अग्निशमन कार्यालय होणार मोकळे

पालघर : पालघर नगर परिषदेचे कार्यालय धोकादायक इमारतीमध्ये असल्याने दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता पाहता नगर परिषद कार्यालय तातडीने स्थलांतरित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयात सध्या कार्यरत उपविभागीय अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून नगर परिषद कार्यालय अग्निशमन विभागाच्या कार्यालयात स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१९६० साली बांधलेल्या इमारतीमध्ये नगर परिषद कार्यालय कार्यरत असून ही इमारत धोकादायक असल्याचे ठरवण्यात आले आहे. या कार्यालयाचे सन २०१८ मध्ये स्थलांतर अग्निशमन विभागाच्या कार्यालयात करण्याचे निश्चित झाले असताना त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थलांतरित करण्यात आले होते. परिणामी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून धोकादायक इमारतीमध्येच नगर परिषदेची कार्यालय सुरू आहे.

‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन उपविभागीय कार्यालय  पिडको वसाहतीजवळ कार्यरत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा अन्य पर्यायी जागेत तातडीने स्थलांतरित करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पत्राद्वारे सूचित कले आहे. त्यामुळे मोकळ्या होणाऱ्या अग्निशमन दलाच्या परिसरात नगर परिषद हंगामी पद्धतीने स्थलांतरित करण्यात येईल असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान परिषदेचे नवीन कार्यालय उभारण्यासाठी जागेचे विकास आराखड्यात असलेले आरक्षण बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगर परिषद कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर या इमारतीच्या आवारात असणारे फळाफुलांची व इतर साहित्य विक्रेत्यांची दुकानेदेखील बंद करण्याबाबत नगर परिषद निर्णय घेणार असल्याचे नगर परिषद सूत्रांकडून सांगण्यात आले.