scorecardresearch

पालघर : शेवटच्या दिनी उमेदवारांची गर्दी ; जिल्ह्यात चार दिवसांत सरपंचपदांसाठी ७४७ तर सदस्यपदांसाठी ३१२२ अर्ज

पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती.

पालघर : शेवटच्या दिनी उमेदवारांची गर्दी ; जिल्ह्यात चार दिवसांत सरपंचपदांसाठी ७४७ तर सदस्यपदांसाठी ३१२२ अर्ज

पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती. मोठय़ा संख्येने या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. २६ सप्टेंबपर्यंत सरपंचपदासाठी ७४७ तर सदस्यपदासाठी ३१२२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत प्रत्यक्षात अर्ज दाखल करून घेण्याचे व त्यांच्या नोंदी पूर्ण करण्याचे काम सुरू होते.

पालघर जिल्ह्यात ३४२ सरपंच जागांसाठी तसेच ३४९० ग्रामपंचायत सदस्यांसाठी १३ ऐवजी १६ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याकरिता २१ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या उमेदवारी अर्जासाठी वेगवेगळय़ा दाखल्यांची गरज भासत होती. ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्यास अनेक अडचणींना उमेदवारांना सामोरे जावे लागले होते. त्यात पितृपक्ष असल्यामुळे सुरुवातीच्या वेळी उमेदवारांचे कमी अर्ज दाखल झाले होते.

त्यात २१ सप्टेंबर रोजी सात, २२ सप्टेंबर रोजी १७९, २३ सप्टेंबर रोजी ७३१ उमेदवारी अर्जाचा समावेश होता. पितृपक्ष संपल्यानंतर काल २६ सप्टेंबर रोजी २९५२ अर्ज दाखल करण्यात आले असून मंगळवारी शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची तालुक्याच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. अर्ज स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण आला होता. अर्ज दाखल करण्याच्या दुपारी तीन वाजल्याच्या मर्यादेनंतरदेखील अनेक ठिकाणी कार्यालयांत रांगा लागल्या होत्या. कार्यालय आवारात दाखल झालेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहिले.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदासह एकंदर ३८३२ ठिकाणी निवडणूक होत आहे. सुमारे दहा हजार अर्ज दाखल होतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. २६ सप्टेंबपर्यंत जेमतेम चार हजार अर्ज दाखल झाले होते.

पावसाची शक्यता, अजूनही निधी उपलब्ध नाही
२६ सप्टेंबर रोजी दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली असून ईव्हीएम मशीनसह निवडणूक साहित्य वितरण करण्यासाठी ताडपत्री लावलेले तंबू किंवा बंदिस्त केंद्र उभारण्याचे आव्हान महसूल यंत्रणेपुढे आहे. शिवाय या प्रक्रियेत जिल्ह्यात किमान पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित असताना याकरिता कोणताही निधी अजूनही मंजूर झालेला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

वाहतूक कोंडी
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी बहुतांश तालुक्याच्या ठिकाणी इच्छुक उमेदवार, त्यांचे पाठीराखे व स्थानिक पुढाऱ्यांनी एकच गर्दी केल्याने वेगवेगळय़ा ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याची दिसून आले. ई-सेवा केंद्र व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी असणाऱ्या केंद्रांच्या ठिकाणी, उपाहारगृहे, भोजनालये आदी ठिकाणीदेखील गर्दी झाल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या