सेवा रस्त्यावर ट्रक घसरला, जीवितहानी टळली

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी  १२ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास चारोटी उड्डाणपुलावरून एक ट्रक घसरला. ट्रकमधील सामान आणि त्यानंतर ट्रकचालकासह ट्रक उड्डाणपुलावरून सेवा रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

चारोटी उड्डाणपुलावरील तीव्र वळणांचा अंदाज न आल्याने गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. हा ट्रक कापसाच्या गाठीच्या ओझ्याने भरलेला होता. महामार्गाच्या सुरक्षा कठडय़ावर घासत घासत येत असताना आधी या ट्रकमधील कापसाच्या गाठी पुलाखालील सेवा रस्त्यावर पडल्या त्यानंतर काही क्षणांतच हा ट्रकही पुलाखालील सेवा रस्त्यावर कोसळला. या अपघातामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. चालकाला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सेवा रस्त्यावरून दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांची मोठी रहदारी होत असते. परंतु अपघाताच्या दिवशी दुपारची वेळ असल्याने सुदैवाने फारशी वाहने नव्हती. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. उड्डाणपुलावरून वाहने पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा अशाप्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. तरीही संबंधित यंत्रणेकडून त्याबाबत काहीच उपाययोजना होत नाही. उड्डाणपुलावरील तीव्र वळणांचा अंदाज वाहनचालकांना येणे अत्यंत कठीण असल्याने येथे त्या वळणाआधी ३००-४०० मीटरवर सूचना फलक लावणे  गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वेग कमी करण्यासाठी   गतिरोधक बसवणेही गरजेचे आहे. नागरिकांकडून वारंवार याची गरज व्यक्त केली जाते. परंतु आयआरबी आणि संबंधित यंत्रणांचे त्याकडे लक्ष नाही.