वसई: बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घोषणा केली. येत्या ४-५ दिवसांमध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा बनलेल्या आहे. या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी तर्फे भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीत राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे. परंतु हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष निवडणूक लढवणार की नाही याबद्दल गेल्या काही दिवसांपासून साशंकता व्यक्त व्यक्त करण्यात येत होती. दुसरीकडे पक्षाच्या ठिकठिकाणी प्रचारही सुरू होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे आमच्याकडे सात ते आठ इच्छुक उमेदवार असून सर्वांना विश्वासात घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
विकास कामे हा आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. २००९ मध्ये आम्ही हा मतदारसंघ जिंकला होता. त्यामुळे नैसर्गिकरित्या आमचा या मतदारसंघावर हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक पक्षांनी माझ्याकडे पाठिंबा मागितला होता, माझे सर्व पक्षांची चांगले संबंध आहेत, त्यांनी माझ्याकडे पाठिंबा मागण्यापेक्षा सर्वांनी मिळूनच मला पाठिंबा द्यावा असाही टोला त्यांनी लगावला. मला चिन्ह कुठलेही मिळाले तरी या सोशल मीडियाच्या काळात घरोघरी चिन्ह पोहचवले जाईल असेही ते म्हणाले.