23 January 2021

News Flash

लक्ष, जाणीव आणि एकाग्रता

तुम्ही उरलेलं संपूर्ण आयुष्यही ती विसरणार नाही.

हे कदाचित तुमच्याबाबतीत घडलं नसेलही, पण काही गोष्टी आपण कधीच विसरत नाही. असं का होतं? उदाहरणार्थ, आपण गृहीत धरू की तुमच्या वयाच्या पाचव्या वर्षी कोणी तरी तुम्हाला थप्पड मारली. अनेक र्वष उलटली तरी अजूनही ती घटना तुमच्या मनात ताजी आहे आणि तुम्ही उरलेलं संपूर्ण आयुष्यही ती विसरणार नाही. काय असेल यामागचं कारण?

ज्या क्षणी तुम्हाला थप्पड बसली, त्या क्षणी तुमचं लक्ष त्याकडे अगदी स्पष्ट असणार. म्हणूनच ती घटना तुमच्या मनात खोलवर कोरली गेली. जेव्हा एखाद्याला मार बसत असतो तेव्हा त्याचं अवधान कमालीच्या उंचीवर असणं तर साहजिकच आहे. म्हणूनच माणूस अपमानाचे क्षण, वेदनेचे क्षण आणि आनंदाचे क्षण कधीही विसरू शकत नाही. हे क्षण उत्कट असतात. या क्षणांमध्ये तो इतका जागृत असतो की त्या क्षणाची स्मृती त्याच्या संपूर्ण जाणिवेत भरून राहते. दैनंदिन आयुष्याचा भाग असलेल्या साधारण गोष्टी मात्र तो विसरून जातो.

हे ध्यान, हे भान म्हणजे काय हे आपण कसं ओळखणार? कारण हा एक अनुभव आहे आणि म्हणून समजून घेण्यास थोडा कठीण आहे. मी तुमच्या शरीरात टाचणी टोचली तर काय होईल? ही टाचणी जिथे टोचली गेली आहे त्या भागाकडे तुमचं सगळं लक्ष एकवटलं जायला सुरुवात होईल. शरीरातला तो भाग अचानक महत्त्वाचा होऊन जाईल. तुमचं सगळं अस्तित्वच त्या भागात सामावलं जाईल. त्या क्षणी तुम्ही म्हणजे केवळ जिथे टाचणी टोचली जातेय तो भाग होऊन जाल.

म्हणजे नेमकं काय घडलं तुमच्या आतमध्ये? टाचणी टोचली नव्हती तेव्हाही तुमच्या शरीराचा तो भाग तिथे होताच पण तुम्हाला त्याची जाणीव नव्हती, तुम्ही त्याची दखल घेत नव्हतात; तुमच्या शरीरावर असाही काही बिंदू आहे हे तुमच्या लक्षातच नव्हतं. आणि मग अचानक त्या वेदनेमुळे आणीबाणी निर्माण झाली आणि तुमचं अवघं लक्ष त्या भागाकडे एकवटलं.

त्या बिंदूकडे त्वरेने गेलं ते काय होतं? तुमच्या आतमध्ये काय झालं नेमकं? आता सगळं कसं बदललं? असं काय आहे, जे एका क्षणापूर्वी अस्तित्वात नव्हतं पण आता आहे? ती आहे जाणीव, भान. एका क्षणापूर्वी हेच अस्तित्वात नव्हतं. ही जाणीव नव्हती त्यामुळे तुम्हाला शरीराचा तो भाग अस्तित्वात आहे की नाही याची पर्वा नव्हती. तुम्हाला त्याचं ज्ञानच नव्हतं. तो भाग असला किंवा नसला याने तुम्हाला फारसा फरक पडत नव्हता. अचानक तुमच्या शरीरातील त्या भागाचं भान तुम्हाला आलं. आता अचानक त्याच्या अस्तित्वामुळे बराच फरक पडू लागला आहे. आता तो महत्त्वाचा आहे. आता त्याच्या अस्तित्वाचं भान तुम्हाला प्रकर्षांने आलं आहे.

