पाच महिन्यांत दहा मातांचा मृत्यू

निखिल मेस्त्री

पालघर : पालघर जिल्ह्यत कुपोषणापाठोपाठ माता मृत्यूमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढले आहे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये   जिल्ह्यत सात माता मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा  माता मृत्यू प्रमाण  जास्त असल्याचे दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन सात वर्षे उलटून गेल्यानंतर बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र माता मृत्यूमुळे पालघर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  जिल्ह्यत अवघ्या पाच महिन्यांमध्ये दहा माता मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मातामृत्यू जव्हार तालुक्यात आहे. येथे तीन मृत्यूची नोंद झाली आहे. तर दोन माता मृत्यू डहाणू तालुक्यातील आहेत. वाडा तालुक्यातही दोन मृत्यूची नोंद झाली आहे. तर पालघर तलासरी व वसई तालुक्यात प्रत्येकी एक माता मृत्यूची नोंद आहे.

 करोना काळामध्ये गरोदर मातांना व्यवस्थित आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे हे माता मृत्यू होत आहेत असे सांगितले जाते. याचबरोबरीने  जिल्ह्यत ग्रामीण बहुल भागांमध्ये गरोदर मातांना असलेल्या रक्ताशय याबरोबर उच्च रक्तदाब, मुदतपूर्व प्रसूती, गृहप्रसुती करणे अशा कारणांमुळेही माता मृत्यूची नोंद झालेली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत माता बाल संगोपन कार्यक्रमा अंतर्गत मातांची तपासणी व त्यांच्या आजाराच्या नोंदी ठेवल्या गेल्या असल्या तरी उपजिल्हा रुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये मातांना प्रसूतीसाठी योग्य त्या सेवा मिळाल्या नसल्यामुळे त्यांचे मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. अलीकडेच विक्रमगड एक येथे एका गरोदर मातेला रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली  होती. याच बरोबरीने शासकीय प्रसूतिगृहामध्ये अनेक कारणे सांगून महिलांना इतरत्र उपचारासाठी पाठवले जाते. त्या दरम्यान मातांचा मृत्यू झाल्याचेही कारण समोर आले आहे. कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असले तरी मातामृत्यू थांबवण्यासाठी हे प्रयत्न कमी पडत असल्याचे आरोप काही सेवाभावी संस्थांकडून केले जात आहेत.

शासन दरबारी

मृत्यूची नोंद नाही

ग्रामीण बहुल भागांमध्ये काही गरोदर माता शासकीय आरोग्य संस्थांच्या कक्षेतून बाहेर राहत असल्याने त्यांच्या मृत्यूची नोंद शासन दरबारी होत नाही. त्यामुळे मातामृत्यूचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. अलीकडच्या काळामध्ये करोना हे  मातामृत्यू होण्याचे प्रमुख कारण आहे. आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष करोनावर केंद्रित झाल्यामुळे माता यांच्यासाठी असलेल्या आरोग्य सेवांवर दुर्लक्ष झाले.   या दरम्यान शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी कमी रूग्णालय उपलब्ध असल्याने अनेक मातांना प्रसूतीसाठी फरफट करावी लागली. पालघर येथेही गरोदर मातांसाठी असलेले प्रसूतिगृह आजही बंद स्थितीत आहे. गरोदर महिलांना प्रसूतीसाठी जव्हार किंवा डहाणूची वाट धरताना त्यांचे हाल होताना दिसत आहे.

विविध कारणांमुळे पालघर जिल्ह्यत माता मृत्यू होत असले तरी आरोग्य विभागामार्फत ते होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. मातांची तपासणी या बरोबरीने त्यांचे लसीकरण व त्यांच्या नोंदी वारंवार केल्या जात आहेत आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे मातामृत्यू कमी होतील ही आशा आहे.

डॉ. मिलिंद चव्हाण, माता बाल संगोपन अधिकारी, पालघर जिल्हा