पालघर: मुंबई-बडोदा जलदगती राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने त्यांच्या कामादरम्यान मातीचा मोठा भराव केल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सफाळे पूर्वेकडील नवघर घाटीम भागात हे पाणी  शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरले व शेती जलमय झाली आहे. सुमारे ३० शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पाणी तसेच साचून आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीन वाढतच चालल्या आहेत.

पालघर तालुक्यात बुलेट ट्रेन, रेल्वे चौपदरीकरण याच बरोबरीने मुंबई-बडोदा एक्सप्रेस राष्ट्रीय महामार्ग, मालवाहतूक लोहमार्ग असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये मुंबई-बडोदा एक्सप्रेस मार्गासाठी माती मुरूमाचा भराव जोरात सुरू आहे. हा भराव केल्यामुळे या आधीही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच ऐन पावसाळय़ामध्ये पाणी जाण्याचा मार्ग भरावाने अडवल्याने हे पाणी शेताकडे वळले आहे. सफाळेमध्ये नवघर घाटीम या परिसरात पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नवघर-घाटीम भागातून  प्रकल्पाची सुरुवात गेल्या काही महिन्यांपासून करण्यात आली. कामादरम्यान  ग्रामस्थांना व कोणालाही विश्वासात न घेता भराव टाकल्याने नवघर भागातील नैसर्गिक नाले बंद झाले. याच बरोबरीने आजूबाजूच्या वस्तीलाही पाण्याच्या प्रवाहाचा धोका असून मोठय़ा पावसामध्ये हे पाणी शेतासह वस्तीतल्या घरांमध्ये शिरण्याची भीती आहे. त्यामुळे तातडीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना व तेथे असलेल्या वस्तीला दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

बियाणे कुजण्याची भीती

नैसर्गिक नाला ज्या ठिकाणी आहे, त्या नाल्याच्या दोन्ही बाजूस अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत. दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी बियाणे पेरली होती.  शेतामध्ये पाणी साचल्याने बियाणे कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढेही मोठय़ा पावसामध्ये पावसाचे पाणी शेतामध्ये शिरण्याची दाट शक्यता व नुकसानीची शक्यता शेतकरी वर्ग वर्तवत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट उभे राहते की काय या चिंतेत ते आहेत.