पालघर/वसई : महाराष्ट्र सागरी मंडळाने २० फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या वसई-भाईंदरदरम्यानच्या रो-रो सेवेला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्या अनुषंगाने या सेवेत दुसरी नौकाही  (फेरीबोट)  चालवण्यास महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सुट्टी व आठवडाअखेरच्या दिवशी दर २० मिनिटाला ही नौका (फेरीबोट) सेवा देण्यास उपलब्ध होणार आहे.

सुवर्णदुर्ग शिपिंग व मरिन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने वसई ते भाईंदरदरम्यान रो-रो सेवा २० फेब्रुवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली. ही सेवा सुरू केल्यापासून ५ मार्चपर्यंतच्या कालावधीत वसई येथून ९९५६ तर भाईंदर येथून ८५७१ असे एकूण १८५२७ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

हेही वाचा >>> कोकण किनारपट्टी ‘सिडको’ला आंदण;  विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती, ‘नगरविकास’च्या अधिकारांना कात्री

शनिवार, रविवार या दिवशी गर्दीच्या वेळी सरासरी ४५ मिनिटांनी ही सेवा सुरू असून १४ दिवसांमध्ये १३५८ बारा वर्ष वयोगटाखालील मुलांसह एकूण ११,२४६ प्रवाशांनी या फेरीबोटीमधून प्रवास केला. त्याचबरोबर १२२४ नागरिकांनी या बोटीतून एक तासाची पर्यटन सफर केल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर २९१० दुचाकी, १७०७ चारचाकी वाहने व त्याबरोबरीने सायकली,  तीन आसनी रिक्षा यांचीदेखील या रो-रो सेवेतून वाहतूक झाल्याचे दिसून आले आहे.

या फेरीबोट सेवेला मिळालेला प्रतिसाद पाहता तसेच फेरीबोटीच्या प्रतीक्षेत नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने सुवर्णदुर्ग शिपिंग व मरिन सर्विसेसने या मार्गावर दुसरी फेरीबोट सुरू करण्याची अनुमती मागितली होती. ही अनुमती महाराष्ट्र सागरी मंडळाने दिल्याने वसई-भाईंदरदरम्यान गर्दीच्या वेळेस दर २० मिनिटाला रो-रो सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जान्हवी पाठोपाठ आरोही फेरी बोट सेवेत

वसई भाईंदर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या रोरो सेवेत प्रथम जान्हवी ही नौका कार्यरत करण्यात आली होती. महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाने या मार्गावर दुसऱ्या फेरी बोटीला मान्यता दिल्याने आरोही ही नौका देखील सेवेत कार्यरत राहणार असल्याची माहिती सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे देण्यात आली आहे.