प्रत्ययकारी ‘जनात.. मनात’
डॉ. संजय ओक यांच्या ‘जनात.. मनात’ या सदरातील लेख अतिशय सुंदर असतात. हे लेख वाचताना lok13लेखाच्या शीर्षकातील समर्पकता स्पष्ट होते. सहज साध्या गोष्टींतून मोठा आशय ते व्यक्त करतात. हे लेख वाचकांना विचार करायला, अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. लहान लहान गोष्टींतून समाजाचे प्रबोधन करतात. ज्या गोष्टींकडे आपले लक्षही जात नाही त्या गोष्टींतून, घटनेतून किती शिकण्यासारखे आहे ते पटवून देतात. डॉ. ओक यांचे निरीक्षण किती अचूक आणि सूक्ष्म आहे याचा प्रत्यय त्यांचं लिखाण वाचताना येतो. त्यांचा ‘भिडेबाई’ हा लेख मनाला खूप स्पर्श करून गेला. डोळ्यात पाणी आले.
– तारा ठाकरे

(टकमक) टोकावरचं मराठी गाणं!
डॉ. आशुतोष जावडेकर यांचा ‘टोकावर उभं असलेलं मराठी गाणं!’ या शीर्षकाच्या आधी मला ‘टकमक’ हा शब्द वापरायचा आहे. मराठी गाण्याची ही ‘आत्महत्या’ आहे का, असा मनात विचार येतो. ‘‘आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला’ यासारख्या मराठी गाण्यांवर ‘मेरी मधुबाला’सारखा उतारा हवाच होता.’ डॉक्टरांचे हे वाक्य वाचल्यानंतर ते म्हणतात, ‘मला दोन्ही गाणी आवडतात.’ हे त्यांचे दोन दगडांवर पाय ठेवणं आणि त्याआधीचे विधान खूप खटकले. आज मराठी संगीतात नवनवीन प्रयोग होत आहेत. वाद्ये वाढली तशाच परदेशी चालींच्या चोऱ्याही वाढल्या. इतकी वेळ आली, की रीमिक्स गाणी हीच खरी गाणी आहेत अशी तरुण पिढीची समजूत होऊ लागलीय. परंतु ही पिढी जेव्हा फावल्या वेळात गाण्याच्या भेंडय़ा खेळायला लागते तेव्हा त्यांच्या तोंडी जुनीच गाणी का येतात? समजा, एखादे नवीन गाणे आले तर ते धड म्हणताही येत नाही. पहिल्या ओळीतच ते संपते. पुढील ओळ आठवतच नाही. इथेच शब्दांची ताकद आणि फोलपणा समजतो. कारण जे शब्द कवी देतो तो किती सक्षम आहे हे त्यातून समजते. ‘तरुण पिढीला हेच आवडते’ हे कवी-संगीतकाराला एखादा बिल्डर, राजकारणी असलेला चित्रपट निर्माता सांगतो आणि त्यांची ताकद कमी केली जाते.
हे सतत एक-दोन पिढय़ा सुरू राहिले तर मात्र खरे नाही. कवींनी स्वत: किती तडजोड करायची, हेही महत्त्वाचे आहे. शब्द गाण्याचा आत्मा असतो, तर संगीत शरीरावरचा एखादा अलंकार- हे विसरून चालणार नाही. नाहीतर मराठी गाणं काय असतं, कसं असतं, हे पुढल्या पिढय़ांना शिकवावं लागेल. रीमिक्स आणि चाली चोरणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. बाबा सहगलचा एक काळ होता. त्याचं गाणं हे गाणं नव्हतं, तर एक वळण होतं. पण पुढे रस्ता सरळच असतो, हे लक्षात घ्यायला हवे. तिथे कवीच महत्त्वाचा ठरतो. संगीतकार त्याच्यानंतर.
– सतीश चाफेकर

बालवाचनाचं गांभीर्य उमजलं
प्रतिभा कणेकर यांचा ‘उद्याचे वाचक घडविण्यासाठी’ हा लेख फारच सुंदर आहे. अमेरिकेमध्ये वाचनसंस्कृती वाढावी यासाठी बालवाचकांना किती महत्त्व दिले जाते याची माहिती त्यातून मिळते. भारतामध्ये मात्र नेमके उलट चित्र दिसते. महाराष्ट्रापुरता विचार केल्यास शालेय स्तरापासून ते सार्वजनिक ग्रंथालयांपर्यंत वाचनसंस्कृती वाढावी यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात नाहीत हेच स्पष्ट होते. याला अपवाद शहरी भागातील काही ग्रंथालये असू शकतात. सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये त्यांची कामाची पद्धत पाहिल्यावर केवळ ग्रंथालयांना मिळणारे शासनाचे अनुदान कसे पदरात पाडून घेता येईल असा विचार होतोय की काय, असे वाटते. राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाने ग्रंथालये खिळखिळी झाली आहेत असे चित्र दिसते. यापुढे जाऊन विचार केला तर बोगस ग्रंथालयेही आढळतात. हे चित्र ‘सर्वात पुढे महाराष्ट्र’ला लाजिरवाणे आहे.
