|| कल्पेश भोईर

९ जणांचा मृत्यू ; तर ६४ जखमी

वसई : वसईच्या भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील नऊ महिन्यात ९६ अपघात झाले आहेत. यात ९ जणांचा बळी गेला आहे तर ६४ जण जखमी झाले आहेत.

वसई पूर्वेतील भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग गेला आहे. मुंबई व गुजरातसह इतर भागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. त्यामुळे येथून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. करोनाकाळात रेल्वेसेवा बंद असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिकच वाढली होती. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना महामार्गावर विविध प्रकारच्या समस्यांना अजूनही सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर मालजीपाडा होणारा चिखल व धूळ, रस्त्याच्या मध्येच उभी करण्यात येत असलेली वाहने, बंद पडलेली वाहने हटविण्याचा अभाव, विरुद्ध दिशेने प्रवास करणे, मोकाट जनावरांचा वावर,  झाकोळले गेलेले दिशादर्शक फलक, बंद पडलेले पथदिवे अशा विविध प्रकारच्या समस्यांमुळे अधूनमधून अपघात घडतात. विशेषत: करून रात्री व पहाटेच्या सुमारास अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे.

वसई पूर्वेतील विरार ते दहिसर टोल नाका चिंचोटी महामार्ग पोलिसांच्या हद्दीत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये ९६ अपघाताची नोंद  करण्यात आली आहे. यात ६४ जण जखमी झाले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्युंजय दूतांमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्गावर होणाऱ्या अपघातात अपघातग्रस्त नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी महामार्गावर मृत्यूंजय दूत नेमण्यात आले आहे. यात पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेलांमधील कर्मचारी, महामार्गाजवळच्या गावांतील नागरिक, दैनंदिन प्रवास करणारे नागरिक यांचा एक व्हाट्सप गट तयार केला आहे. चिंचोटी महामार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत २२ मृत्यूंजय दूत नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटनांवर लक्ष दिले जात आहे. आतापर्यंत ६४ अपघाताच्या घटनांमध्ये ४२ अपघातग्रस्तांचे जीव वाचविले असल्याचे महामार्ग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी सांगितले आहे.