‘लोकरंग’मधील (२८ मे) ‘पन्नास वर्षांची हिंसा!’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख वाचला. लेख माहितीपूर्ण आहे. ‘सरकार असो वा ठेकेदार किंवा व्यापारी; त्याला नक्षलींच्या दहशतीमुळे का होईना, पण मजुरी वाढवून देणे भाग पडले’ आणि ‘प्रारंभी नक्षल्यांसोबत असलेले आदिवासी नंतर हळूहळू त्यांच्यापासून दूर जाऊ लागले’ यात अंशत: का होईना, कार्यकारणभाव संभवतो.

लेखात म्हटले आहे की, ‘तुमची वार्षकि गरज जेवढी आहे तेवढेच पीक जवळ बाळगा’ असे नक्षलींनी फर्मान सोडले. त्यामुळे या लोकांना अधिकच्या उत्पन्नापासून मुकावे लागले आणि ते आहे तिथेच राहिले.’ मात्र, यातील ‘ते आहे तिथेच राहिले’ हे विश्लेषण चूक वाटते. लेखातच असेही म्हटले गेले आहे की, चळवळीमुळे काही प्रश्नांत नक्कीच न्याय मिळाला. आदिवासींच्या मजुरीत कमालीची वाढ झाली. यावरून असे दिसते, की पूर्वी त्यांच्यावर अन्याय होत होता आणि त्यांची वार्षकि गरज जेवढी आहे तेवढे पीक हाती लागत नव्हते. ‘गरज जेवढी आहे तेवढेच पीक जवळ बाळगा’ ही सुधारणाच आहे. पण आता अपेक्षा वाढल्या होत्या. ‘अधिकच्या उत्पन्नापासून मुकावे लागणे’ हे मान्य नव्हते.

रशिया असो किंवा चीन; सुबत्ता आल्यावर उदारमतवाद आणि सामाजिक बांधिलकीपेक्षा व्यक्तिगत आकांक्षांना धुमारे फुटलेले दिसतात. आपल्याकडेसुद्धा १९६०-७० पासून आर्थिक स्तर उंचावलेल्यांचे प्रमाण अधिकाधिक वेगाने वाढताना दिसेल. दोन वेळची भ्रांत नसलेल्यांचे प्रमाण वाढू लागल्यावर ‘नाही रे’ गटावरील त्यांचा प्रभाव वाढत असावा. हळूहळू उजवीकडे झुकणे होत होत २०१४ नंतर ते परिणामकारक झाले. उदारमतवादाचा प्रभाव कमी होण्यामागे लोकसंख्येच्या लक्षणीय भागाचा आर्थिक स्तर उंचावण्याशी संबंध जाणवतो.

आम्ही शोषित आणि पीडितांच्या बाजूने लढतो आहोत, असा दावा करीत सुरू झालेल्या या चळवळीच्या कार्यकर्त्यांची नंतर ‘निथग टू लूज’ अशी स्थिती राहिलेली नाही. त्यांची वार्षकि उलाढाल दोन हजार कोटींच्या घरात आहे आणि आता नक्षल्यांची ही विकासविरोधी भूमिका त्यांच्या प्रभावक्षेत्राला धक्का पोहोचू नये यासाठी आहे; जनतेच्या कल्याणासाठी नाही. असे होऊन ज्या भांडवलदारांना विरोध करीत ही चळवळ उभी राहिली, त्यांच्याचकडून खंडणी घेणे, हे वळण या चळवळीला लागलेले दिसते.

मानसिकता मूलत: आक्रमक इत्यादी असते आणि स्तर उंचावल्यावर दडपलेली मानसिकता व्यक्त होऊ लागते, किंवा स्तर उंचावल्यामुळे मूलत: असलेल्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल होऊन उदारमतवादाचा प्रभाव क्षीण होतो. म्हणूनच आर्थिक-सामाजिक-राजकीय घटकांच्या सामाजिक मानसिकतेवरील प्रभावांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.

 – राजीव जोशी, नेरळ 

स्थलांतराबद्दलचे अन्य पलू 

‘जातकारणाची प्रखर जाणीव’ या सचिन कुंडलकर यांच्या लेखावरील ‘केवळ सुखवस्तू हेतूसाठीच स्थलांतर’ या शीर्षकाचे मंगला सामंत यांचे पत्र (२८ मे) वाचले. पत्राचे शीर्षक विषयाचा एकच पलू दर्शवते. त्यापुरताच माझा प्रतिवाद आहे. परदेशातली चांगली कायदा व सुव्यवस्था, कामाचे कौतुक, गुणांना वाव, नवे तंत्रज्ञान, बढती, स्वस्ताई, लाचलुचपत नसणे वगरे बाबींचा विचार करूनही कित्येकांनी हा देश सोडला. कोणत्याही कामासाठी हेलपाटे नाहीत, उत्तम कार्यतत्परता, उत्तम स्वच्छता अशा अनेक गोष्टींची अपेक्षा हा काय सुखवस्तू हेतू आहे? अमेरिकेत माणसाला लाच द्यावी लागत नाही. आयुष्य सुलभ आहे. माणसे पटापट आपली कामे करतात. या साध्या अपेक्षा आहेत. या गोष्टींना भुलून कित्येक जण परदेशी जातात, विशेषत: अमेरिकेला!

– यशवंत भागवत, पुणे</strong>