१२ नोव्हेंबरच्या ‘लोकरंग’ पुरवणीतील प्रसाद हावळे यांचा ‘प्रकाशक जात्यात!’ हा लेख वाचला. या लेखामध्ये अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सचिव राजीव बर्वे यांनी पुस्तकनिर्मितीतील वस्तू व सेवा कराची आकडेवारी दिली, ती अशी- कागदावर ५ टक्के, छपाईवर १२ टक्के, लॅमिनेशनवर १८ टक्के, पुस्तकबांधणीवर १८ टक्के आणि लेखक-चित्रकार-मुद्रितशोधक यांच्या मानधनावर प्रत्येकी १२ टक्के. म्हणजे एका पुस्तकामागे सरासरी ९० टक्के कर आकारला जाणार आहे, असे बर्वे यांचे म्हणणे आहे.

पण हे सात प्रकारचे वेगवेगळे खर्च हे सात वेगवेगळ्या गोष्टींवर असल्यामुळे ९० रु ७ = १२.८५ % एवढा सरासरी कर बसतो. राजीव बर्वे यांना काय म्हणायचंय? अशा आकडेवारीने दिशाभूल होते, इतकेच.

शिवाय आधी लागणारे कर, जसे- एक्साइज ६ टक्के, ऑक्ट्रॉय ५.५० टक्के, व्हॅट ६ टक्के, सेवाकर १५ टक्के, हे आता अस्तित्वात नाहीत, त्याचा ताळेबंद कोण देणार?

– जयराज साळगावकर, मुंबई</strong>

सांस्कृतिक दहशतवाद

‘लोकरंग’मधील राजा शिरगुप्पे यांचा ‘लढवय्यी पत्रकार’ हा गौरी लंकेश यांच्यावरील लेख वाचला. लंकेश यांची हत्या हा एक प्रकारे सांस्कृतिक दहशतवादच आहे. हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा जिचा एक मजबूत आधार आहे अशा लोकशाहीसाठी घातक आहे. विचारवंतांवर भ्याड हल्ला करण्याची प्रतिगाम्यांची भीड चेपली आहे असेच दिसतेय. सरकार, राजकारणी, मोठे उद्योजक, बुवा-बाबा, स्वयंसेवी संघटना, धर्माध शक्ती जोपासणारे पंथ यांबद्दल अवाक्षरही काढायचं नाही, अशा दहशतीच्या वातावरणाला लेखक, कलावंत, विचारवंत, पत्रकार यांना सामोरे जावे लागतेय. हे देशाच्या सांस्कृतिक गळचेपीला, सामाजिक अस्थिरतेला आणि एकंदर कलात्मक अभिव्यक्ती अन् प्रतिभेच्या मृत्यूला निमंत्रण देणारे आहे.

श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>