रमेश पोखरियाल ‘निशंक’

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड जनादेशाने फेरनिवड झालेली असूनही ते हात जोडून आवाहन करतात, यावरून त्यांचे नेतृत्वगुण दिसून येतात. जनतेने पंतप्रधानांना नि:संदिग्ध आणि स्वयंस्पष्ट साथ दिली, यातून पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे यश दिसून येते. आजही पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्यातून व नजरेतून वेदना आणि चिंता स्पष्ट दिसत आहे. अशा वेळी त्यांच्या भावना लक्षात घेऊन कृती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे..

संकटकाळ हाच कसोटीचाही काळ असतो. कोणतेही आव्हान नसल्यावर कुणाला कशाचीच चिंता करण्याची फारशी गरज नसते. परंतु कसोटीच्या क्षणी एखादी व्यक्ती परिस्थितीला कशी सामोरी जाते, यावरून त्या व्यक्तीच्या चारित्र्याची उंची ठरत असते. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने आपल्यापुढे जे आव्हान उभे केले आहे, त्याचा सामना करताना विविध आघाडय़ांवर- मग ते व्यक्तिगत असो वा संस्थात्मक- साऱ्याच पातळ्यांवर लोकांच्याही नेतृत्वगुणांचा कस लागणार आहे.

भारतात संपूर्ण सरकारी यंत्रणा या कसोटीच्या क्षणाला एकसंधपणे आणि वेळीच सामोरे जाण्यात यशस्वी झाली आहे. ‘कोविड-१९’च्या संकटापुढे जगातील महासत्ता म्हणवणारे देशही जेरीस आलेले असताना, या विषाणूविरुद्धच्या एकत्रित लढय़ात आपल्या देशात सरकारी यंत्रणेची कामगिरी उठून दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनतेने हे संकट परतवून लावण्याचा ठाम निर्धार केला. या कठीण काळात १३० कोटी भारतीय नागरिक ठामपणे पंतप्रधानांच्या निर्णयामागे दृढनिश्चयाने एकवटले. केवढीतरी विविधता आणि त्यातही संघराज्य व्यवस्था असलेल्या आपल्या देशात पंतप्रधानांनी साऱ्या भारतीयांना या महासाथीविरुद्धच्या लढय़ात एकदिलाने सामील होण्यास उद्युक्त करून दाखवले. यातून पंतप्रधानांच्या नेतृत्व-कौशल्याची ग्वाहीच मिळालेली आहे. आमच्यासाठी ‘देश सर्वाधिक महत्त्वाचा’ हे भारतीयांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिलेले आहे.

मला आजही पंतप्रधान मोदी यांची ती प्रतिमा आठवते आहे..  प्रचंड म्हणावा अशा जनादेशाने त्यांच्या नेतृत्वावर फेरनिवडीचे शिक्कामोर्तब केले, त्यास उणेपुरे वर्षही झालेले नसताना हेच नेतृत्व, राष्ट्रीय चित्रवाणी वाहिनीवर हात जोडून १३० कोटी देशवासीयांना आवाहन करीत होते. ते आवाहन होते सामाजिक अंतर पाळण्याचे तसेच करोनाविरोधात सरकार ज्या उपाययोजना करत आहे त्याला साथ देण्याचे आणि महासाथीला परतवून लावण्याचे. यातून पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वातील चारित्र्यगुणांची ताकद, जनतेबाबतची काळजी आणि देशाच्या क्षमतेवर त्यांचा असलेला विश्वास दिसून आला. या महासाथीमुळे परिस्थिती किती चिघळणार आहे, याचा अंदाज घेण्यासाठी दूरदृष्टीच आवश्यक असते. सुरुवातीला ‘जनता संचारबंदी’, त्यानंतर योग्य वेळी टाळेबंदीची राष्ट्रव्यापी अंमलबजावणी आणि करोनाने निर्माण केलेल्या आव्हानाशी लढण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर करणे यातून पंतप्रधानांची दूरदृष्टी दिसून आली.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा पंतप्रधान म्हणून पुढले पाऊल टाकून मोदी यांनी, करोनाविरुद्धच्या लढाईत इतर देशांनाही मदतीचा हात पुढे केला. ब्राझीलचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी या मदतीबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. याआधी करोनावरील उपचारात महत्त्वाचे ठरू शकणारे हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे औषधे देण्याची विनंती भारताकडे करताना, रामायणात लक्ष्मणासाठी संजीवनी आणणाऱ्या हनुमानाचा संदर्भ बोल्सोनारो यांनी दिला होता. पंतप्रधानांनी या संदर्भात विविध खंडांमधील अनेक देशांशी साधलेला सकारात्मक संपर्क पाहता बदलत्या जागतिक रचनेत भारताची भूमिका निर्णायक राहणार, हे स्पष्टच आहे.

