03 August 2020

News Flash

रिक्तता..

मी ज्याचं वर्णनच करू शकत नाही अशी एक भावना सारखी माझ्या हृदयात भरून येते.

मी ज्याचं वर्णनच करू शकत नाही अशी एक भावना सारखी माझ्या हृदयात भरून येते. ती भावना गहिऱ्या प्रेमात असते- पण तशीच भावना भीती, मन:स्ताप, वेदना, हतबलता, वैफल्य या साऱ्यांतही येते. एकमेकींपासून निराळ्या वाटणाऱ्या प्रत्येक भावनेत नक्कीच काहीतरी साम्य असतं; भारावल्यासारखं वाटणं किंवा दडपून गेल्यासारखं वाटणं. मग ते प्रेम असेल, तिरस्कार असेल, राग असेल- ते काहीही असू शकतं. ते खूप असतं तेव्हा ते तुम्हाला कशाने तरी दडपल्याची जाणीव देतं. अगदी वेदना आणि भोगही असाच अनुभव देऊ शकतात, पण या दडपल्या जाण्याला स्वत:चं असं काही मूल्य नाही. ते फक्त तुम्ही एक भावनाप्रधान व्यक्ती आहात हे दाखवून देतं.

ही भावनाप्रधान व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़पूर्ण खूण आहे. जेव्हा राग येतो, तेव्हा तो राग सगळं काही असतो. जेव्हा प्रेम वाटतं, तेव्हा सगळं काही प्रेमच असतं. या व्यक्तिमत्त्वावर भावनेची नशा चढते, अंधत्व येतं. आणि यातून जे काही कृत्य केलं जातं, ते चुकीचं असतं. हा उमाळा अगदी प्रेमाचा असला, तरी त्यातून निर्माण होणारी कृती योग्य असेलच असं नाही. अगदी मूलभूत बाजू बघितली, तर जेव्हा तुम्ही एखाद्या भावनेने दडपून गेलेले असता, तेव्हा तुम्ही तर्कशक्ती हरवून बसता, संवेदनशीलता हरवून बसता, तुम्ही तुमचं हृदयच यात गमावून बसता. ती भावना एका काळ्या मेघासारखी होऊन जाते आणि तुम्ही त्यात हरवून जाता. आता तुम्ही जे काही कराल, ते चुकीचं असेल.

प्रेम हा तुमच्या भावनेचा भाग व्हायला नको. सामान्यपणे लोकांना हेच वाटतं आणि अनुभवही येतो, पण दडपून टाकणारं हे काहीही खूप अस्थिर असतं. ते वाऱ्यासारखं येतं आणि पुढे निघून जातं, तुम्हाला मागे ठेवून. रिकाम्या, उद्ध्वस्त अवस्थेत ठेवून. दु:खात, क्लेशात ठेवून.

माणसाच्या संपूर्ण अस्तिवाचं ज्ञान ज्यांना आहे, त्याच्या मनाचं, त्याच्या हृदयाचं, त्याच्या अस्तित्वाची जाणीव ज्यांना आहे, त्यांच्या मते, प्रेम हे तुमच्या अस्तित्वाचं व्यक्तीकरण आहे, ती भावना नाहीच. भावना खूपच नाजूक असतात, सतत बदलत राहतात. एक क्षण तुम्हाला वाटतं की सगळं काही आहे. दुसऱ्या क्षणी वाटतं की तुम्ही अगदी रिकामे आहात तेव्हा पहिली गोष्ट काय कराल, तर प्रेमाला या दडपून टाकणाऱ्या भावनांच्या गर्दीतून बाहेर काढा. प्रेम म्हणजे दडपून जाणं नव्हे.

उलट प्रेम म्हणजे विलक्षण बोध, स्पष्टता, संवेदनशीलता, जागरूकता.

पण या प्रकारचं प्रेम क्वचितच दिसतं, कारण खूप कमी लोक त्यांच्या अस्तित्वापर्यंत पोहोचू शकतात.

काही लोक त्यांच्या गाडय़ांवर प्रेम करतात.. हे प्रेम त्यांच्या मनाने केलेलं असतं. आणि मग तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता, नवऱ्यावर प्रेम करता, तुमच्या मुलांवर प्रेम करता- ते झालं हृदयाने केलं प्रेम. मात्र, या प्रेमाला जिवंत राहण्यासाठी बदलत राहावं लागतं, आणि तुम्ही या परिवर्तनशीलतेला परवानगी देऊ शकत नाही. मग ते शिळं होऊन जातं. रोज तोच नवरा- हा काय कंटाळवाणा अनुभव आहे. हा अनुभव तुमची संवेदनशीलता बोथट करतो, तो आनंदाची शक्यता अंधूक करतो. तुम्ही हळूहळू हास्याची भाषा विसरू लागता. आयुष्य म्हणजे आनंदाशिवाय केलेलं एक काम होऊन जातं. आणि प्रत्येकाला काम हे करावंच लागतं, कारण त्याला बायको आहे, मुलं आहेत.

तुम्हाला प्रेमाला भावनेच्या कचाटय़ातून बाहेर काढावं लागेल. ते तुमच्या जन्मापासून भावनेच्या कचाटय़ात अडकलं आहे. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाकडे जाणारा मार्ग शोधावा लागेल. जोपर्यंत तुमचं प्रेम तुमच्या अस्तित्वाचा भाग होत नाही, तोवर प्रेमात आणि वेदनेत, भोगात, दु:खात फारसा फरक नाही.

ओशो, ओम शांती शांती शांती: द साउंडनेस साउंड, पीस पीस पीस, टॉक #१

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2018 3:20 am

Web Title: osho philosophy part 23
Next Stories
1 प्रेम द्या!
2 व्यक्तिमत्त्व विषारी आणि पोषक
3 अनुकंपा
Just Now!
X