ज्या क्षणी मन तुम्हाला त्रास देणं सोडून देईल, त्या क्षणी तुम्ही पूर्वी कधीच नव्हतात इतके शहाणे, निरोगी असाल. प्रथमच तुम्ही खऱ्या अर्थाने जन्म घ्याल; विचार आणि भीतीच्या तुरुंगातून मुक्त व्हाल. अस्तित्वाचा इंद्रियांपलीकडचा एक अनुभव तुम्ही घ्याल, तो म्हणजे स्वातंत्र्य.

ओशो,

माझं मन सारखं एका भीतीची जाणीव करून देत असतं. ती म्हणजे काहीतरी चुकीचं पाऊल उचललं जाईल आणि मला तुमचं प्रेम गमवावं लागेल. आणि तरीही मला यापूर्वी कधीच वाटलं नव्हतं तेवढय़ा उत्कटतेने वाटतं की तुम्ही माझ्या श्वासांत, हृदयात सामावलेले आहात, तुम्ही माझ्यात एक झालेले आहात, माझ्या दोन श्वासांमधलं अवकाश म्हणजे तुम्हीच आहात, माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक तंतूत तुम्ही वास करून आहात. तुमच्यापासून वेगळं होण्याची चिंता भासू नये अशी इच्छा होते. तरीही का मी माझ्या मनाचं ऐकते आणि काळजी करत राहते? किंवा मला येणारा हा अनुभव म्हणजे भ्रमच आहे का?

उत्तर –

मन म्हणजेच भीती. मन फार भित्रं आहे. त्याला कायम सुरक्षा, सुरक्षितता, निश्चितीची काळजी असते. मात्र प्रेमाचं, ध्यानाचं जग म्हणजे निव्वळ असुरक्षितता; तुमच्या हातात कोणताही नकाशा न देता ते तुम्हाला अज्ञाताकडे घेऊन जातं, तुम्ही कुठे जाताय ते कळत नाही, तुम्ही नेमके कुठे पोहोचणार ते माहीत नसतं.

मन निसर्गत:च चिंता करणारं आहे, तुम्ही कुठे जाताय, काय शोधताय असे प्रश्न त्याला पडतात. ऐहिक जगातल्या महामार्गावर मैलाचे दगड असतात, नकाशे असतात, तुम्ही कुठे जाताय आणि कुठे पोहोचणार आहात हे माहीत असतं. पण प्रेमाचं जग, ईश्वरभक्तीचं जग खुल्या आकाशासारखं आहे. पक्षी आकाशात उडतात, पण अन्य पक्ष्यांसाठी पाऊलखुणा ठेवत नाहीत. पुढची पिढी भरकटू नये म्हणून महामार्ग बांधत नाहीत.

मानवी मनाला मात्र कायम भरकटण्याची चिंता असते. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, मनाचा स्वभावच चिंता करण्याचा आहे. आपल्याला पाच बोटं आहेत हे एकदा स्वीकारलं की पाचच बोटं का, असा विचार रोज करायची वेळ येत नाही. विद्यापीठातल्या माझ्या एका शिक्षकांना सहा बोटं होती. ते कायम सहावं बोट लपवायचे. मी त्यांना एक कागद द्यायचो आणि त्यांना तो सहा बोटं असलेल्या हातानेच धरावा लागायचा. सगळा वर्ग मग हसायचा. कारण त्या पेपरवर मी लिहिलेलं असायचं- हे फक्त तुमचं सहावं बोट सर्वाना दाखवण्यासाठी.

त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून विचारलं- हे काय होतं?

मी म्हणालो- तुम्ही तुमचं सहावं बोट लपवत होता. आणि मला फक्त सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की आपल्याला सहा बोटं असलेले एक महान शिक्षक आहेत. अगदी व्याख्यान देतानाही तुम्ही हात खिशात ठेवता. एकदाच तुमची सहा बोटं सर्वाना दाखवून टाका. आणि विचारा कोणाला काही आक्षेप आहे का ते. विषय संपून जाईल. काळजी कशाला करता?

लक्षात घ्या, मन कायम प्रश्न निर्माण करेल. तुम्ही कोणत्या का अवस्थेत असा- हे सत्य आहे की कल्पना? हे वास्तव आहे की स्वप्न? मला भ्रम होत आहेत की हा खरोखर अस्तित्वात असलेला अनुभव आहे? एकदा आणि कायमचं सांगून टाका मनाला- तुझा याच्याशी संबंध नाही. हा भ्रम असेल तरी मला त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात काहीच अयोग्य नाही. शेवटी अत्यानंद हाच निकष हवा. एखादी गोष्ट माझं हृदय आनंदाने भरून टाकत असेल, तर ती खरी आहे की खोटी याची काळजी कशाला? अन्यथा, तुम्हाला अगदी आत्मज्ञान प्राप्त झालं तरी मन सांगणार- आधी चौकशी कर की हे खरंच आत्मज्ञान आहे की अतिशयोक्त कल्पना आहे. जर ही कल्पना असेल, तर ती एक सुंदर कल्पना आहे. स्वप्न असेल, तर गोड स्वप्न आहे. दु:स्वप्नापेक्षा चांगलंच आहे ना. मनाला सतत त्याच्या जागेवर ठेवावं लागतं. सांगावं लागतं, ‘तुझ्याकडे मी अजिबात लक्ष देणार नाहीये. मी माझ्या कल्पनेचा आनंद लुटणार आहे, भ्रमाचा आनंद लुटणार आहे. मी स्वप्नांचा आनंद लुटणार आहे. तू व्यत्यय आणू नकोस.’