तर लक्ष म्हणजे भान, जागरूकता. जागरूकतेचेही दोन प्रकार आहेत. त्यातल्या एकाला आपण एकाग्रता म्हणतो. तुमचं लक्ष एका बिंदूवर केंद्रित होतं, तेव्हा तुम्हाला बाकी सगळ्याचा विसर पडतो ही बाब समजून घेणं एकाग्रता समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. मी यापूर्वी म्हणालो त्याप्रमाणे, तुमच्या शरीरात टाचणी खुपसली तर तुमचं सगळं लक्ष त्या टाचणीची वेदना होत असलेल्या बिंदूकडे जाईल. उरलेल्या शरीराचा तुम्हाला विसर पडेल. खरं तर आजारी माणसाला केवळ त्याच्या शरीराच्या बऱ्या नसलेल्या भागाचं भान असतं. तो केवळ शरीराच्या वेदना देणाऱ्या भागाभोवती जगू लागतो; उरलेलं शरीर त्याच्या लेखी अस्तित्वातच नसतं. एखाद्याचं डोकं दुखत असतं तेव्हा तो केवळ त्या डोक्यापुरताच उरतो; उरलेलं शरीर त्याच्या लेखी अस्तित्वातच उरत नाही. ज्याचं पोट दुखत असेल, त्याचं सगळं लक्ष त्या पोटावर केंद्रित होतं. पावलाला काटा टोचला की ते पाऊल सर्वकाही होऊन जातं. हे आहे लक्ष एकाग्र होणं. अवघं लक्ष, जागरूकता एका ठिकाणी गोळा करून ठेवता तुम्ही.

जेव्हा अवघी जागरूकता एका ठिकाणी एकवटते, एका बिंदूमध्ये सामावते; तेव्हा बाकीच्या भागांचं अस्तित्व नाकारलं जातं, ते अंधारात नाहीसे होतात. जेव्हा एखाद्याच्या घराला आग लागते, तेव्हा आपलं घर जळतंय ही एक वस्तुस्थिती सोडली तर बाकीच्या जगाचा त्याला विसर पडतो. आपल्या घराला आग लागलीये एवढंच त्याला कळतं; बाकी सगळं त्याच्यासाठी अस्तित्वातच उरत नाही. बाकीच्या जगाचा त्याला विसर पडतो.

म्हणजे एकाग्रता हे लक्ष देण्याचं, अवधानाचंच एक रूप आहे. एकाग्रतेत तुमचं लक्ष एका बिंदूवर केंद्रित होतं, त्याच वेळी आजूबाजूच्या अनेक क्षेत्रांतल्या असंख्य बिंदूंचा तुम्हाला विसर पडतो. म्हणजेच, एकीकडे एकाग्रता म्हणजे लक्ष देण्याचं, सावधतेचं खोल रूप आहे आणि त्याच वेळी विस्तारित स्वरूपातला बेसावधपणाही आहे. या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी घडतात.

अवधानाचं आणखी एक रूप म्हणजे जाणीव. भान-एकाग्रता नव्हे, तर जाणीव. जाणीव म्हणजे कोणत्याही एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित न झालेलं लक्ष. हे समजून घ्यायला थोडं आणखी कठीण आहे. कारण आपल्याला अनुभव असतो तो एकाग्र अवधानाचा. आपल्याला अनुभव आहे पावलाला काटा टोचण्याचा, डोकेदुखीचा, घराला आग लागण्याचा, परीक्षा देण्याचा. त्यामुळे लक्ष एका बिंदूवर केंद्रित होणं म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे; एकाग्रता म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. पण लक्ष देण्याचा आणखी एक प्रकार आहे, ज्यामध्ये व्यक्तीचं लक्ष एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित झालेलं नसतं. कारण, माणसाचं लक्ष जेवढं एका विशिष्ट गोष्टीपुरतं संकुचित होत जाईल, तेवढा तो बाकीच्या गोष्टींबाबत बेसावध होत जाईल.

संपूर्ण निर्मितीमागे एक निर्मिक शक्ती आहे हे आपल्याला मान्य असेल, तर ती शक्ती सावध असेल, पूर्णपणे सावध असेल-पण कोणत्या विशिष्ट ठिकाणी ती सावध असेल? आणि ती एका विशिष्ट ठिकाणी सावध असेल, तर ते ठिकाण वगळता बाकीच्या जगाचा तिला विसरच पडेल. तेव्हा आपल्या सर्वाचा स्रोत असलेल्या अंतिम शक्तीला एका विशिष्ट वस्तूचं, स्थळाचं किंवा केंद्राचं भान असून चालत नाही; त्या शक्तीला असते ती जाणीव, कोणत्याही एका केंद्रात न सामावणारी. ही जाणीव एका बिंदूवर लक्ष एकाग्र करत नाही. आणि मग ती असीम आणि सर्वव्यापी होऊन जाते.

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

‘अ‍ॅण्ड नाऊ अ‍ॅण्ड हीअर’ या लेखातील काही भाग/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/सौजन्य ओशो इंटरनॅशनल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 12:19 am

Web Title: osho philosophy part 9
Next Stories
1 अवलंबित्व आणि स्वातंत्र्य
2 बी युअरसेल्फ
3 स्वातंत्र्य
Just Now!
X