बालवाचकांना बालसाहित्याची गोडी लागावी यासाठी विशेष प्रयत्न ना शाळा करीत, ना शालेय शिक्षक करीत. शालेय शिक्षकांमध्येदेखील वाचनाविषयी गांभीर्य नसतं. त्यांनाही वाचनाची आवड नसते. याचा परिणाम म्हणजे मुलांच्या ज्ञानाला मर्यादा येतात.
– संदीप मुळ्ये, रत्नागिरी.

अप्रामाणिक राजकारण जनतेला कुठे नेऊन ठेवणार?
‘कुठे नेऊन ठेवणार?’ या जाहिरातींनी खरे तर सर्वाचीच पंचाईत करून ठेवली. ‘शीशे के घरों में रहनेवाले दुसरों के घर पत्थर नहीं फेका करते’ अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी आजच्या राजकारणाने जी पातळी गाठली आहे ती नक्कीच सुसंस्कृततेची आणि नैतिकतेची दिवाळखोरीच दर्शविते. ‘या निवडणुकीचं म्हणणं काय?’ या (लोकरंग, १२ ऑक्टोबर) लेखात महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात गिरीश कुबेर यांनी सामान्य मतदार वाचकांच्या डोळ्यात अंजन घालणारे काही नेमके मुद्दे अधोरेखित केले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांनी कधीही मातीशी इमान राखत प्रामाणिक राजकारण केलं नाही. दुसरा मुद्दा हा की, निवडणुकीनंतर ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचं वगैरे भंपक कारण दाखवत गळ्यात गळे घालताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको. तिसरा मुद्दा- स्थानिक अस्मितांना फुंकर घालत राजकारण करणाऱ्या सर्व प्रादेशिक पक्षांना काँग्रेसनं सोयीनुसार वापरलं. चौथा मुद्दा- अचानक राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे बंधू एकसारखी भाषा बोलताना दिसतात, हा योगायोग नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातल्या भाजपच्या  व चिंतन शिबिरात अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे भविष्य निश्चित करण्यात आले होते. हा मोठा जुगार होता. पण त्यानंतर इतिहास घडला- जो प्रत्यक्ष मोदींनाही अपेक्षित नसावा. (त्या काळात सर्व प्रादेशिक पक्षांशी ते सौहार्दपूर्ण वागत.) जुना भाजप संपला आणि मोदींचा आणि फक्त मोदींसाठी ओळखला जाईल असा नवीन भाजप जन्माला आला. असा उत्कृष्ट वक्ता यादरम्यान इतर पक्षांना घडवता आला नाही किंवा प्रोजेक्ट करता आला नाही.  राज्यशास्त्रातील एका सिद्धान्तानुसार, ‘ज्या लोकशाहीत अनेक छोटय़ा छोटय़ा पक्षांचे मिळून बनलेले सरकार असेल, ती अत्यंत प्रगल्भ लोकशाही समजली जाते.’ दुर्दैवाने भारतात मात्र अशा पक्षांचे उपद्रवमूल्यच जास्त असते. याच उपद्रवमूल्याची स्पर्धा या लेखाने सर्वासमोर आणली आहे.
याचबरोबर ‘तिरकी रेघ’ हे संजय पवार यांचे सदर नुसते तिरकस न राहता बाणासारखे अणकुचीदार होत आहे. दुर्दैवाने इतर पक्षांच्या पाश्र्वभूमीवर केवळ भाजपकडून नीतिमत्ता, चारित्र्य, आदर्शवाद अशा मूल्यांची अपेक्षा सर्वजण करीत असतात. त्यामुळे कलियुगातल्या भाजपची फारच पंचाईत होत आहे. भूमिका जरूर घ्यावी, जी संपूर्ण समाजाला मार्गदर्शक ठरू शकते. परंतु त्याआधारे भविष्य वर्तवू नये. अन्यथा ती शंका निर्माण करते. नेमकी तीच चूक लिहिण्याच्या ओघात ‘महाराष्ट्रच नेऊन ठेवेल..’ या लेखात संजय पवार यांनी केली आहे.
– शिशिर सिंदेकर, नाशिक.    

