निर्बंध तिसऱ्या स्तरावर कायम; रुग्णवाढीचा दर ८.१ टक्के

पालघर : पालघर जिल्ह्याचा करोना आठवडा सरासरी रुग्णवाढीचा दर ८.१ टक्के इतका मर्यादित राहिल्याने   जिल्हा  निर्बंधाच्या तिसऱ्या स्तरावर कायम राहिला आहे. ग्रामीण भागांत झालेली रुग्णवाढ व तसेच आकडेवारी भरताना तांत्रिक चुका झाल्याने आठवडय़ाच्या मध्यावर हा दर १३.८ टक्कय़ांवर पोचला होता. दरम्यान रुग्णवाढीचा दर हा दहा टक्कय़ांपेक्षा कमी राहिल्याने जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

अनेक जिल्हे प्रतिजन चाचणी अनावश्यक व मोठय़ा प्रमाणात करून जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर नियंत्रणात ठेवत असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर गेल्या आठवडय़ापासून शासनाने रुग्णवाढीचा दर निश्चित करण्यासाठी फक्त आरटीपीसीआर चाचणी अहवाल गृहीत धरण्याचे घोषित केले होते.  जिल्ह्यात फक्त शंभर  आरटीपीसीआर  तपासणी करण्याची क्षमता असून जिल्ह्यातील उर्वरित दररोज सरासरी सतराशे ते अठराशे करोना चाचणी मुंबई येथील काही शासकीय प्रयोगशाळेत केल्या जातात.

आरटीपीसीआर चाचण्यांच्या अहवालाची माहिती संकलित करताना काही तांत्रिक चुका झाल्याने ही टक्केवारी १३ पेक्षा अधिकवर पोचली होती. मात्र आकडेवारीमधील चूक राज्याच्या करोना माहिती संकलन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर २९ जून रोजी जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर ९.९ इतका आला होता. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाल्याने ३० जून रोजी आठवडा सरासरी रुग्णवाढ दर ९.५ तर १ जुलै रोजी सरासरी रुग्णवाढीचा दर ८.१ टक्के इतका राहिल्याने  जिल्हा करोना निर्बंधाच्या तिसऱ्या स्तरावर कायम राहिला आहे.

यामुळे गेल्या दोन आठवडय़ापासून जिल्ह्यात लागू असणारे निर्बंध कायम राहणार असून आगामी आठवडय़ात रुग्णवाढ दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला कसोशीने प्रयत्न करावे लागतील अशी चिन्हे आहेत.  राज्य शासनाने जारी केलेल्या अहवालात आरटीपीसीआर व प्रतिजन चाचणीचा एकत्रित विचार केला तर जिल्ह्याचा रुग्णवाढ दर ५.६ टक्के इतका असून गेल्या आठवडय़ाभरात तपासलेल्या १२ हजार ७७१ आरटीपीसीआर नमुन्यांपैकी  एक हजार ३३ नागरिकांना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढताना दिसत असले तरी पुढील आठवडय़ात जिल्ह्यातील करोना निर्बंध तिसऱ्या स्तरावर कायम राहणार असल्याने व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पुन्हा तफावत

राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनाच्या अहवालामध्ये असलेली तफावत पुन्हा एकदा निदर्शनास आली असून राज्य शासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सध्या  एक हजार ४६५ उपचाराधीन रुग्ण आहेत, तर जिल्हा प्रशासनाच्या अहवालात उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन हजार इतकी दर्शवण्यात आली आहे.