नीरज राऊत

पालघर जिल्ह्यात ६०० हेक्टर पेक्षा अधिक जागेमध्ये फुलशेती केली जात असून २५०० मेट्रिक टन पेक्षा अधिक फुलांचे उत्पादन होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फुलशेतीचे प्रमाण वाढत असून वेचलेली फुल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या वेळ व मनुष्यबळाच्या मर्यादा लक्षात घेता शेतकऱ्यांना फुलशेती किफायतशीर ठरत नाही. या फुलांपासून अर्क निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक असून फुल शेती सोबत सुगंध शेती करण्यास जिल्ह्यातील पश्चिम भागात झालेले काही प्रयोग या दिशेने आशादायी ठरले आहेत.

आदिवासी भागात रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांनी फुलशेतीकडे वळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून गेल्या काही वर्षात मोगऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. फुलशेतीच्या ठिकाणा पासून बाजारपेठेपासून दूरवर असल्याने शेतात वेचलेली फुलं मार्केटपर्यंत पोहचविण्यासाठी वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. विलंबाने पोहोचणाऱ्या किंवा बहर हंगामात बाजार भाव कोलमडल्याने शेतकऱ्यांना आपल्या फुलांचा योग्य मोबदला मिळत नसल्याचे दिसून येते. शिवाय मनुष्यबाळाच्या व वेळेच्या मर्यादा असल्याने किमान २० ते ३० टक्के फुल वेचणे कठीण होत असून शेतकऱ्याचा नफा शेतातच कोमजून जात असल्याचे चित्र आहे. करोनाच्या काळात फुल शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांवर बिकट अवस्था ओढवली होती.

पालघर तालुक्यातील कुकडे (बोईसर) व केळवे रोड येथील दोन प्रयोगशील शेतकऱ्याने सोनचाफा, मोगरा, गुलाब तर डहाणू येथील एका तरुण शेतकऱ्यांनी गवती चहा (लेमन ग्रास) पासून अर्क तयार करण्याचे प्रयत्न हाती घेतले असून त्यांना प्रायोगिक तत्त्वावर यश लाभले आहे. मोगऱ्याचा अर्क अडीच ते तीन लाख रुपये प्रति किलो, गुलाबाचा अर्क साडेतीन ते चार लाख रुपये प्रति किलो, सोनचाफ्याचा अर्क साडेचार लाख रुपये प्रति किलो, गवती चहाचा अर्क १२०० ते २५०० हजार रुपये प्रति किलो इतक्या दराने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकला जात आहे. मात्र जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या सुगंधित अर्कांची तपासणी करणे व या उत्पादनाची विक्री करण्यास अनेक अडचणी समोर आल्याने सुगंधी अर्क उत्पदान व्यापक प्रमाणात करण्यास या शेतकऱ्यांना मर्यादा आल्या आहेत.

एकीकडे स्थानिक फुलशेती करणारा शेतकरी नफ्यासाठी झगडत असताना अर्क काढण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक तंत्रज्ञान, अर्काची चाचणी करण्याची व्यवस्था तसेच त्याची विक्री व्यवस्था उभारण्यास राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास आदिवासी बांधवांसाठी उपजीविकेचे साधन तसेच हजारो ग्रामीण भागातील नागरिकांना शाश्वत रोजगार उपलब्ध होऊ शकेल. केंद्र सरकारच्या विज्ञान व औद्योगिक अनुसंधान परिषदेने औषधी व सुगंधी वनस्पती शेती संदर्भात चालना देण्यासाठी “अरोमा मिशन” आरंभली असून दक्षिण भारतामध्ये सुगंधी तेल व अर्क यांना उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. पालघर जिल्ह्यात फुलशेतीला विशेष चालना दिली जात असताना उत्पादित होणाऱ्या फुलांना बारामाही बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सुगंधी अर्क, औषधी वनस्पतींचे अर्क उत्पादित करणारे उद्योग उभारणे आवश्यक झाले आहे. विशेष म्हणजे असे उद्योग उभारण्यासाठी पालघर जिल्ह्यात कोणतीही शासकीय यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून आले असून फुल शेतीसोबत सुगंध शेतीला चालना देणे आवश्यक झाले आहे.

कृत्रिम सुगंध वापरावर नियंत्रण असावे
फुलांच्या सुगंधी अर्कला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असताना स्थानीय पातळीवर उत्पादित होणाऱ्या सुगंधी अर्काची विक्री करण्यासाठी व्यवस्था सध्या उपलब्ध नाही. शिवाय अनेक नामांकित उत्पादने नैसर्गिक सुगंधी स्त्रोत वापरत असल्याचा दावा अवास्तव ठरत आहे. त्यामुळे नैसर्गिक सुगंधाच्या अर्काला १० ते ३० हजार रुपये किलो इतक्या तुलनात्मक कमी दराने उपलब्ध होणाऱ्या कृत्रिम सुगंधी अर्काशी सामना करावा लागत असून फुलशेती करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत धोरणात्मक बदल करणे अथवा नैसर्गिक सुगंधी अर्काचा उत्पादनात किमान काही प्रमाणात वापर बंधनकारक करणे गरजेचे झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फुलांची १०० टक्के विक्री होत नसल्याने फुलशेती करण्यारया शेतकरयांचा नफा शेतातच राहतो. बहरीच्या वेळेस भाव मिळत नाही, संपूर्ण फुले काढुन बाजारात पोहचू शकत नाही. करोना काळात सर्व शेतकरयांचे अतोनात हाल झाले. शेतकरयांना फुल विकुन नाही तर फुलांचा सुगंध काढुन विक्री केल्यास त्याना सुगीचे दिवस येतील. फुले संध्याकाळी नष्ट होतात मात्र त्यांचा सुगंध कित्येक वर्ष टिकुन राहतो. सरकारने याचा विचार करून कृती करावी.- मधुकर साळवी, प्रयोगशील शेतकरी, कुकडे (बोईसर)