पालघर : पालघर जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांमध्ये होणाऱ्या खत वितरणात तफावत आढळून आल्यामुळे जव्हार तालुक्यातील माऊली सेवा केंद्र तसेच पालघर तालुक्यातील पाम येथील वैशाली ऍग्रो सेंटरच्या मालकांवर कृषी विभागाने गुन्हे दाखल केले. तर ११ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आली आहे.

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके अशा कृषी उपयोगी वस्तू नोंदणीकृत कृषी सेवा केंद्र यांच्यामार्फत पुरवठा केला जातो. खताची साठेबाजी होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत विविध केंद्रांवर तपासणी करण्यात येते. केलेल्या तपासणीमध्ये शिल्लक साठा व प्रत्यक्ष साठा यांच्या नोंदींमध्ये ताळमेळ नसणे, ऑनलाइन विक्री केल्या जाणाऱ्या नोंदीमध्ये व प्रत्यक्ष विक्रीमध्ये तफावत आढळणे, साठा नोंदणी वही अपूर्ण असणे असे अनेक प्रकार आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

कृषी विभागामार्फत मागणीनुसार खत विक्री करण्यासाठी परवाने दिले जातात. केंद्रावर शेतकरी वर्गाच्या आधार क्रमांकानुसार खत विक्री केले जाते. जिल्ह्यात युरिया खताची मागणी १४७२० मेट्रिक टन आहे. त्यापैकी ४९१८ मेट्रिक टन पुरवठा करण्यात आलेला आहे. आतापर्यंत बाजारात १२८९.३६ मेट्रिक टन युरिया उपलब्ध आहे. खत बाजारात उपलब्ध असले तरी जिल्ह्यात खतांचा कृत्रिम तुटवडा भासत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. या पार्श्व भूमीवर कृषी विभागाने १२० केंद्रांची तपासणी केली असता १३ केंद्रांवर हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये दोन केंद्रांवर गुन्हे दाखल तर ११ केंद्रांना नोटिसा पाठवल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांनी त्यांच्या लागवड क्षेत्रानुसार आवश्यक खत विकत घ्यावे. अनावश्यक खत खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. युरिया खताच्या किंवा बियाणेसंदर्भात तक्रार असल्यास किसान कॉल सेंटर ९४०३८२१८७० तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तपासणी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘जमिनीची सुपीकता जाणून घ्या’
शेतकरी शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतो. मातीचे विश्लेषण करून पिकास आवश्यक असलेले खताचे व्यवस्थापन केल्यास उत्पादकतेमध्ये वाढ होते. बऱ्याच वेळा आवश्यकतेपेक्षा जास्त रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. गावातील कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क करून गावाच्या जमिनीची सुपीकता निर्देशांक जाणून घ्यावा व त्यानुसार संतुलित खताचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.