खुल्या आकाशाएवढी मोठी होते. खऱ्या धर्माचं अंतिम उद्दिष्ट स्वातंत्र्य हेच आहे- ईश्वर नाही, स्वर्ग नाही, अगदी सत्यही नाही, तर स्वातंत्र्य. स्वातंत्र्य सर्वोच्च आहे, सर्वोच्च उद्दिष्ट; त्यापेक्षा अधिक उंचीवर काहीही नाही.

(‘धम्मपदा : द वे ऑफ द बुद्धा’ या लेखाचा अंश/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/सौजन्य ओशो इंटरनॅशन फाउंडेशन/www.osho.com)

लोकसत्ता टीम chaturang@expressindia.com