‘‘करोनाला जर हरवायचे असेल तर टाळेबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा!’’ अशी लढय़ाची हाक पंतप्रधानांनी दिली, त्यास जनतेकडून मिळालेला नि:संदिग्ध आणि स्वयंस्पष्ट प्रतिसाद हा राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात त्यांचे नेतृत्व कसे सर्वमान्य झालेले आहे, याची ग्वाहीच देणारा होता. ‘राष्ट्र प्रथम’ ही पंतप्रधानांची कृतनिश्चयी भूमिकाच देशातील निरनिराळ्या प्रकारच्या लोकांना एका छत्राखाली आणणारी ठरली आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषाणूविरुद्धच्या या लढय़ाला आणखी बळ मिळाले. देशातील जनतेचे आरोग्य, सुरक्षा व लोककल्याणाला मोदी यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सर्वच राज्यांनी केंद्राने दिलेले निर्देश तसेच सूचनांचे एकदिलाने आणि तंतोतंत पालन केले. देशाच्या इतिहासाने केंद्र व राज्यांमधील असा समन्वय- असे ‘सहकारी संघराज्य’ कधीही अनुभवले नव्हते. यापुढेही जाऊन जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका आवाहनाला प्रतिसाद देत ‘पीएम केअर्स फंड’ (प्राइम मिनिस्टर्स सिटिझन असिस्टंस अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स फंड) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशेष मदत निधीसाठी समाजातील सर्वच प्रवर्गानी मोठे योगदान दिले आहे. तरुण, उदयोन्मुख खेळाडू या निधीस मदत करण्यासाठी आपली पदके व चषकांचा लिलाव करत या लढय़ात सहभागी झाले, हे तर मन हेलावून टाकणारे आहे. अनेक वयोवृद्ध स्त्री, पुरुषांनी तर आयुष्यभराची बचत या कामी दिलेली आहे.

या संकटकाळाने आपल्याला काही महत्त्वाचे धडेही दिले आहेत. आपण आपापल्या घरांत कुटुंबीयांसमवेत सुरक्षित व आरोग्यपूर्ण राहावे यासाठी आज कित्येक कर्मचारी कार्यरत आहेत, ते या मोहिमेतील खरे योद्धे आहेत. सर्व स्तरांतील प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य क्षेत्रातील सर्व स्तरांवरील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते हे सर्व जण नागरिक सुरक्षित आणि आरामात राहावेत यासाठी जीवाचे रान करत आहेत. अशा असुरक्षित वातावरणात काम करणाऱ्या या योद्धय़ांना आपण विसरता कामा नये; त्यांच्यापर्यंत आपण आपली कृतज्ञता पोहोचवलीच पाहिजे.

मला येथे नमूद करावेसे वाटते की, केंद्रीय मंत्री या नात्याने मी राजस्थानमधील भिलवाडय़ासह २० जिल्ह्य़ांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. भिलवाडा जिल्ह्यास या महासाथीचा मोठा फटका बसला. जिल्हा प्रशासनातील अधिकारी व साथ आटोक्यात आणण्यासाठी तैनात केलेल्या आरोग्यसेवकांशी माझा दैनंदिन संवाद सुरू होताच. त्यातून मला असे दिसून आले की, योजना आखणे आणि आखलेल्या योजनेची अंमलबजावणी करणे या दोन्ही आघाडय़ांवर हे सर्व जण एक पाऊल पुढे होते. जर बाधित आणि संभाव्य बाधितांच्या आकडेवारीचा तपशील पाहिला, तर येथे साथ रोखण्याचे आव्हान अत्यंत कठीण होते. परंतु येथे एकूण ३,९०० सर्वेक्षण पथके होती. त्यांनी चार ते पाच लाख घरांच्या सर्वेक्षणातून एकंदर २३ लाख नागरिकांची छाननी केली. त्यापैकी १८ हजार जणांचे अलगीकरण करून त्यांची करोना-चाचणीदेखील करण्यात आली. हे सारे केवळ तीन आठवडय़ांत पार पडले.

करोनाचा सामना करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेने सर्वानी काम केल्यामुळेच हे शक्य झाले. यात काही घटना काळिमा फासणाऱ्याही घडल्या. त्यातील काही घटना दुर्दैवी तसेच अनिष्ट होत्या. आव्हान म्हणून आपण या संकटाचा सामना केला पाहिजे. प्रशासनाच्या उपाययोजनांना पाठिंबा द्यायला हवा तसेच या विषाणूचे संकट परतवून लावताना जी पावले उचलण्यात आली त्याबद्दल पंतप्रधानांना साथ देण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्यातून व नजरेतून वेदना आणि चिंता स्पष्ट दिसत आहे. अशा वेळी त्यांच्या भावना लक्षात घेऊन कृती करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आज आपण जी काही प्रत्येक गोष्ट करत आहोत त्यामागे ‘देश सर्वाधिक महत्त्वाचा’ हीच धारणा आहे की नाही, हेच पाहिले जाईल.