पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्ण आणि मृत्यू संख्येत दुपटीने वाढ
नीरज राऊत
पालघर : करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागांत ३३ हजार ७५० नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ८०६ जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्ण संख्या दुप्पट असून या लाटेमध्ये तीनशेपेक्षा अधिक मृत्यू हे पालघर जिल्ह्यबाहेरचे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मार्च २०२० च्या अखेरीस पालघर जिल्ह्यत पहिला करोना रुग्ण आढळला होता. तेव्हापासून जानेवारीपर्यंत जिल्ह्यच्या ग्रामीण भागात १५ हजार ४२९ रुग्ण आढळून आले व त्यांच्यापैकी ३०४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी ते जून यादरम्यान प्राप्त झालेल्या करोना संक्रमणाची माहिती पाहता संसर्ग झालेल्या रुग्णांची व मृतांची संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्याला त्यातील शिखर अवस्था मार्चअखेरीस सुरू होऊन ही अवस्था जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सुरू राहिली. यादरम्यान ग्रामीण भागांत २९ हजार ५०९ रुग्ण आढळून ७५४ नागरिकांचा मृत्यू झाला. जूनच्या पहिल्या आठवडय़ानंतर आजवर देखील रुग्णसंख्या अपेक्षित प्रमाणात घटली असून या कालावधीत २७५१ रुग्ण आढळले आहेत. जिल्हाबाहेर झालेल्या मृतांची आकडेवारी संकलित करून रुग्ण व मृत्यू संख्या अद्ययावत करण्यात आली असून ग्रामीण भागांत एप्रिल महिन्यात ३९९ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. मे महिन्यांत ३१५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.