पालघर : डहाणू येथील ॲक्सिस बँकेतील खात्याचा तपशील नमूद करून ई-केवायसी पडताळणीच्या नावाखाली तीन खातेदारांची किमान २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.ॲक्सिस बँकेच्या कार्यालयातून संवाद साधत असल्याचा बनाव करत डहाणू येथील खातेदारांना त्यांच्या बँक खात्याचे शेवटचे चार क्रमांक, बँकेशी संलग्न मोबाइल क्रमांक तसेच ग्राहकाचे पूर्ण नाव सांगून ई-केवायसी पडताळणीच्या नावाखाली लिंक पाठवून बँक खात्यातील पैसे परस्पर वळते केल्याची माहिती पुढे आली आहे. अशा प्रयत्नात एका ग्राहकाकडून १३ लाख रुपये, दुसऱ्याकडून आठ लाख रुपये, तर तिसऱ्याकडून ३० हजार रुपये चोरट्याने हडपल्याची माहिती पुढे आली आहे.
या संदर्भात डहाणूतील ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकांशी मोबाइलवर संपर्क साधला असता काही वेळाने माहिती देतो, असे प्रथम सांगण्यात आले, मात्र त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. या विषयी डहाणू पोलीस ठाण्याची संपर्क साधला असता अशा प्रकारची कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे फसवणूक झालेले खातेदार एका बहुराष्ट्रीय कंपनीशी संलग्न आहेत.




हेही वाचा >>>दिड दिवसाचे गणपती विसर्जन करताना वाड्यात तीनजण बुडाले
कर्जाची रक्कमही वळती
या प्रकरणातील एका खातेदाराला कर्ज घेण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. अर्ज केल्यानंतर एका दिवसात त्यांचे कर्ज मंजूर करून त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात २४ ते ३६ तासांत जमा झाली. त्यानंतर हीच रक्कम परस्पर वळती करण्यात आली. तर, याच खातेदाराला आणि एक कर्ज घेण्यास भाग पाडण्यात आले. ते मंजुरीसाठी प्रलंबित आहे. मात्र, त्या कर्जास नकार दिल्यास ते रद्द करण्यासाठी कर्जाच्या रकमेच्या चार टक्के रक्कम बँकेत भरावी लागेल, असे सांगण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मासिक वेतन थेट बँकेत जमा होणाऱ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.