scorecardresearch

पोल्ट्री कोंबडय़ांसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती ; उपायांमुळे मृत्यूदर कमी; बाजारभाव चांगला

ब्रॉयलर कोंबडीचे पिल्लू दोन दिवसांचे असल्यापासून पुढील चार दिवस त्यांना अँटिबायोटिक्सचे थेंब डोळय़ातून देण्यात येतात.

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : पोल्ट्रीमध्ये वाढवण्यात येणाऱ्या कोंबडय़ांना उष्णतेची बाधा होत असल्याने पारंपरिक औषधोपचाराऐवजी पालघर येथील एका पोल्ट्री मालकाने उन्हाळय़ात होणाऱ्या आजारांपासून कोंबडय़ांचे संरक्षण करण्यासाठी चक्क आयुर्वेदिक व पारंपरिक उपचार पद्धती अवलंबली आहे. त्यामुळे उन्हाळय़ामध्ये कोंबडय़ाची वाढ अपेक्षित गतीने होत असून पक्ष्यांना येणारे आजारपण व कोंबडय़ांचा मृत्युदर कमी झाला आहे.

उन्हाळय़ाच्या दिवसांत कोंबडय़ांच्या पिल्लांना वाढवत असताना अनेक आजार होत असतात. बहुतांश पोल्ट्री फार्ममधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मोठय़ा आकाराचे पंखे (ब्लोअर) व पाणी शिंपडण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला जातो. ब्रॉयलर कोंबडीचे पिल्लू दोन दिवसांचे असल्यापासून पुढील चार दिवस त्यांना अँटिबायोटिक्सचे थेंब डोळय़ातून देण्यात येतात. त्याचप्रमाणे त्यांना सी-जीवनसत्त्वमिश्रित पाणी देण्याची पद्धत आहे. शिवा राणीखेत आजारांविरुद्ध लासोट व गंबोरो आजारांविरुद्ध लसीकरण कोंबडय़ांना देण्यात येत असते.

पोल्ट्रीमध्ये वाढणाऱ्या कोंबडय़ांना उष्म्याचा त्रास होऊन ‘आर.डी.’ नामक आजार तसेच सर्दीजन्य आजार होऊन कोंबडय़ांचा मृत्यू होत असतो.  तरीही या सर्व उपाययोजनांचा मर्यादित लाभ होत असल्याचे दिसून आले आहे.

कोंबडय़ांना चांगला बाजारभाव

गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रतिबंधात्मक उपायांचे प्रयोग यशस्वी ठरले असून त्यामुळे पक्ष्यांची तंदुरुस्ती, त्यांची वाढ सरासरीपेक्षा चांगली झाली असून पक्ष्यांवर एक विशेष चमक दिसून येत आहे. तसेच कोंबडय़ांचा मृत्यू दर तुलनेने कमी झाला असून पक्ष्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे. याशिवाय कोंबडय़ांना पाण्यावाटे होणाऱ्या ई-कोलाय आजाराचे प्रमाण कमी होऊन त्यामुळे पक्ष्यांची नियमित व सुरळीतपणे वाढ होत झाल्याचे दिसून आले आहे. पालघर भागात १.३ किलो व दोन किलोचे पक्षी पोल्ट्रीमध्ये तयार करून ते वितरित केले जात असून या पक्ष्यांच्या वाढीसाठी थंडीमध्ये ३६ दिवस तर उन्हाळय़ात ४२ दिवसांचा अवधी लागत असतो. वाढणाऱ्या कोंबडय़ांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लिंबू व आयुर्वेदात महत्त्व असणाऱ्या घटकांचा संतुलित वापर केल्याने पोल्ट्री उद्योगामध्ये नुकसान होण्यास कारणीभूत ठरणारे पक्ष्यांवरील आजार दूर ठेवण्यासाठी लुलानिया कुटुंबीयांचा प्रयोग यशस्वी होताना दिसून येत आहे.

उपाययोजनांमुळे कोंबडय़ांची वाढ चांगली

* मनोर येथील अमाझ पोल्ट्री अँड अ‍ॅग्रो फार्म कंपनीचे मालक रफिक लुलानिया यांच्या आयुर्वेद शिक्षण घेतलेल्या पत्नी डॉ. शमिन यांनी कोंबडय़ावर होणाऱ्या उष्मा आजारांवर गेल्या तीन महिन्यांपासून केलेल्या प्रतिबंधात्मक उपायोजनांचा चांगला प्रभाव वाढीवर होत आहे. सुमारे ४० हजार कोंबडय़ांचे व्यवस्थापन करणाऱ्या या मनोर येथील पोल्ट्रीमध्ये त्यांनी फॉर्मलीन स्प्रेऐवजी लिंबाडय़ाच्या पाल्याचा रस व कापूर याच्या मिश्रणाची सकाळी फवारणी करून पाण्याऐवजी लिंबूचा रस, जिरे, अजवैनमिश्रित द्रव्य पाण्यासोबत देण्यात येते. पोल्ट्रीमधील कोंबडय़ांची पचनशक्ती व प्रतिबंधात्मक शक्ती वाढवण्यासाठी काही वेळा लिंबूऐवजी दह्याचा वापर मिश्रणात केला जात असून हे द्रव्यरूपी मिश्रण पक्षी आवडीने सेवन करताना दिसून येतात. * सायंकाळच्या वेळी कोंबडय़ांना लसणाचा रस काढून त्याची फवारणी करण्यात येते. त्याचप्रमाणे कोंबडय़ांना होणाऱ्या सर्दीसारख्या आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काळी मिरी व सुंठ यांना उकळून अर्क तयार करून त्याचा आवश्यकतेनुसार वापर करण्याची पद्धत अवलंबिली आहे. विशेष म्हणजे मिश्रण किंवा अर्क तयार करण्यासाठी वापरलेल्या लसूण, काळी मिरी, जिरा पावडर व अजवैनचा चोथा सुकवून नंतर खाद्याबरोबर मिश्रण करून पक्ष्यांना दिला जातो.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ayurvedic treatment method for poultry hens zws