मडोनावरील लेख अप्रतिम!
‘लयपश्चिमा’ सदरातील प्रत्येक लेख मी वाचते. आणि बहुतेक सारे लेख मला आवडले आहेत. अजून मडोनावर लेख कसा नाही लिहिला, असेच मला वाटत होते. गेल्या वेळेस लिहिलेला मडोनावरचा लेख खूप आवडला.  मी २००० मध्ये दहावीत असताना एमटीव्ही मोस्ट वाँटेड नामक एक कार्यक्रम असायचा आणि मी रोज शाळेत जाताना जेवायला बसायचे तेव्हा बघायचे. कारण तेव्हा घरात कोणी नसायचं आणि नुकतीच इंग्लिश गाणी माझ्या कानावर पडायला लागली होती. त्या वेळी मडोनाचं ‘फ्रोझन’ ऐकलं आणि वेड  लावलं अक्षरश: त्या गाण्याने. एकतर त्यातलं  hmmmm जे ती म्हणते ते अगदी कमाल आहे! अगदीच मोजके शब्द कळले तेव्हा आणि इंटरनेट नसल्यामुळे लगेच शब्द बघता आले नाहीत..  त्यानंतर काही दिवसांनी तिचा एक म्युझिक व्हिडीओ पाहिला, जो अगदीच बोल्ड होता! त्याचेही मोजकेच शब्द कळले, पण त्याचं म्युझिक खरंच अफाट  होतं! नंतर एक-दोन वर्षांनी ‘अमेरिकन पाय’ पाहिलं. त्याचंही संगीत आवडलं आणि नंतर तीन-चार वर्षांपूर्वी यू टय़ूब आल्यावर हे सगळे व्हिडीओ शब्दरचनेसकट पाहिल्यावर अधिकच आवडली गाणी! आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तिची कविताही दिसते esp   फ्रोझनमध्ये!
ती खूप बिनधास्त आहे! बंडखोर म्हणावं अशी. पण तिची गाणी नुसती ऐकायला छान वाटतात.. म्हणजे खरं तर मी गाणं ऐकल्यावर आधी संगीत ऐकते आणि मग शब्द. पण ‘चोली के पीछे’चं संगीत आवडायच्या आधी त्याचे शब्द टोचतात कानाला, मग चालीकडे लक्षच नाही जात किंवा गुणगुणावंसं नाही वाटत ते गाणं. हेच मुन्नी, शीला गणपत.. या पठडीतल्या गाण्यांचं घडतं. इंग्रजी गाण्यांचं तितकं होत नाही. संगीत जास्त आवडतं! पण या लेखमालेमुळे आता इंग्रजी/पाश्चिमात्य गाण्यांमधले शब्दही बघितले जातात.
मायकल जॅक्सनचा लेखही छान होता. मात्र, आता तेवढी छान पाश्चिमात्य गाणी नाहीयेत असं वाटतं. म्हणजे मी मडोना, बॅकस्ट्रीट बॉइज, सुरुवातीची ब्रिटनी, जस्टिन, शानाया ट्वेन, सिलीन डीयॉन, स्टिंग, सॅवेज गार्डन, रिकी मार्टिन आणि आणखी काही समकालीन यांची गाणी ऐकायचे तेव्हा ज्यांचे शब्द कळायचे आणि ती गाणी पाठ  होती. पण हल्ली रिहाना, ब्रिटनी,  lorde, beyonce  आणि आणखी जे कोणी असतील, त्यांची गाणी खूप छान नाही वाटत.
तुम्ही लिहिलेल्या अगदी सुरुवातीच्या अनेक ग्रुप्स, बँड्सबद्दल माहिती नाहीये, पण त्याची नोंद करून ठेवली आहे. तेव्हा नक्की ऐकेन. मात्र, सेलाइनबद्दल नक्की लिहा. तिची गाणी, संगीत आणि त्यातलं काव्य छान आहे!  ‘टायटॅनिक’ चित्रपटामधील ‘माय हार्ट विल गो ऑन’ असो  किंवा ‘स्टुअर्ट लिटिल’मधील ‘आय एम अलाइव्ह’ किंवा आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने बघायला सांगणारं ‘दॅट्स द वे इट इज’ असो- खूप छान शब्द आणि चाल यामुळे तिची गाणी पाठ होतात अगदी!  ‘बॅकस्ट्रीट बॉइज’बद्दलही नक्की लिहा! सुंदर चाली, कळतील असे शब्द आणि सभ्य दृकृश्राव्य फिती, असं सगळ्याचं मिश्रण होती त्यांची एक से एक सुपरहिट गाणी! नक्की लिहा!
– गायत्री गुजराथी