पालघर : पालघर-त्र्यंबकेश्वर-घोटी-सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाच्या पालघर वाघोबा घाटादरम्यान रस्त्याच्या कडेला खडकाळ मुरूमाऐवजी भुकटी मुरूम पसरवण्यात आले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्षभर दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्यावर नेमका पावसाळा तोंडावर आल्यावरच दुरुस्ती काढण्यात आली आहे. करण्यात येणारे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने केलेला खर्च बहुतेक पावसातच वाहून जाणार असे दिसते. यासंदर्भात काही नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली आहे.
महामार्ग प्राधिकरणामार्फत पालघर- त्रंबकेश्वर- सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती केली जात आहे. पालघरजवळील वाघोबा घाटामध्ये पावसाळय़ात पडलेले खड्डे गेल्या पंधरवडय़ात दुरुस्त करण्यात आले. मध्ये इतके महिने गेल्यानंतर पावसाळा जेमतेम काही दिवसांवर आला असताना प्राधिकरणाला याची आठवण झाली. आता रस्त्यालगत साइड पट्टी करण्याचे काम नव्याने हाती घेण्यात आले आहे. या कामामध्ये खडकाळ मुरूमाचा वापर होणे अपेक्षित होते, पण तिथे भुकटी स्वरूपात असलेला मुरूम वापरला जात आहे. हा मुरूम पाण्याबरोबर वाहून जाईल, अशी शक्यता आहे. वाहनांच्या चाकांबरोबर ही भुकटी रस्त्यावर आल्यास रस्ता निसरडा होऊन दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघातास निमंत्रणच ठरेल.
याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला होता. त्यांनी या संदर्भात शाखा अभियंत्यांकडून चौकशी अहवाल मागवला असल्याचे सांगितले. तसेच भुकटी स्वरूपातील मुरुमाचे कॉम्प्रेशन संक्षेप समाधानकारक नसल्यास टाकण्यात आलेला मुरूम काढून त्याऐवजी नव्याने खडकाळ पद्धतीचा मुरूम टाकण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गालगत भुकटी स्वरूपाचा मुरूम अंथरल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्यानंतर याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदाराला निकृष्ट दर्जाचा मुरूम काढून त्याऐवजी नव्याने खडकाळ मुरूम टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2022 रोजी प्रकाशित
मुरूम भुकटीमुळे महामार्गावर अपघाताची शक्यता ; संबंधित ठेकेदाराला मुरूम काढण्याच्या सूचना
पालघर-त्र्यंबकेश्वर-घोटी-सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाच्या पालघर वाघोबा घाटादरम्यान रस्त्याच्या कडेला खडकाळ मुरूमाऐवजी भुकटी मुरूम पसरवण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 21-05-2022 at 00:02 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident highway pimple powder removal instructions concerned contractor amy