तुम्ही सुखी असणं हे खरं वास्तव आहे, ते काही उद्दिष्ट नाही. तुमचं सुखी असणं हाच या वास्तवाचा निकष आहे. पण हे मन हुशार आणि धूर्त असतं. सुखाच्या क्षणात ते तुमचं लक्ष दुसरीकडे वळवू शकलं नाही, तरी ते विचार करत राहतं आणि तुम्हाला भरकटवणाऱ्या कल्पना सुचवतं. मग रस्ता चुकतो.

तुम्ही आत्ता ज्या क्षणात आहात, त्याच क्षणातून पुढचा क्षण जन्म घेतो. भविष्यकाळ काही आकाशातून पडत नाही. तो तुमच्यातच वाढत असतो. तुमच्या वर्तमानातूनच भविष्यातला क्षण उमलणार आहे. याच आयुष्यातून आणखी एक आयुष्य आकाराला येणार आहे. याच अनुभवातून आणखी एक शाश्वत अनुभव जन्मणार आहे. पण तुम्ही मनाचं ऐकत बसता आणि ते प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत राहतं.

मनाला आजची मन:शांती हिरावून घेऊ देऊ नका. भविष्यकाळ त्याची काळजी स्वत: घेईल. कारण, जसं वर्तमान असतं, तसाच भविष्यकाळ येतो आणि वर्तमानाची काळजी घेणं तुम्हाला जमतं. तेव्हा तुमचं सुख हाच निकष असू द्या. काहीतरी तुम्हाला सुखी करत असेल, तर ते वास्तव असलंच पाहिजे. अवास्तवातून सुख कधीच मिळत नाही. आणि तुमचं सुख वाढत जात असेल, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. सुखाची भावना कमी होतेय असं जेव्हा वाटेल तेव्हा समजा की मार्ग चुकतोय. मग तुम्हाला सुखी वाटत होतं त्या मार्गावर परत या. एक छोटासा निकष, पण तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी पुरेसा आहे. हळूहळू मन नाक खुपसणं सोडून देईल, म्हणेल- ही व्यक्ती वेडी झालीय. माझा शहाणपणाचा सल्ला ऐकत नाही. मनाचा सल्ला ऐकून कोणालाही सत्याची प्राप्ती झालेली नाही. ज्यांना सत्याची प्राप्ती झाली ते मनाविरुद्ध गेले, मनापलीकडे गेले, मनाला त्यांनी बाजूला ठेवलं.

एक निश्चित की, मन तुम्हाला मौल्यवान असं काहीही देणार नाही. तेव्हा त्याचं ऐकणं थांबवा. ते तुम्हाला काही क्षणही शांत बसू देणार नाही, सारखं टोचत राहील, ‘अरे, इथे काय करतोहेस, एवढय़ा वेळात तुला किती पैसा कमावता आला असता. निदान पेपर वाचता आला असता. वाया घालवलीस ना एक सकाळ..’

या मनाला कायम बाजूला सारत राहा. मन तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही त्याला सतत बाजूला करत राहिलात तर हळूहळू त्रास देणं सोडून देईल, म्हणेल- ही व्यक्ती शहाणी होण्याच्या पलीकडे गेली आहे.

ज्या क्षणी मन तुम्हाला त्रास देणं सोडून देईल, त्या क्षणी तुम्ही पूर्वी कधीच नव्हतात इतके शहाणे, निरोगी असाल. प्रथमच तुम्ही खऱ्या अर्थाने जन्म घ्याल; विचार आणि भीतीच्या तुरुंगातून मुक्त व्हाल. अस्तित्वाचा इंद्रियांपलीकडचा एक अनुभव तुम्ही घ्याल, तो म्हणजे स्वातंत्र्य.

ही जागा मनासाठी नाही. आपलं मन बाहेर सोडून येऊ शकतात त्यांच्यासाठी ही जागा आहे. आनंदाने नाचत आतमध्ये या. आणि बाहेर पडाल तेव्हा तिथे ठेवलेलं आपलं मन उचला किंवा दुसऱ्या कोणाचं तरी. कारण सगळी मनं सारखीच वेडी आहेत. कधीतरी ती बदलून बघणं चांगलंच. थोडय़ा वेगळ्या गप्पा होतील.

पण इथे तुम्हाला मनाचा पूर्ण त्याग करून यावं लागेल. मी तुम्हाला एवढी एकच भेट देऊ शकतो; मनाशिवाय राहण्यात मदत करणं. आणि मग अस्तित्वाचा सगळा ठेवा तुमचाच असेल.

भाषांतर – सायली परांजपे

chaturang@expressindia.com

(ओशो -‘द रेझर्स एज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाइम्स इंटरनॅशनल /ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)